ठोस कारवाईची ...हीच ती वेळ

    दिनांक  02-Dec-2019 20:50:56
|


saf_1  H x W: 0

 

 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली बोर्डाची पहिली वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत निवड समितीचा कार्यकाळ आणि गांगुलीच्या अध्यक्षीय कार्यकाळाविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर माहिती देताना गांगुली यांनी क्रिकेटमधील काही गंभीर विषयांवर बोट ठेवले. क्रिकेट सामन्यांदरम्यान होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी परखडपणे भाष्य केले. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या सामन्यांतही सट्टेबाजांनी क्रिकेटच्या खेळाडूंना संपर्क केल्याची माहिती आमच्या हाती लागल्याचे गांगुली यांनी सांगितले. याचा अर्थ अगदी सरळ आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट या खेळाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आजतागायत कायम असल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गांगुलीच्या या विधानांनंतर अनेक क्रिकेट जाणकारांनी आपले मत नोंदवले. क्रिकेट विश्वाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड कायमची मिटविण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह (आयसीसी) प्रत्येक देशांच्या क्रिकेट नियामक मंडळाने विविध नियमावली तयार केल्या. मात्र, हा भ्रष्टाचाराचा विळखा दिवसेंदिवस आणखीनच घट्ट होत चालला आहे. 'बुकीज'ने संपर्क साधल्याची माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल-हसनवर आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातल्याचे आपण सर्वांनी पाहिले. मात्र, या कठोर शिक्षेनंतरही क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचा विळखा घटण्याऐवजी आणखीनच वाढत चालला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून भ्रष्टाचाराचे हे लोण आता घरगुती क्रिकेट सामन्यांमध्येही पसरत आहेत. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा ही भारताची घरगुती क्रिकेट स्पर्धा आहे. अशा सामन्यांदरम्यानही एका खेळाडूला बुकीजने संपर्क केल्याची माहिती बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) हाती आली असून याची चौकशी सुरू आहे. घरगुती क्रिकेट स्पर्धांमध्ये असे प्रकार घडत असतील तर लीग क्रिकेटमध्ये काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे अशा प्रकारांना वेळीच आवर घालण्यासाठी ठोस कारवाईची आता योग्य वेळ आली असून बीसीसीआय अध्यक्षांकडून हीच एक अपेक्षा!

 

'लीग'चा 'गेमओव्हर'?

 

नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेदरम्यान सट्टेबाजांनी एका खेळाडूला संपर्क केल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. गांगुली यांनी यावेळी संबंधित खेळाडूंचे नाव घेण्यास नकार दिला, हे योग्यच आहे. या संपूर्ण प्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागामार्फत चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सामना निश्चितीसाठी 'बुकीज'नी खेळाडूंशी संपर्क साधला होता, असेही ते यावेळी म्हणाले. सय्यद मुश्ताक अली या घरगुती क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांदरम्यान असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे क्रिकेटमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून यासाठी ठोस पावले उचलण्याच्या विचारात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ विचार करत असल्याच्या मुद्द्याकडे यावेळी त्यांनी लक्ष वेधले. भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक ते सर्व पर्याय आम्ही पडताळून पाहणार असून भ्रष्टाचार आणि क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या क्रिकेटच्या लीग बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. गांगुली यांच्या या विधानानंतर भारतातील क्रिकेट लीग स्पर्धेचे सामने बंद होणार की काय? या चर्चेने जोर धरला असून आता इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) भवितव्य काय? असा सवाल क्रिकेटच्या चाहत्यांकडून विचारला जात आहे. आयपीएलबाबत क्रिकेटच्या चाहत्यांना पडलेला सवाल हा योग्यच आहे. २०१३ साली सर्वात आधी आयपीएल स्पर्धेदरम्यानच 'स्पॉट फिक्सिंग'चे प्रकरण उजेडात आले आणि संपूर्ण क्रिकेट विश्व ढवळून निघाले. या प्रकरणात अडकलेले खेळाडू क्रिकेट विश्वात आज अस्तित्वात नसले तरी या प्रकाराने आयपीएल स्पर्धेची संपूर्ण जगभरात बदनामी झाली. आयपीएलसोबत भारतात कर्नाटका क्रिकेट प्रीमिअर लीग (केपीएल) आणि तामिळनाडू क्रिकेट प्रीमिअर लीग (टीएनपीएल) या स्पर्धाही प्रसिद्ध आहेत. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेतील खेळाडू अशा प्रकारांतून वाचले नाही, तेथे राज्यांतील लीग स्पर्धांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सौरव गांगुली यांनी लीग स्पर्धांबाबत केलेल्या विधानाचे अनेक क्रिकेट जाणकारांनी स्वागत केले असून लीग स्पर्धा बंद झाल्यास गांगुलीचा निर्णय योग्यच, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

 

- रामचंद्र नाईक