अवकाळीग्रस्तांना मदत का नाही? फडणवीस यांचा सवाल

    दिनांक  23-Dec-2019 10:12:00
|

saf_1  H x W: 0

 


कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा सडकून टीका केली. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. सध्या कर्जमाफीची सर्वाधिक गरज अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना असताना त्यांना ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघाट केला आहे." असा आरोप फडणवीस यांनी केला. दरम्यान, कोल्हापूरमधील सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक या महाडिक बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

 

"हिवाळी अधिवेशन ही केवळ औपचारिकता होती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन हवेतच उडून गेले आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वाधिक मदतीची गरज होती. पण, त्यांना सरकारच्या योजनेचा फायदा मिळणारच नाही. तसेच, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना कर्जमाफी योजनेचा फायदा होणार नाही." असे फडणवीस यांनी सांगितले. पुढे त्यांनी सांगितले की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कर्जमाफीसाठी कालमर्यादा ठेवली आहे. परंतु, आमच्या सरकारने अवकाळग्रस्त भागाच्या कर्जमाफीसाठी कोणतीही कालमर्यादा ठेवली नव्हती." तसेच, 'अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू.' असा इशारादेखील फडणवीस यांनी दिला.

 

"अफवांवर विश्वास ठेऊ नका"

 

नागरिकत्व सुधारणा कायद्यावर (सीएए) देशभर चाललेल्या गदारोळाबद्दल त्यांनी सांगितले की, "हा नागरिकत्व देणारा कायदा आहे. आपले नागरिकत्व घेणारा नाही. काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून सामाजिक तेढ वाढवत आहेत." असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, "सीएए विरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे भारतातील नागरिक सुरक्षित राहणार आहेत त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका." असे आवाहनदेखील त्यांनी केले.