केळीची पाने खाणारा 'केळकर' मुंबईत दाखल ; मुंबईतील फुलपाखरांमध्ये नवी भर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019   
Total Views |

tiger_1  H x W:


वसई, नागला, ठाणे आणि तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये 'केळकर'ची नोंद


मुंबई (अक्षय मांडवकर) - केळीच्या पानांचा कर्दनकाळ ठरणारे 'बनाना स्किपर' नामक फुलपाखरू मुंबई महानगर प्रदेशात दाखल झाले आहे. वसई, नागला आणि तुंगारेश्वर अभयारण्यामधून या फुलपाखराची नोंद करण्यात आली आहे. ईशान्य भारतात मूळ असणारे हे फुलपाखरु अपघाताने केरळमध्ये दाखल झाल्यानंतर संपूर्ण पश्चिम घाटामध्ये पसरले. आता ते मुंबईतही दिसू लागल्याने येथील फुलपाखरांच्या यादीत नव्या प्रजातीची भर पडली आहे.

  
tiger_1  H x W: 
 
 

रंगीबेरंगी फुलपाखरांच्या काही अळ्या विशिष्ट झाडांसाठी कर्दनकाळ ठरतात. त्यामध्ये 'बनाना स्किपर' या फुलपाखराच्या अळ्यांचा समावेश होतो. केळीचे झाड या फुलपाखराची खाद्यवनस्पती आहे. त्यामुळे 'बनाना स्किपर'च्या अळ्या मोठ्या प्रमाणात केळीची पाने फस्त करतात. मुंबईच्या आसपासच्या हरितक्षेत्रामध्ये आता हे फुलपाखरु आणि त्याच्या अळ्या दिसू लागल्या आहेत. मात्र, या फुलपाखराचे मूळ हे ईशान्य भारतातील आहे. सहा वर्षांपूर्वी अपघाताने या फुलपाखराच्या अळ्या केळ्याच्या झाडांबरोबर केरळ राज्यात दाखल झाल्या. त्यानंतर केरळमध्ये या फुलपाखराचा विस्तार झाला. गेल्या सहा वर्षांमध्ये हे फुलपाखरु संपूर्ण पश्चिम घाटात दिसू लागले आहे.

 

tiger_1  H x W: 
 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये 'बनाना स्किपर'ची नोंद झाल्यानंतर २०१७ मध्ये निसर्गप्रेमी तुषार भागवत यांनी या फुलपाखरच्या अळीची अलिबागमधून नोंद केल्याची माहिती अभ्यासक परेश चुरी यांनी दिली. गेल्या महिन्यात हे फुलपाखरु सागर सारंग, तेजस मेहेंदळे आणि गौरव खुळे या फुलपाखरु निरीक्षकांना वसईतील तुंगारेश्वर अभयारण्यात दिसले. त्यानंतर गेल्या आठवड्यात 'बनाना स्किपर'च्या अळ्या वसईतील मुळगाव आणि नागला वनपरिक्षेत्रामध्ये फुलपाखरूप्रेमी अजय नाडकर्णी आणि परेश चुरी यांना आढळून आल्या. तर वन विभागाचे अधिकारी निलेश चांदोरकर यांनाही नोव्हेंबर महिन्यात ठाण्यातील येऊर वनपरिक्षेत्रात हे फुलपाखरू आढळून आले. केरळमध्ये 'बनाना स्किपर' दाखल झाल्यानंतर त्या राज्यात जलदगतीने त्याचा विस्तार झाला. मात्र, पश्चिम घाटामध्ये त्याच्या विस्तार होण्यास बराच अवधी लागला असून अलिबागनंतर तीन वर्षांनी हे फुलपाखरु मुंबई आसपासच्या परिसरात दिसल्याचे, चुरी यांनी सांगितले.

 

जैविक नियंत्रण

'बनाना स्किपर'च्या अळ्यांच्या वाढत्या संख्येवर जैविक नियंत्रण तयार झाल्याची माहिती फुलपाखरु संशोधक हेमंत ओगले यांनी दिली. कावळे, बुलबुल, कोकीळसारखे पक्षी या अळ्या खात असून काही परजीवी किटक 'बनाना स्किपर'च्या अंड्यांमध्ये आपली अंडी सोडून त्यांच्यावर नियंत्रण मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

'केळकर' असे नामकरण

'महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा'ने नुकतेच फुलपाखरांचे मराठी नामकरण केले आहे. यामध्ये 'बनाना स्किपर फुलपाखरा'चे मराठी नाव 'केळकर' असे ठेवण्यात आले आहे.

 

मुंबईच्या फुलपाखारांच्या यादीत भर

'मुंबई महानगर परिक्षेत्रा'त सुमारे १५० प्रजीतींची फुलपाखरे आढळतात. त्यामध्ये आता 'बनाना स्किपर' फुलपाखराची भर पडली आहे. कारण, प्रथमच या फुलपाखराची नोंद मुंबईतून करण्यात आली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@