महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे : सरसंघचालक

    दिनांक  02-Dec-2019 10:31:59
| 

नवी दिल्ली : "महिलांशी कसे वागायला हवे, यासाठी समाजात जागृती करण्याची नितांत गरज आहे. सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे तयार केले आहेत, त्यांची योग्यरीत्या अंमलबजावणी व्हायला हवीच. परंतु केवळ सरकारवर अवलंबून उपयोगाचे नाही," असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रविवारी येथे केले.

 

"प्रत्येकच गोष्ट सरकारवर सोपवून चालणार नाही. आपल्या घरातील महिलांच्या सुरक्षेवर आपण कुठपर्यंत प्रशासनावर अवलंबून राहणार आहोत? समाजात महिलांशी कसे वागावे, कसे बोलावे, याविषयी पुरुषांमध्ये जागृती निर्माण करणे आता अगत्याचे झाले आहे," असे सरसंघचालकांनी हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील अमानुष अत्याचार व हत्येच्या घटनेच्या अनुषंगाने सांगितले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित ‘गीता महोत्सव’ कार्यक्रमात ते बोलत होते.

 

"महिलांवर अत्याचार करणार्‍या आरोपींनाही आई-बहिणी असतात. महिलांमुळेच त्यांचे अस्तित्व आहे. मात्र, या आरोपींना महिलांसोबत कसे वागावे, हेच शिकवलेले नसते. पुरुषांचा महिला व मातृशक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन शुद्ध व स्वच्छ असायला हवा. पुरुषांना महिलांसोबत योग्य वागण्याचे शिक्षण दिले, तर महिलावरील अत्याचारावर मोठ्या प्रमाणात आळा घालता येईल," असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.