‘पीएमसी’ ग्राहकांना दिलासा

03 Dec 2019 15:00:50

pmc_1  H x W: 0


७८% ग्राहकांना पूर्ण ठेव काढण्याची परवानगी

मुंबई : पीएमसी बँक खातेदारांपैकी जवळपास ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली असल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली. त्यात एकावेळी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. लग्न समारंभ, आरोग्य विषयक अचानक उद्भवलेली गंभीर स्थिती, शिक्षण अशा बाबतीत पीएमसी बँकेच्या खातेधारकांना रिझर्व्ह बँकेच्या संबंधित दिशानिर्देशांनुसार एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम खात्यातून काढण्याचीही मुभा आहे, असे सीतारामन यांनी पुढे स्पष्ट केले.

ताब्यात घेतलेल्या प्रमोटर्सच्या मालमत्ता आरबीआयला दिल्या जातील. त्या मालमत्तांच्या लिलावातून आलेले पैसे खातेधारकांना दिले जाणार आहेत.

पैसे काढण्यास बंदी असल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आपले पैसे बँकेत अडल्याचे समजाताच अनेकांना धक्का बसला होता. या धक्क्यामुळे काही बँक खातेधारकांचा मृत्यू झाला होता. काहींना शाळा, महाविद्यालयाचे शुल्कही भरता आले नव्हते. तर काहींनी दागिने विकून घर खर्च चालवला होता.

२४ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले होते. बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून प्रशासक नेमण्यात आला असून त्यांच्या माध्यमातूनच सध्या बँकेचे दैनंदिन कामकाज पाहिले जात आहे. पीएमसी बँकेतील घोटाळा ४ हजार ३५५ कोटी रुपयांचा असल्याचे पोलीस तपास उघड झाले असून या घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.

Powered By Sangraha 9.0