जनकल्याण समितीच्या सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

29 Dec 2019 20:28:48


janklayn_1  H x


मुंबई : शहरात दिल्लीच्या धर्तीवर प्रदूषणाची पातळी खालावली आहे. यासाठी प्रदूषणाचे महत्त्व विद्यार्थीदशेतच मुलांना कळावे, यादृष्टीने जनकल्याण समिती परळ भागाच्यावतीने ‘तेजोमय भारतासाठी सशक्त विद्यार्थी घडवूया! पर्यावरण राखूया, सायकल चालवूया’ या सामाजिक उपक्रमांतर्गत रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी सायकल मॅरेथॉनचे आयोजन केले होते. समितीच्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दिला. सकाळच्या ऐन कडाक्याच्या थंडीतही शेकडो विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) ते दादर टीटीपर्यंतच्या या सायकल मॅरेथॉनमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.



janklayn_1  H x


यावेळी जनकल्याण समितीचे अध्यक्ष संदीप वेलिंग, म्हाडाचे सभापती मधू चव्हाण, पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, नगरसेविका सुरेखा लोखंडे, नगरसेवक रमाकांत रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्कार वर्ग संयोजिका चित्रा वेलणकर यांच्या हस्ते सायकलद्वारे घरोघरी लहान बाळांना तेल मालिश करून उदरनिर्वाह करणायर्या मधुरा वायकर यांना नवीन सायकल देऊन सन्मानित करण्यात आले. या सायकल मॅरेथॉनमध्ये नोंदणीकृत ७०० बाल सायकलस्वारांपैकी मोठ्या गटात ५८२आणि छोट्या मुलांच्या गटात ७४ बाल सायकलस्वार मिळून एकूण ६५६ सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमासाठी जनकल्याण समितीचे परळ विभाग कार्यवाह प्रताप परब यांच्या नेतृत्वाखाली अनिल तोरसकर, सुनील खाड्ये, सुधीर देवळेकर, चंद्रशेखर परब, अमेय मंडलिक यांच्यासह १५० पुरुष आणि महिला नियामकांनी मोलाची कामगिरी बजावली. या सायकल मॅरेथॉनसाठी महानगरपालिका, वाहतूक पोलीस तसेच विभागीय पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी विशेष मेहनत घेतली.

Powered By Sangraha 9.0