तत्त्वचिंतक राजनेता

    दिनांक  24-Dec-2019 19:43:49   
|


atal_1  H x W:


भारतीय जनता पक्षाचे संस्थापक, देशाचे माजी पंतप्रधान आणि राजकीय जीवनातही कवी, तत्त्वचिंतक म्हणून आपला अमीट ठसा उमटवणार्‍या अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९५ वी जयंती. त्यानिमित्त अटलजींना अभिवादन करणारा हा लेख...भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९५ वी जयंती
. अटलजी १६ ऑगस्ट, २०१८ रोजी निर्वतले. अटलजींचे असणे हा एक मोठा आधार होता. ज्या भारतीय जनता पक्षाची उभारणी त्यांनी केली, त्या भारतीय जनता पक्षाची देदीप्यमान कामगिरी पाहण्यासाठी आज अटलजी नाहीत. देशाची एकता आणि अखंडतेसाठी कटिबद्ध असलेला कणखर नेता आज आपल्यात नाही. राजकारणात असूनही कवीमन जपणारा कवी आज आपल्यात नाही. मात्र, आजही त्यांचे विचार हे सदैव प्रेरणा देणारे आहेत. त्यांची संसदेतील आणि अन्य कार्यक्रमांमधील भाषणे नेहमीच एक नवा विचार देणारी आहेत. त्यांच्या कवितांमध्ये भारतीय राजकारण, समाजकारण यांचे समग्र प्रतिबिंब दिसते. अटलजींचे विचार हे कालातीत होते. क्षुद्र अशा पक्षीय राजकारणात ते कधीच अडकले नाहीत आणि त्यांचे व्यक्तिमत्त्वही एवढे विशाल होते की विरोधकही त्यांना त्यात अडकवू शकले नाहीत. आजच्या राजकीय परिस्थितीत अटलजींचे वेगळेपण ते हेच. लोकसभेत अवघ्या एका मताने अविश्वास ठरावावर पराभव पत्करल्यानंतरही त्यांनी विखारी राजकीय टीका केल्याचे ऐकिवात नाही. मतभेद असावेत, मनभेद नव्हे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी!आपल्या राजकीय विरोधकांना कमी लेखणे
, त्यांचा जमेल तिथे आणि तसा अपमान करणे आज सर्रास चालते. त्या पार्श्वभूमीवर अटलजींनी लोकसभेत एका भाषणात सांगितलेला किस्सा हा सर्वांसाठीच एक आदर्श आहे- ‘मी जेव्हा प्रथमच खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलो, तेव्हा पं. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. सभागृहात मी नवखा होतो, मागच्या बाकावर बसायचो. बर्‍याचदा तर बोलण्याची संधी मिळावी, यासाठी मला सभात्याग करावा लागायचा. सभागृहात चर्चेदम्यान पं. नेहरूंशी माझे वाद व्हायचे, त्यांच्या अनेक बाबींवर मी टीका करायचो. एकदा अशाच एका विषयावर मी सडकून टीका केली, वातावरण जरा तापलेच होते. त्यानंतर संध्याकाळी एका कार्यक्रमात आमची भेट झाली. त्यांनी अगदी सहजतेने माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले की, ‘आज तर तू कमालच केलीस.’ विरोधक आणि सत्ताधार्‍यांमधील असे नाते आज राजकीय नेते तर सोडाच, पण सामान्य जनांनाही झेपेल की नाही, ही शंकाच आहे.


गोपाल
-राम के नामों परकब मैने अत्याचार किए?

कब दुनिया को हिंदू करने

घर घर में नरसंहार किए?

कोई बतलाए काबूल में जा करकितनी मस्जिद तोडी?

भूभाग नहीं, शत-शत मानव काहृदय जितने का निश्चय

हिंदू तन-मन, हिंदू जीवन,रग-रग हिंदू मेरा परिचय

अशा अगदी नेमक्या शब्दांत हिंदू समाजाचे वैशिष्ट्य अटलजींनी अधोरेखित केले आहे. हिंदू समाजावर असहिष्णू असण्याचे आरोप करणार्‍यांना अटलजींनी अगदी सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय समाज हा सहिष्णू आहे, होता आणि राहिल, यावर अटलजींचा ठाम विश्वास होता. हिंदू समाजावर देशाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी निभावण्यात हिंदू समाज कधीही कमी पडणार नाही, याची ग्वाहीच अटलजींनी आपल्या या काव्यातून दिली आहे.अटलजींच्या धारणा आणि विचार हे अतिशय सुस्पष्ट होते
. सखोल अभ्यास आणि स्वतंत्र मते ही त्यांच्या विचारप्रणालीची खास वैशिष्ट्ये. भारतीयकरण म्हणजे नेमके काय हे त्यांनी अगदी सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे- भारतीयकरण हा नारा नाही, ते जीवनदर्शन आहे; ती प्रतिक्रिया नाही, ऐतिहासिक प्रक्रिया आहे. अनादी काळापासून भारतात अनेक जाती आणि जीवनप्रवाहांचा संगम होत आला आहे. संघर्ष तसेच समन्वयाच्या माध्यमातून विविध जाती भारतात अशा प्रकारे एकरूप झाल्या आहेत की, त्यांना आज वेगळे करणे शक्य नाही. लहान लहान जलधारांना आपल्यात सामावून घेत भारताची राष्ट्रीय जलधारा अविरतपणे वाहते आहे.सध्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशातील वातावरण विनाकारण पेटवण्यात येत आहे
. मुस्लीम समुदायाची जाणीवपूर्वक दिशाभूल करून देशात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अटलजींनी १३ फेब्रुवारी, १९६४ रोजी राज्यसभेत तत्कालीन उपराष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावेळी केलेले भाषण मोलाचे ठरते. त्या भाषणात अटलजींनी तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातून (आताचा बांगलादेश) येणार्‍या हिंदूंना नागरिकत्व देण्याचे जोरदार समर्थन केले होते- “आम्ही आमच्या देशात पवित्र अग्नी घेऊन आलेल्या पारशी समुदायास आश्रय दिला. तिबेटमधून आलेले बेघर बंधू आमच्या देशात राहत आहेत. असे असताना पूर्व पाकिस्तानातून येणार्‍या हिंदूंविषयी आमच्या मनात थोडीही मानवता असू नये?, त्यांच्याप्रती आम्ही कोणती भूमिका घेणार आहोत?, त्यात करावयाचे पहिले काम म्हणजे पूर्व पाकिस्तानातून जे कोणी भारतात येऊ इच्छित आहेत, त्यांना येऊ देणे आणि त्यांना भारतात वसविण्याची पूर्ण जबाबदारी घेणे.” अटलजी पुढे म्हणतात- “आमच्या देशातील काही राजकीय नेत्यांनी पूर्व पाकिस्तानात जाऊन यावे, असे माझे मत आहे. मात्र, खरी अडचण ही आहे की, हे विद्यमान सरकार सरदार पटेलांच्या भाषेत बोलू शकत नाही की, महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवू शकत नाही. येथे बसून शांतीचे उपदेश देणार्‍यांनी ढाक्यात जावे आणि तेथील हिंदूंची स्थिती स्वत:च्या डोळ्यांनी बघावी, जेणेकरून त्यांना हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराचे विदारक सत्य ध्यानात येईल.”हिंदुत्व हा आपल्या देशात नेहमीच कळीचा मुद्दा ठरत आलेला आहे
. हिंदुत्व म्हणजे ते हमखास मुस्लीमविरोधीच असणार, अशी मांडणी एक गट सातत्याने करत आलेला आहे. त्यामुळे हिंदुत्वाविषयी अन्यधर्मीयांच्या मनात नेहमीच अढी बसलेली दिसते. हिंदुत्वामुळे देशात जातीयतेचे वातावरण निर्माण होते, असा आरोप करणार्‍यांना अटलजींनी अतिशय नेमक्या शब्दांत उत्तर दिले आहे- “मला माझ्या हिंदुत्वाविषयी अभिमान आहे. याचा अर्थ असा नव्हे की, मी मुस्लीमविरोधी आहे किंवा इस्लामसोबत माझा काही वाद आहे. मात्र, ज्यावेळी धर्माला राजकारणासोबत जोडून त्याआधारे सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळी जातीयता निश्चितच वाढत असते. राजकीय सौदेबाजी करून राष्ट्राची एकता साध्य करणे कधीही शक्य नाही.” भारतीयकरणाचा आग्रह देशातील एक राजकीय प्रवाह नेहमीच धरताना दिसतो. त्या राजकीय प्रवाहावर नेहमीच संकुचित वृत्ती आणि जातीयतावादाचा आरोप लावण्यात येतो. भारतीयकरण या संकल्पनेस मागास अथवा बुरसटलेली म्हणून हिणवलेही जाते. भारतीयकरण म्हणजे मुस्लीमविरोधीच असणार, असा सूर लावणार्‍यांसाठी अटलजी म्हणतात, भारतीयकरणाचा संबंध केवळ मुस्लिमांशी नाही. भारतीयकरणाच्या अंतर्गत देशातील सर्व जनता येते. भारतीयकरणाचा एकच अर्थ आहे- भारतात राहणार्‍या सर्व व्यक्ती, मग त्यांची भाषा, धर्म, प्रदेश काहीही असो. भारताप्रती त्यांनी अनन्य, अविभाज्य आणि अव्यभिचारी निष्ठा ठेवली पाहिजे. प्रथम त्यांनी भारतीय असावे, बाकी सर्व नंतर.
धर्मनिरपेक्षतेविषयी आपल्या देशात नेहमीच विविध प्रवाह चालत आलेले आहेत
. राजकारण आणि धर्माची परस्परांशी असलेली फारकत, हा धर्मनिरपेक्षतेचा नेमका अर्थ. मात्र, राजकीय फायद्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे मुस्लीम जातीयवादास प्रोत्साहन देणे, असा सोयीस्कर अर्थ अनेक गट लावताना दिसतात. त्याविषयी अटलजी स्पष्ट शब्दांत म्हणतात- “देशात मुस्लीम जातीयवादास प्रोत्साहन देत धर्मनिरपेक्षतेस मजबूत करता येणे शक्य नाही. धर्मनिरपेक्षतेचा नारा केवळ काँग्रेस पक्षाचा नाही, तो भारतीय संस्कृतीमधील एक मंत्र आहे. स्वातंत्र्यानंतर भारतास हिंदूराष्ट्र घोषित करता येणे सहज शक्य होते, जसे पाकिस्तानने केले. मात्र, आमची संस्कृती तसे करण्याची परवानगी देत नाही. हिंदुत्वामध्ये विविध उपासना पद्धती आहेत. एकाच पुस्तकास मानले पाहिजे, अमुक याच व्यक्तीस माना; अन्यथा नरकात जावे लागेल, असा अनाठायी आग्रह आम्ही कधीच धरला नाही. मात्र, आज धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हिंदूविरोध असा घेतला जातो. तो संशय दूर करणे गरजेचे आहे.”देशाच्या कळीच्या प्रश्नांवर अटलजींनी मांडलेली मते ही आजदेखील मार्गदर्शक ठरतात
. दीर्घकाळ हिंदुत्वाचे राजकारण करतानाही अटलजींनी कधीही धर्मनिरपेक्षतेची कास सोडली नाही. हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षता एकत्र राहू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. आजच्या राजकीय अवकाशात अशी व्यक्ती विरळाच. भारतीय राजकारणामध्ये त्यांनी एका नव्या पर्वाची सुरुवात केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल करणे हेच श्रेयस्कर आहे.(संदर्भ-मेरी एक्यावन कविताए- अटल बिहारी वाजपेयी कुछ लेख कुछ भाषण- अटल बिहारी वाजपेयी, अटलजींच्या भाषणांचा संग्रह)

वैचारिक लढ्यात सामील व्हा. लाईक करा. शेअर करा. महाएमटीबी सबस्क्राइब करा.