सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी कासवे विणीसाठी दाखल !

29 Dec 2019 15:16:31

tiger_1  H x W:


 वायंगणी, तांबळडेग किनाऱ्यावर आढळली अंडी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सागरी कासवांनी अंडी देण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या समुद्री कासव विणीच्या हंगामातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पहिली अंडी गुरुवारी आणि शनिवारी वायंगणी व तांबळडेग किनाऱ्यावर आढळली. या अंड्यांची संख्या ३२७ आहे.

 
 

राज्याच्या किनारपट्टीवर दरवर्षी सागरी कासवांमधील 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी देण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा साधारण सागरी कासवांचा विणीचा हंगाम आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर सागरी कासवांची विण होते. यंदाच्या मोसमातील समुद्री कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्याभरात रायगडमधील श्रीवर्धन आणि रत्नागिरीमधील वेळास, केळशी व गावखडीच्या किनाऱ्यावर कासवांची अंडी आढळून आली आहेत. या पाठोपाठ आता सिंधुदुर्ग किनारपट्टीवरही 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी देण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

 
 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा किनाऱ्यांवर सागरी कासव विणीसाठी येत असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. यामधील वायंगणी किनाऱ्यावर गुरुवार आणि शुक्रवारी कासवाची दोन घरटी आढळून आली. यामधील एका घरट्यात १०५ व दुसऱ्या घरट्यात ११९ अंडी सापडल्याची माहिती वायंगणीचे कासवमित्र सुहास तोरसकर यांनी दिली. वन विभागाने या अंड्याचा पंचनामा केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी वायंगणी किनाऱ्यावर सागरी कासवाची ९ घरटी आढळून आली होती. तर तांबळडेग किनाऱ्यावर शनिवारी सकाळी येथील कासवमित्र सागर मालडकर यांना १०३ अंडी आढळून आली. यंदाच्या मोसमातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच घरटी असल्याची माहिती सिंधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0