
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट परिसरातील तळांवर बॉम्ब्सचा वर्षाव केला. या हल्ल्याचा थरार आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी बालाकोट या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटात कोण कलाकार दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले, 'बालाकोट एअर स्ट्राइक ही घटना आपल्या देशातील शौर्य, देशभक्ती आणि देशप्रेमाच प्रतीक आहे. हा चित्रपट भारतीय सैन्यातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा माझा प्रयत्न आहे.'
बालाकोट हवाई स्ट्राईक कारवाईनंतर पाकिस्ताननं भारतीय हद्दीत 'एफ-१६' या लढाऊ विमानांनी घुसखोरी केली होती. यावेळेस हवाई दलाच्या मिग-२१ बायसन विमानानं पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडलं. पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानाचा पाठलाग करतानाच अभिनंदन वर्तमान यांचं मिग-२१ विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं. विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर अभिनंदन यांनी पॅरशूटच्या मदतीने खाली उडी मारली. पण चुकून ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोहोचले. यानंतर अभिनंदन यांना पाक सैन्यानं आपल्या ताब्यात घेतलं. हा सगळा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.