रामराज्य भूमंडळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2019
Total Views |

z
ramrajya _1  H



रामराज्य हे रघुनाथाचे राज्य असल्याने तेथे कळीकाळाची भीती नाही, हे आपण मागील लेखात पाहिले. (राज्य या रघुनाथाचे । कळीकाळासि नातुडे।) समर्थांनी मनाच्या श्लोकातही रामाचे वर्णन करताना असाच अभिप्राय व्यक्त केला आहे.

दीनानाथा हा राम कोदंडधारी ।

पुढे देखता काळ पोटी थरारी॥



राम हा भक्तांचा कैवारी आहे
. रामराज्याच्या संदर्भात राम हा प्रजेचा कैवारी आहे, असे म्हणावे लागेल. रामाने हातात धनुष्य धारण केलेले आहे. रामाच्या खांद्यावर बाणांनी भरलेला भाता सज्ज असतो. त्यामुळे या कोदंडधारी रामाला पाहून काळसुद्धा भीतीने थरथर कापतो, काळाला धडकी भरते. कारण, रामाच्या धनुष्यातून सुटलेला बाण लक्ष्याचा वेध घेतल्याशिवाय राहत नाही. राजा हा असा पराक्रमी असावा, रामराज्याच्या दृष्टीने मनाच्या श्लोकातील आणखी एक श्लोक महत्त्वाचा वाटतो.



पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे ।

बळे भक्त रीपू शिरीं कांबि वाजे।

पुरी वाहिली सर्व जेणे विमानी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

(म.श्लो.29)



रामराज्यातील राजा रामासारखा पराक्रमी व सामर्थ्यवान असला पाहिजे
. तो प्रजेला तारून नेणारा असला पाहिजे. प्रजा ही राजाची भक्त असते, हे जरी खरे असले तरी पराक्रमी राजाला आपल्या भक्तांचा अभिमान असतो. रामाच्या बाबतीत बोलायचे तर भक्ताचे रक्षण करणे, ही रामाची प्रतिज्ञा आहे. त्यासाठी तो शत्रूचा नि:पात करतो. दुष्टांचा, दुर्जनांचा बंदोबस्त करण्यासाठी राम फक्त धनुष्याची काठी (कांबि) दुष्टाच्या डोक्यावर मारतो. त्याने दुष्टाचा गर्व, ताठा, मत्सर मावळतो. असं म्हणतात की, सर्व अयोद्धापुरी रामाने विमानात बसवून वैकुंठात नेली. याचा सांकेतिक अर्थ असा की, राजा आपल्या प्रजेचे फक्त रक्षण करीत नसून त्यांची आध्यात्मिक पातळी उंचावून त्यांना सहजपणे (विमानाने) समाधानाच्या उच्च पातळीवर (वैकुंठात) घेऊन जातो. रामराज्यात लोकांचे एकमेकांविषयी प्रेम वर्धिष्णू असते. लोक सुखी आनंदी असतात.



चढता वाढता प्रेमा ।

सुखानंद उचंबळे।

संतोष समस्तै लोका ।

रामराज्य भूमंडळी ॥



रामराज्यातील सर्व प्रजा आनंदी असते
. हा आनंद म्हणजे समर्थांच्या दृष्टीने धार्मिक स्वातंत्र्याचा आनंद आहे. आध्यात्मिक आनंद आहे. भौतिक स्वरूपाचा आनंद नसल्याने तो टिकणारा आहे. भौतिक आनंद हा अल्पकालीन असतो. समर्थांच्या काळी जुलमी मुघल सत्तेच्या जाचाने लोक हवालदिल झाले होते. समर्थांनी लोकांची व धर्माची अवकळा सर्व हिंदुस्थानभर पायी फिरून न्याहाळली होती. त्यामुळे आध्यात्मिक आनंदाची म्लेंच्छांकडून जी गळचेपी झाली होती, त्याचा समर्थांना राग होता.तो आनंद रामराज्यात कसा भरभरून आहे, याचे सुरेख वर्णन समर्थांनी केले आहे.




हरिदास नाचती रंगी ।

गायने कीर्तने बरी।

रागरंग तानमाने । टाळबंधे विराजती।

प्रबंद कविता छंदे ।

धाटी मुद्रा परोपरी।

आन्वय जाड दृष्टान्ते ।

गद्ये पद्येचि औघडे ।



असा हा मुक्त आनंद रामराज्यात सर्वत्र होता
. या आनंदाची उधळण रामराज्यात दिसून येते. समर्थकाळी मुसलमानांचे सांस्कृतिक आक्रमण झाल्याने लोक या आनंदाला पारखे झाले होते. मुघलकाळात हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त होत होती. समाजाला स्वास्थ्य नसेल तर कवींना कवने स्फुरणार नाहीत. गायन, वादन इत्यादी कला कशा जोपासल्या? त्या कला बंद पडत होत्या. त्यामुळे समर्थांच्या मनात हे राज्य उलथवून हिंदवी स्वराज्य हवे असे होते. या हिंदवी स्वराज्यात रामराज्य हवे, ही त्यांची मनापासून तळमळ होती. या रामराज्यात हरिदास मोकळेपणाने नाचून, गाऊन आपला आध्यात्मिक आनंद लोकांना वाटतील व सर्वत्र संतोषाचे वातावरण होईल, हे स्वामींचे स्वप्न होते. या रामराज्यात युक्ती, बुद्धी, विद्या, कला, संगीत आणि वाद्ये यांना योग्य स्थान मिळते. कलांची प्रगती होते. कलांची प्रगती होणे हे समाजस्वास्थ्याचे लक्षण आहे.



नानायुक्ती नाना बुद्धी ।

नाना विद्या नाना कळा।

नाना संगीत सामर्थ्ये ।

नाना वाद्ये परोपरी।




असा सर्वत्र आनंदीआनंद चालल्याने रामराज्यात देवाच्या नावाचा जयघोष चालला आहे
. लोकांना हे इतके आवडू लागले आहे की, त्यांना दिवस व रात्र पुरेनाशी झाली. यात्रा, पर्वकाळ, हरिकथा ही सर्व भक्तांना पर्वणी होती. त्याचा मनसोक्त आस्वाद रामराज्यात मिळत होता.

सर्वही तोषले तोषे ।

नाम घोषेचि गर्जती ।

पुरेना दिन ना रात्री ।

यात्रा पर्वे हरिकथा ॥




 या रामराज्य प्रकरणाच्या शेवटी समर्थांनी एक अर्थपूर्ण ओवी टाकली आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्याचे रामराज्य तयार करणे, ही समर्थांच्या दृष्टीने धर्मस्थापना होती. रामदासांनी लोकांना प्रभू रामचंद्र व हनुमान यांची उपासना करायाला सांगितले. त्या उपासनेतून उपास्य दैवतासारखे शूरवीर धर्माचारी राम आणि स्वामिनिष्ठ बलभीम हनुमान रामराज्यासाठी त्यांना तयार करायचे होते. रामदासांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असले तरी स्वत:लाच फक्त मोक्षप्राप्ती व्हावी, असा विचार त्यांच्या मनात नव्हता. जनसामान्यांविषयी त्यांच्या मनात तळमळ होती. देशात अशी अराजकाची जुलमी सत्ता असताना लोकांनी कोणाकडे आशेने पाहावे, हा विचार रामदासांना सतावत होता. सारासार विचारांतून त्यांना धर्मस्थापना करायची होती, म्हणजे हिंदवी स्वराज्यासाठी सर्वतोपरी मदत करून लोकांना सन्मार्गाला लावून या देशांत ‘उदंड जाहले पाणी । स्नानसंध्या करावया।’ अशी धार्मिक स्वातंत्र्याची, स्वानंदाची, सद्विचारांची भूमी त्यांना घडवायची होती.




रामदासी ब्रह्मज्ञान।

सारासारविचारणा ।

धर्मस्थापनेसाठी ।

कर्मकांड उपासना ॥



 समर्थांनी जे रामराज्य प्रकरण लिहिले, त्यातील निवडक ओव्यांचा आधार घेऊन समर्थांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रजेला परमसुख देणारे रामराज्य परत एकदा होऊ शकेल. त्याचा आदर्श सर्वांनी आपल्यासमोर ठेवला पाहिजे. संत सज्जनांचे कैवारी, न्यायाने वागणारे, स्त्रिया, पतित, दु:खी यांना न्याय देणारे, अभय देणारे ‘रामराज्य’ मोठ्या कष्टाने उभारावे लागते. याउलट ‘रावणी राज्ये’ अनेक झाली, पुढेही होतील. पण, ती प्रजेला छळण्यासाठी. धर्मस्थापनेतून लोकांना सुखी करणारे ‘रामराज्य’ उभारण्यासाठी समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आज गरज आहे.


-
सुरेश जाखडी
@@AUTHORINFO_V1@@