कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यांवरून भाजप आक्रमक

    दिनांक  18-Dec-2019 11:54:39
|


फडणवीस _1  H x


नागपूर : महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन राज्याच्या राजधानीचे शहर नागपूर येथे सुरु आहे. अधिवेशन काळात विधानसभेच्या सर्व सदस्यांच्या निवासाची व्यवस्था आमदार निवास याठिकाणी करण्यात आली आहे. परंतु येथील ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेमुळे या आमदारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होत आहे. त्याचबरोबर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर देखील मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. विधानसभेच्या आजच्या कामकाजातही चंद्रकांत दादा पाटील व देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या व महापौरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. तसेच विधानसभेच्या महिला सदस्यांनी देखील आमदार निवासस्थानातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली.याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काळजी व्यक्त केली. ते म्हणाले
,"काल ज्याप्रकारे नागपूर शहाराचे महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर गोळीबार झाला. ही अत्यंत गंभीर बाब आहे,जर महापौर सुरक्षित राहणार नसतील, तर कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे चालेल? मला वाटते की याची अत्यंत गांभिर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे." पुढे ते म्हणाले, "आम्ही सरकारकडे देखील मागणी करणार आहोत की, या घटनेची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारचे जे आरोपी आहेत, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. यासाठी आम्ही निश्चितपणे सरकारवर दबाव देखील आणणार आहोत", अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी माध्यमांना दिली आहे.