चार अनिष्ट वृत्ती, ठेवती दूरवरी...!

    दिनांक  25-Dec-2019 20:30:06
|


ved_1  H x W: 0न तं विदाथ य इमा जजान,

अन्यद् युष्माकं अन्तरं बभूव ।

नीहारेण प्रावृता जल्प्या

चासुतृप उक्थशासश्चरन्ति॥

(ऋग्वेद-10/82/7, यजु.17/31)

अन्वयार्थ

हे मानवांनो ! (तं) त्या परमेश्वराला (न विदाथ) तुम्ही जाणू शकत नाहीत, (य:) ज्याने की (इमा) या समग्र सृष्टीला (जजान) निर्मिले, उत्पन्न केले आहे. (अन्यत्) तुम्ही आता वेगळे झाला आहात. (युष्माकं) तुमचे त्याच्यापासून (अन्तरं) फार अंतर (बभूव) झाले, पडले आहे. कारण तुम्ही (निहारेण) अज्ञानाच्या अंधाराने (प्रावृता:) झाकलेले आहात. (जल्प्या च) आणि खोटे आणि व्यर्थ बडबड करणारे बनला आहात. (असुतृप:) केवळ प्राण-शरीराचे भरणपोषण करण्यात व्यस्त आहात. तसेच (उक्थ्यशास:) अवडंबर निर्माण करणारे बनून सर्वत्र (चरन्ति) इकडे तिकडे हिंडत-फिरत आहात.विवेचन

वेदमातेची शिकवण ही सर्वांसाठी सर्वकाळी फारच उपयुक्त आहे. अल्पमती मानव भौतिक सुखसुविधांना मिळवून इतका उन्मत्त होतो की, तो आपल्या आई-वडिलांना तर विसरतोच, पण ज्याने त्याला हे सर्व काही दिले, हे सारे विश्व निर्मिले, अशा जगदीश्वरालाच तो विसरतो... ही कृतघ्नतेची वृत्ती त्याला शाश्वत सुखापासून वंचित ठेवते आणि दु:खसागरात बुडवून टाकते. पण, तरीही त्याच्या लक्षात येत नाही की, हे सर्व का व कसे होत आहे? त्यातूनच मग सुरू होते भगवंतांच्या नावे ओरड की ‘देव आमच्यावर कोपला, निष्ठूर झाला वगैरे... वगैरे!’ आज हे चित्र सर्रास पाहावयास मिळते. जग इतके उन्मादी बनले आहे की, त्यास हेच समजत नाही की, आपण काय करीत आहोत व कुठे जात आहोत? भौतिक साधनसंपत्तीचे अपार वैभव लाभलेला आजचा माणूस का अविवेकी बनला आहे की, त्याला शाश्वत मूल्यांचा पूर्णत: विसर पडला आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय करणार्‍या परमेश्वरापासूनच माणूस दुरावला आहे. नेमके याच वास्तविक परिस्थितीचे चित्रण वरील वेदमंत्रात अगदी यथार्थपणे करण्यात आले आहे.


माणूस आपल्या कर्तव्यापासून, सन्मार्गापासून आणि मूल्यांपासून का म्हणून दूर जातो? त्याची मानवतेऐवजी दानवतेकडे वाटचाल का सुरू होते? याची कारणमीमांसा इथे करण्यात आली आहे. ‘य इमा जजान, न तं न विदाय।’ ज्याने या समग्र ब्रह्मांडाला अगदी सुव्यवस्थितपणे रचले, ज्याच्या अटळ नियमानुसार ही सारी सृष्टी प्रगतिपथावर आहे, अशा त्या विश्वनिर्मात्या परमेश्वरालाच आपण विसरलोत. सर्वांचा पिता-माता बनून जो जड व चेतन सृष्टी तत्त्वांची व प्राणीमात्रांची काळजी वाहतो, त्याची आम्हाला साधी आठवणसुद्धा नाही. तो तर सर्वत्र व्यापक आहे. ‘ईशावास्यमिदं सर्वम्।’ त्या ऐश्वर्यवान् परमेश्वराने सारे विश्व आच्छादले आहे. तो स्थूलातिस्थूल आणि सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. तो आपल्या सर्वांच्या सर्वाधिक जवळ आहे नि प्रत्येक शुभाशुभ कर्मांचा निरीक्षक व दृष्टादेखील आहे.त्याच्यापासून आपण काहीच लपवू शकत नाही
. मग आम्ही त्याला का विसरावे? आम्ही त्याला ओळखलेच नाही. या विश्वकर्मा सविता देवाला विस्मृत करून इकडे-तिकडे का भटकत आहोत? तो तर तुमच्या अत्यंत जवळ आहे. त्याची अनुभूती ही ज्ञानपूर्वक उपासनेने व योगाभ्यासाने होते. ईश्वर साक्षात्काराकरिता वेळ द्यावा लागेल. पण मानवाकडून हे कार्य घडत नाही, म्हणूनच तो “अन्यत्।” होतो. ईश्वरीय शक्तीपासून दुरावतो. ईश्वराशी असलेले पूर्वीचे नाते तुटते. यामुळेच तर मग ‘युष्माकं अन्तरं बभूव।’ तुमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये मोठे अंतर पडते. ज्याने निर्मिले, पोसियले व वाढविले, अशा जन्ममाऊली जगदंबेला विसरणे म्हणजे आपला आधार व आश्रयच नाहीसा होणे. जरा त्या बाळाकडे पाहा, जो भल्या गर्दीत आपल्या आईपासून दुरावला आहे, चुकून हरवला आहे, त्याचे किती हाल होतात. तो धाय मोकलून रडतो. त्याला काहीच सुचत नाही की समजत नाही? त्या लहान मुलाची जी अवस्था केविलवाणी, त्याहून वाईट अवस्था मोठेपणी जाणीवपूर्वक त्या महान आईपासून दूर राहिल्याने होते, जिने की हे सारे विश्व स्थापिले. ती जगदंबा आमच्या फारच जवळ, सर्वत्र व्यापक आहे. मग काय कारण आहे की, आम्ही तिच्यापासून दूर गेलो?ईश्वरापासून दूर होण्याची चार कारणे इथे सांगितली आहेत
. पहिले म्हणजे ‘निहारेण प्रावृता’! भयावह अशा अज्ञानरूपी काळोखाने आच्छादलेले लोक! ‘निहार’ हा अंध:कारासाठी आलेला शब्द! होय. तमोगुणाचा अंधार माणसाला संपवून टाकतो. अशा तमोगुणी लोकांना सत्य व असत्य याविषयी काहीच कळत नाही. या तामसी वृत्तीमुळे माणूस स्वत:ला मोठा समजू लागतो. पैसाअडका, ज्ञानवैभव आले की, त्याला भान राहत नाही. त्यावर तमोगुणाचे आवरण चढते. तामसी वृत्तीच्या पडद्यामुळे माणसाचा विवेक नाहीसा होतो, मग ते स्वार्थाने वागू लागतात. दुसरी बाब म्हणजे इतरांचा विचार न करता केवळ ‘असुतृप:’ बनणे. ‘असु’ म्हणजे प्राण आणि ‘तृप’ म्हणजे भरणपोषण. जे फक्त आपल्या प्राणांचे व शरीराचे भरणपोषण करू लागतात, ते फारच स्वार्थी ठरतात. आपल्या प्राणांची तृप्ती करण्यात असे लोक इतके मग्न होतात की, त्यांना स्वार्थापुढे काहीच दिसत नाही.अहर्निश खाण्यापिण्यात आणि आपल्याच स्वार्थात तल्लीन असलेल्यांना इतर कोणाशीही देणेघेणे नसते
. अशा शरीर आणि इंद्रियांच्या तृप्तीचा व भोगविलासाचा बाह्य आनंद घेण्यात तत्पर असलेली मंडळी आज मोठ्या प्रमाणात आढळतात. तिसरे लोक म्हणजे ‘जल्प्या’! अर्थात थोड्याशा ज्ञानाने शेफारलेले आणि शब्दांचे जंजाळ पसरविणारे किंवा बडबडणारे. समाजात नेहमी असे ‘जल्पी’ लोक मोठ्या प्रमाणात सापडतात. जल्पी हे केवळ अडाणी व निरक्षरच असतात असे नव्हे, तर शिकले-सवरलेलेदेखील असतात. शब्दांचे अवडंबर माजवत केवळ पांडित्य प्रदर्शन करणारे जल्पी सामान्य जनतेला दिशाहीन बनवतात. त्यामुळे राष्ट्राचे भलतेच नुकसान होते. चौथी गोष्ट म्हणजे ‘उक्थशास:’ होय. अर्थात वाटेल तसे वागणारे. असत्य व निरर्थकपणे शब्दांचे जाळे निर्माण करीत आपल्या लेखन व भाषण या दोन माध्यमांनी सामान्य लोकांना भ्रमात टाकतात. खरे तर ही ‘उक्थशास’ मंडळी अर्धवट ज्ञानी असतात. आचरणशून्य हे लोक फक्त पांडित्याचा आव आणतात. पण व्यवहारात मात्र अपूर्ण. थोडेसे ज्ञानी झाले की, लगेच स्वत:ला मोठे समजायचे आणि आचरण न करता इतरांना तत्त्वज्ञान सांगावयाचे, हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला दिसून येतो. अशांना मग ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण।’ ही उक्ती लागू पडते. खरे तर समाज व राष्ट्राच्या अधोगतीला या चारही प्रवृत्ती जबाबदार ठरतात. म्हणूनच तर अशा या प्रवृत्ती बाळगणार्‍या व्यक्ती ईश्वरीय व्यवस्थेला ओळखू शकत नाहीत. त्यामुळे त्याच्यापासून ते फार दूर जातात.
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. जलद गतीने मजकूर मिळविण्यासाठी ॲप डाऊनलोड करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.