सोनाई हत्याकांड : पाच आरोपींची शिक्षा कायम

    दिनांक  02-Dec-2019 17:32:10
|
soani sonai _1  
 


मुंबई : राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनाईतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तर आरोपी अशोक नवगिरेची पुराव्याअभावी मुक्तता केली आहे. जानेवारी २०१३ मध्ये सोनाईनजीक गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे हा प्रकार घडला होता. विठ्ठलवाडीतील संदीप राज धनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६), सचिन घारू (वय २३) या तरुणांची अमानुष मारहाणीत हत्या करण्यात आली होती.

 

नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये हे तिघेही काम करत होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे, असे सांगून विठ्ठलवाडीत बोलावून घेण्यात आले आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दरम्यान सचिन घारु याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते आणि याच रागातून सहा ते सात जणांनी त्यांची हत्या केली होती.

 

प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना या प्रकरणात अटक झाली. नाशिकच्या सत्र न्यायालयाने यातील अशोक फलकेला न्यायालयाने दोषमुक्त केले. तर उर्वरित सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
 

नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. या खटल्याची सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले आणि संदीप कुऱ्हे या पाचजणांना फाशीची शिक्षा सुनावली असून अशोक नवगिरे याची पुराव्याअभावी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

 

दरम्यान, या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप झाला. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला. घटना घडल्याच्या दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला. दलित संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शेवटी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता.