ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : विरोधी पक्षनेते

    दिनांक  21-Dec-2019 18:46:13
|


saf_1  H x W: 0

 


नागपूर : मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून २ लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आक्षेप घेत कर्जमाफीची घोषणा ही उधारीची घोषणा आहे असे सांगितले. "राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार असे आश्वासन दिले होते. परंतु, कर्ज माफ करताना शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. आम्ही आमची सत्ता असताना सरसकट माफी दिली होती. सरकार केवळ ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकित कर्ज माफ करणार असे सांगत आहे. परंतु, ही कर्जमाफी शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा पोहोचविणार?" असा सवाल त्यांनी विचारला.

 

सभात्याग केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी माध्यमांना सांगितले की, "आमची सत्ता होती तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. २०१७ ते २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे १.५ लाख रुपये माफ केले होते. त्यामध्ये केवळ सरकारी नोकर, आमदार आणि खासदारांनाच वगळण्यात आले होते. आता महाविकासआघाडी सरकारने २ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार अशी घोषणा केली आहे. ही कर्जमाफी नेमकी कशी लागू होणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. आम्ही कर्जमाफी दिली त्यावेळी पीक कर्ज आणि शेती साहित्य खरेदी अशा सर्वच खर्चांचा विचार केला होता. महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांना फायदा कसा पोहोचविणार हे स्पष्ट करावे."