आरे खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा घाट : अॅड. आशिष शेलार

    दिनांक  19-Dec-2019 14:32:58
|

UT _1  H x W: 0

 


आरे हे जंगल घोषित करणार की त्यातील भूखंड निवासी आरक्षित करणार?

 

नागपूर : आरे ला जंगल घोषित करू असे आश्वासन दिलेल्या शिवसेनेने सत्तेत आल्यावर मुंबईकरांच्या मेट्रोच्या कारशेड च्या कामाला स्थगिती दिली त्याच शिवसेनेने आता आरे तील आदिवासीपाडे स्थलांतरित करून हा पट्टा निवासी करून खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे.

 

विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांवर बोलताना शिवसेना सदस्य रवींद्र वायकर यांनी अशी भूमिका मांडली की, आरे मधील आदिवासी पाडे व विविध ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकामे पुनर्विकासित करण्यासाठी आरे मधील एका मोठ्या भूखंडावर विकास आराखड्या अंतर्गत निवासी आरक्षण करून या पट्ट्यातील घरांना पुनर्विकासित करावे. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासह अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनी आक्रमकपणे आरेतील भूखंड हडप करण्याचा हा डाव असल्याचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेच्या या भुमिकेवर जोरदार आक्षेप घेतला.

 

याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, आरे मध्ये जे आदिवासी पाडे आहेत येथील लोकांना सोई सुविधा देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना चांगले रस्ते पाणी, वीज, आरोग्याच्या सोई सुविधा, पक्की घरे मिळालीच पाहिजेत सोबत त्यांच्या संस्कृती व कलेचे जतन ही झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे मात्र आदिवासींच्या नावावर त्यांना स्थलांतरी करून त्यांच्या जमिनी विकासकांना देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल तर तो आम्ही हाणून पाडू.
 

मुंबईकरांसाठी आवश्यक असणाऱ्या मेट्रो कारशेडचे काम ज्या शिवसेनेने बंद पडले त्या शिवसेनेचे सदस्य आरेतील भूखंड निवासी करा अशी मागणी करीत आहेत. हा आरेतील भूखंड खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असेल तर तो आम्ही हाणून पडू असा इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.