मॅरेथॉन विजेत्या ‘सायवन एक्सप्रेस’वर कौतुकांचा वर्षाव

14 Dec 2019 23:10:49

v_1  H x W: 0 x


खानिवडे (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या नवव्या मॅरेथॉन स्पर्धेतआपल्या नेहमीच्या वेशभूषेत भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावणार्‍या ‘सायवन एक्सप्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवणार्‍या विमल बाबू पाडावळे या ७१ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे वसईतून मोठे कौतुक होत आहे. तिला पाहताच ‘सायवन एक्सप्रेस आली’ म्हणत तिच्या भोवती लोक गोळा होताना दिसत आहेत.


जबरदस्त इच्छाशक्ती असली की माणूस ध्येय गाठतो व विजयी होतोच
. नुकतीच झालेली वसई-विरार शहर महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन विमल बाबू पाडावळे या ७१ वर्षीय ज्येष्ठ महिलेने द्वितीय क्रमांक पटकावला. मागील वर्षी तिला प्रथम क्रमांक मिळाला होता. वज्रेश्वरी रोडवरील सायवन गावातील छोट्याशा पाड्यात ही महिला राहते. या वयातही तिच्यातील असलेल्या उत्साहाबद्दल व फिटनेसबाबत तिला विचारले असता तिने सांगितले की, “मी ज्या गरिबीत, दारिद्—यात जन्मले व काबाडकष्ट करत मोठी होत गेले, तसे आजही कष्ट उपसत आहे. त्यामुळे मी फीट आहे. मात्र, धावावे लागेल म्हणून डोंगर-दर्‍यातील पायवाटेवर धावण्याचा सराव केला. यामुळे मला धावताना फायदा झाला.”


पारंपरिक वेश लुगडं व पोलका त्यावर टीशर्ट धारण करून अनवाणी पायाने तिने हे ध्येय साध्य केले
. ना ब्रॅण्डेड कपडे ना ब्रॅण्डेड शुज, कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता ती धाव धाव धावली व जिंकली, तिच्या या जिद्दीला त्रिवार सलाम. मॅरेथॉन, कला क्रीडा महोत्सवातून अशा प्रकारची प्रतिभा दिसून येते. सदर महिलेची जिद्द पाहून आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षितिज ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, आयुक्त बळीराम पवार, महापौर प्रवीण शेट्टी व नगरसेवक विलास बंधू चोरघे यांनी खास कौतुक केले आहे.

Powered By Sangraha 9.0