महा'विकास' आघाडीचा विकासकामांनाच 'ब्रेक'

    दिनांक  02-Dec-2019 15:23:27
|

v_1  H x W: 0 xमुंबई : भारतीय जनता पक्षासोबत कधीकाळी सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने नवा संसार थाटल्यानंतर आता अनेक प्रकल्पांची समीक्षा करण्यास सुरुवात केली आहे. आरे कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आता थेट बुलेट ट्रेन प्रकल्पांची समीक्षा करणार असल्याचे म्हटले आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, "बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. भू-संपादनाला तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. वनवासींनीही त्यांच्या जमिनी देण्यास विरोध केला. त्यामुळे आम्ही या प्रकल्पाचे समीक्षण करणार आहे." त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात वेग घेणारी विकासकामे भविष्यात मंदावतील, अशी भिती नागरिकांना आहे.

आरे कारशेडला शिवसेनेने विरोध दर्शवला होता. त्यानंतर आरे कारशेडला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर आता बुलेट ट्रेनच्या कामाचे समीक्षण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत देशातील पहिल्या बुलेटट्रेनचे भूमीपूजन करण्यात आले होते. या मार्गाची एकूण लांबी ५०८ किमी इतकी आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संतुल ते गुजरातच्या साबरमतीपर्यंत हा मार्ग प्रस्तावित आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्चा एक लाख कोटींहून अधिक आहे. त्यासाठी 'जायका' या जपानी कंपनीमार्फत कर्ज घेण्यात आले आहे. मात्र, राज्यातील सरकारने या प्रकल्पांना ब्रेक लावल्यास त्यांचा खर्च आणखी वाढण्याची भीती आहे.