
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरुन हसवणारा बॉलीवूड अभिनेता म्हणजे चंकी पांडे. चंकी पांडेच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण आता चंकी पांडेचे हे विनोद मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. मराठी प्रेक्षकांसाठी हा सुखद धक्काच आहे.
I'm tooooo excited about my first Marathi film 🕺💃🥂🍾🤩😍 pic.twitter.com/ibu3DExHUV
समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ या आगामी मराठी विनोदी चित्रपटात चंकी पांडे दिसणार आहे. पण या चित्रपटात तो कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही. ‘मराठी चित्रपटात काम करणे हे माझ्या बकेट लिस्टमध्ये होते. मी प्रादेशिक भाषा, बंगाली आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण मला मराठी चित्रपटामध्ये काम करायचे होते. कारण मला असे वाटते की मराठी भाषेत सर्वात चांगले विनोदी चित्रपट होऊ शकतात. तसेच “घेऊन टाक” हे माझे आवडते मराठी वाक्य आहे आणि विकून टाक हे थोडे फार त्याच्या सारखेच आहे. आणखी खूप कारणे आहेत हा चित्रपट करण्याची’ असे चंकी चित्रपटाबाबत बोलताना म्हणाला आहे.
तसेच या धाटणीचा चित्रपट पहिल्यांदाच करत असल्याचे देखील चंकी पांडेने म्हटले आहे. चंकी पांडेसह या चित्रपटात शिवराज वायचळ, हृषीकेश जोशी, समीर चौघुले, रोहित माने, ऋजुता देशमुख, वर्षा दांदळे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. येत्या नवीन वर्षात, ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.