'पुरुषार्थ' असा करावा लागतो

    दिनांक  15-Dec-2019 18:36:52   
|

Amit Shah _1  H

 


पाकिस्तानातून साठच्या दशकापर्यंत शरणार्थी हिंदूंच्या झुंडी भारतात आल्या. पूज्य बाबासाहेबांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. हिंदू भारतात येणार, नाही तर कुठे जाणार? भारत सोडून त्याला जगात कुठली भूमी नाही. भारत ही त्याची पुण्यभूमी, देवभूमी, मातृभूमी आणि कर्मभूमी आहे. ते आपलेच बांधव आहेत. त्यांना जवळ करणे हे आपले परमकर्तव्य आहे.

 

बुधवार, दि. ११ डिसेंबर रोजी 'नागरिकत्व सुधारणा विधेयक' राज्यसभेत १२५ विरुद्ध १०५ मतांनी मंजूर झाले. देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. १९४७ साली आपल्या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. मुसलमानांनी पाकिस्तान मिळविला, मातृभूमीचे तुकडे केले. १९४७च्या अगोदरही आपला गांधार अफगाणिस्तान झाला आणि १९७१साली बांगलादेश निर्माण झाला. हे तिन्ही देश मुस्लीम देश आहेत आणि ते पवित्र कुराण आणि शरियतच्या कायद्याने चालतात.

 

या देशात राहणारे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन यांना काफर समजले जाते. त्यांचा प्रचंड धार्मिक छळ होतो. पूर्वीच्या अखंड पाकिस्तानात (बांगलादेश धरून) जवळजवळ २७ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या पाच टक्क्यांहूनही कमी झाली आहे. त्यांना तेथे जगणे अशक्य करून टाकले. पूर्व पाकिस्तानामधून साठच्या दशकापर्यंत शरणार्थी हिंदूंच्या झुंडीच्या झुंडी भारतात आल्या. पूज्य बाबासाहेबांनी याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. हिंदू भारतात येणार, नाही तर कुठे जाणार? भारत सोडून त्याला जगात कुठली भूमी नाही. भारत ही त्याची पुण्यभूमी, देवभूमी, मातृभूमी आणि कर्मभूमी आहे. ते आपलेच बांधव आहेत. त्यांना जवळ करणे हे आपले परमकर्तव्य आहे.

 

त्या कर्तव्याचे पालन नेहरू विचारधारेच्या काँग्रेसने कधी केले नाही. ४८ साली पाकिस्तानातून अनेक शरणार्थी काश्मीरमध्ये आले. नेहरूंच्या ३७० कलमामुळे त्यांना भारताचे नागरिकत्वही मिळाले नाही. नागरिकत्व नाही, म्हणून कोणताही राजकीय अधिकार नाही. मतदान करता येत नाही. सरकारी नोकरी मिळविता येत नाही. आपल्याच घरात कधी कोणी उपरा होतो का? ही किमया नेहरू-काँग्रेसने करून दाखविली.

 

बुधवारी हे पाप नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी धुवून टाकले. बुधवारी दत्त जयंती होती. दत्तात्रयाचा अवतार गुरुरुपात झाले असे मानण्यात येते आणि अवताराचे मुख्य कार्य सनातन धर्माचे रक्षण करणे होय. धर्मरक्षण याचा अर्थ धर्मपालन करणार्‍यांचे रक्षण आणि धर्मपालन करणार्‍यांना 'हिंदू' असे म्हणतात. दत्तात्रयाचे आंशिक अवतार कधी स्वामी समर्थ, कधी साईबाबा, कधी गजानन महाराज इत्यादींच्या रुपात प्रकटले. त्यांनी त्या-त्या काळाच्या परिस्थितीच्या संदर्भात सनातन धर्म म्हणजे काय आणि त्याचे आचरण कसे करायचे, याचे मार्गदर्शन केले. आज असे म्हणायला हरकत नाही की, घटनात्मक राज्य चालवित असताना या सनातन धर्माचे पालन कसे करायचे, ते नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी करून दाखविले आहे. याचा अर्थ नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दत्तात्रयाचे अंशिक अवतार आहे असे नाही आणि असा करूही नये. ते क्षात्रधर्मीय राजकारणी आहेत आणि त्यांनी क्षात्रधर्माचे पालन केले, असे आपण म्हणू शकतो.

 

भारतात शरणार्थी म्हणून जे येतात, त्यात मुसलमान सोडून सर्वांचा समावेश केला गेला आहे. ख्रिश्चनांचाही केला गेला आहे. तो कशासाठी? अन्य धर्मीय लोक भारतात जन्मलेल्या धर्माचे अनुयायी आहेत. त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये फरक असला तरी मूलभूत सांस्कृतिक एकता त्यांच्यात आहे. ती सर्वधर्म अस्तित्त्ववादी आहे. सर्वव्यापी आहे. मानवाचा मानव म्हणून विचार करणारे आहेत आणि त्यामुळे प्रत्येक धर्म मानवतावादच सांगत राहतो. यात ख्रिश्चन धर्मीय लोकांना का सामावून घेतले? युरोपमधील याचा इतिहास विपरीत आहे. पंधराव्या शतकात स्पेनची राणी इसाबेला हिने तिच्या काळात दहा हजार लोकांना जे तसे ख्रिश्चनच होते, त्यांना पाखंडी म्हणून ठार मारले. असहिष्णुतेच्या बाबतीत ख्रिश्चन धर्म इस्लामशी स्पर्धा करतो.

 

असे असले तरी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथे ख्रिश्चन धर्मीयांचा छळ होतो. त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये बॉम्बस्फोट होतात. थोडा व्यापक विचार केला तर ते आपलेच वंशबांधव आहेत. काही कारणांमुळे त्यांना आपला सनातन धर्म बदलावा लागला. ते काही जेरुसलेममधून इथे आलेले नाहीत किंवा व्हॅटिकनमधून (रोममधून) येथे आलेले नाहीत. ते आपलेच रक्तबांधव असल्यामुळे त्यांना आपल्या देशात सामावून घेणे, आपले कर्तव्य आहे. तसेही भारतातील बहुसंख्य ख्रिश्चन आपली मूळ जात कधीही विसरत नाही. आपण कधी ख्रिश्चन झालो, याचा इतिहास त्यांना माहीत असतो. आपल्याच दुर्बलतेमुळे ते आज ते या अवस्थेत राहिलेले आहेत. पण हा विषय थोडा वेगळा आहे. आपलेच बांधव समजून त्यांना जवळ करणे यात काही गैर नाही.

 

वर दिलेल्या कोणत्याही मुस्लीम देशात मुसलमानांचा धार्मिक छळ होत नाही. शिया आणि सुन्नी एकमेकांना मारत असतात. ते दोघेही मिळून अहमदिया मुसलमानांना मारतात. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी एकमेकांना मारावे की मिठी मारावी हे त्यांनी ठरवायचे. असे असहिष्णु बनून एकमेकांना मारणारे आपल्या देशात नकोत. ८०० वर्षांचा त्यांच्या राजवटीचा आपण अनुभव घेतलेला आहे. देशाला आता दुसरा औरंगजेब नको आणि बाबरही नको. म्हणून या विधेयकाचे सामान्यातील सामान्य हिंदूंनी स्वागत केले आहे.

 

फक्त शिवसेनेचे पाय डळमळले. लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला आणि राज्यसभेत संजय राऊत यांनी सवयीप्रमाणे घणाघाती भाषण केले. 'तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात, त्याचे आम्ही हेडमास्टर आहोत', 'बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी हे आमचे हेडमास्टर आहेत', 'आम्हाला हिंदुत्वाचे आणि देशभक्तीचे प्रमाणपत्र कोणीही देऊ नये,' असे प्रमाणपत्र कुणी कुणाला देत नसते. ते आपल्या कृतीने मिळवावे लागते. राज्यसभेतून पळ काढून अशी प्रमाणपत्र मिळत नसतात. जे प्रमाणपत्र मिळते ते 'पळपुटे सैनिक' असे मिळते.

 

संजय राऊत यांनी आपल्या 'डायलॉगबाजी'मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, आणि बाळासाहेब ठाकरे यांची नावे घेतली. श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदुच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये गेले आणि त्यांचा मृतदेह तिथून बाहेर आला. अटल बिहारी म्हणाले, "हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू, मेरा परिचय" बाळासाहेब ठाकरे म्हणाले,"होय, आम्ही बाबरी मशीद पाडली, आहे कुणाची हिंमत आम्हाला हात लावायची?" आज बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते? "या सगळ्या पाकड्यांना देशातून हाकलून लावले पाहिजे." तुम्ही त्यांना हाकलून लावण्याच्या विधेयकावर मत देण्याऐवजी पळालात. कशाला या थोर पुरुषांची नावे घेता?

 

अमित शाहांनी विचारले की, "शिवसेनेने लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला होता. मात्र, एका रात्रीत असे काय घडले की, त्यांनी आपली भूमिका बदलली." अमित शाहांना याचे उत्तर माहीत आहे. ते उत्तर आहे, 'शिवसेना' आता 'सोनियासेना' झाली आहे. रोमच्या सोनिया जे सांगतील ते मुख्यमंत्रिपद टिकविण्यासाठी करावे लागेल. हिंदुत्व वगैरे सर्व ठीक आहे, पण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची ही सर्वात महत्त्वाची.

 

या विधेयकावर पाकिस्तानने थयथयाट करणे स्वाभाविक आहे. परंतु, भूतपूर्व जेलनिवासी चिंदबरम यांनी राज्यघटनेचा हवाला देऊन भाषण करणे आणि सिब्बल यांनी द्विराष्ट्र सिद्धांताचे जनक आम्ही नाही, सावरकर आहेत, असा शोध लावणे, म्हणजे अतीच झाले. राज्यघटना असे सांगत नाही की, घुसखोरांना तुम्ही नागरिक करून घ्या, देश धर्म, संस्कृती आणि संविधान यांच्याशी शत्रुत्व करणार्‍या लोकांना नागरिक बनवा. चिदंबरम साहेबांनी पुन्हा जेलमध्ये जाण्याची वेळ येईल तेव्हा संविधानाची प्रत बरोबर घेऊन जावी आणि तिचे गहन अध्ययन करावे. कायदेशीर अध्ययन त्यांनी केले आहे. त्यांना गरज आहे ती, संविधानाच्या आत्म्याची ओळख करून घेण्याची.

 

सिब्बल साहेबांनी काँग्रेस स्थापनेपासूनचा काँग्रेसचा इतिहास वाचावा. बद्रुद्दिन तय्यबजी काँग्रेसचे १८८७ साली अध्यक्ष झाले. त्यांनी अध्यक्षीय भाषणात द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला आहे. मुसलमान आणि हिंदू एक नव्हेत, हा काँग्रेस अध्यक्ष बद्रुद्दिन यांचा शोध आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे जनक सर अय्यद अहमद खान हे द्विराष्ट्रवादाचे पिताश्री आहेत. १८७५पासूनच त्यांनी मुसलमान, हिंदूंपासून वेगळे आहेत, ते अलग कौम आहेत, असा विषय मांडायला सुरुवात केली. हा माणूस अतिशय लबाड आणि धूर्त होता. महम्मद अली जिना आणि कवी इक्बाल यांचे ते प्रेरणास्थान झाले. सिब्बल साहेबांनी हा काँग्रेसचा इतिहास पाटी घेऊन गिरविला पाहिजे.

 

नंतरच्या काळात नेहरू आणि गांधी यांनी पाकिस्तानची मागणी केली. त्यांनी मनात आणले असते तर देश अखंड ठेवण्यासाठी संघर्ष केला असता. या प्रश्नाचा कायमचा सोक्षमोक्ष लावला असता. ते क्षात्रतेज गांधीकडे नव्हते आणि नेहरूंकडे असण्याचा प्रश्न नव्हता. मोदी आणि शाह यांच्यात ते आहे, म्हणून त्यांनी पुरुषार्थ करून दाखविलेला आहे. त्याला हिंमत आणि धाडस लागते. सिब्बल आणि चिदंबरम क्षात्र परंपरेत न वाढल्यामुळे भयभीत झालेले आहेत.

 

शेवटी कुणी काही म्हणोत, सामान्य जनता अत्यंत खूश आहे. कोणत्याही सामान्य माणसाशी संवाद करा. तो असे म्हणत नाही की कांदा १२५ रु. किलो झाला, भाज्या महागल्या, महागाई वाढली, तो म्हणतो हिंदू म्हणून जगण्याचा मला सन्मान प्राप्त झाला आहे. मोदी आणि शाहांचा मला अभिमान आहे.