आधाराची ‘सावली’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2019
Total Views |

mansa_1  H x W:




मुंबईतील भांडुप उपनगरात ‘सावली फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या गणेश जाधव या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनप्रवासाविषयी...


भांडुपमधील एका गरीब घरात जन्मलेल्या गणेश जाधव याने त्याच्या कार्यामुळे समाजसेवेच्या क्षेत्रात एक उंच भरारी घेतली आहे. टेंबीपाडा येथे चाळीत बालपण गेलेल्या गणेशच्या घरात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार. मात्र, घरची परिस्थिती अत्यंत सामान्य. वडील कामगार आणि आई गृहिणी. आर्थिक परिस्थिती थोडी दोलायमान असली तरी आईवडिलांनी मुलांना संस्कार देताना कसलीही कसूर होऊ दिली नाही.गणेशने आपले शालेय शिक्षण नवजीवन विद्यामंदिर या शाळेतून पूर्ण केले. अगदी शालेय जीवनापासूनच गणेशला सामाजिक कामाची आवड होती. याच जिद्दीतून गणेश भरपूर मेहनत करायचा आणि घरच्या आर्थिक परिस्थितीला पाठबळ देण्यासाठी गणेशने अनेक छोट्या-मोठ्या नोकर्‍यादेखील केल्या.

एकीकडे घराला चार पैशांची का होईना, पण गणेशच्या कामातून मिळत होती, तर दुसरीकडे गणेश आपल्या सामाजिक कामाची आवडही जोपासत होता. त्याच आवडीचे पुढे ‘सावली फाऊंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक कार्यात रुपांतर झाले. गणेशचे बालपण चाळीत गेल्याने त्याने अनेक समस्या अगदी जवळून पाहिल्या होत्या. प्रत्यक्ष अनुभल्या होत्या. त्यामुळे आपल्यासारखे कष्टप्रद बालपण इतर मुलांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून गणेशने ‘सावली फाऊंडेशन’ची मुहूर्तमेढ रोवली. या सामाजिक कार्यात गणेशला त्याच्या आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता.

गणेशने या संस्थेच्या माध्यमातून भांडुपमधील अनेक गरीब-गरजू मुलांना शैक्षणिक मदत केली. या संस्थेचे काम सुरू झाल्यानंतर गणेशला अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागले. “तू असल्या नसत्या उठाठेवी का करतोस?” म्हणून गणेशला अनेक जणांनी हिणवले. हे काम करण्यापेक्षा इतर काही कामं करण्याचाही सल्ला दिला. मात्र, गणेशने लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, इतर कोणत्याही अडचणींना भीक घातली नाही. आपले काम तो आजही तितकेच निष्ठापूर्वक करतो. गणेशने दिलेल्या मदतीच्या हातामुळे आज कित्येक गरजू मुलांची स्वप्ने पूर्ण होत आहेत. भांडुपमध्ये मोठ्या प्रमाणात नशा आणि अमली पदार्थांचे तरुणांना व्यसनाच्या आहारी नेणार्‍या टोळ्या सक्रीय आहेत. यात विशेषत्वाने गरीब मुलांची फसवणूक करुन त्यांना नशेच्या दरीत अगदी नकळत ढकलले जाते. यासाठी गणेशला काही ठोस काम करावयाचे होते. म्हणूनच या मुलांसाठी आपल्या संस्थेकडून नशामुक्तीचे काम त्याने सुरू केले. पण, हे काम इतके सोपे नक्कीच नव्हते. कारण, या नशेच्या दुनियेत ही मुले आकंठ बुडाली होती. पण, गणेशने अनेक व्यसनाधीन मुलांना या गर्तेतून बाहेर काढले. त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिरे ठेवली. त्यांना शिक्षणाची गोडी लावून वह्यापुस्तकांमध्ये गुंतवले. त्याचबरोबर गणेशने गरीब कुटुंबांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे कामही सुरू केले. याशिवाय महिलांसाठी प्राथमिक रोजगाराच्या संधी निर्माण करुन त्यांना स्वावलंबनाचा मार्ग ‘सावली फाऊंडेशन’ने दाखवला आहे. अशिक्षित महिलांना शिक्षणाअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी महिला आणि मुलींला शिक्षण देण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यामुळे आज अनेक महिलांना आर्थिक बळ मिळाले आहे. वैद्यकीय मदतीसाठी गणेशने भांडुपमध्ये ‘सावली’ संस्थेकडून रुग्णवाहिकाही सुरू केली. आज या संस्थेकडून तीन रुग्णवाहिका भांडुपमध्ये २४ तास उपलब्ध आहेत.

सावली फाऊंडेशन’ला सुरुवातीला नागरिकांचा खूपच कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, जसे जसे या संस्थेचे काम सर्वांपर्यंत पोहोचत गेले, तसा नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिला. आज ‘सावली’ संस्था भांडुपमधील एक नावाजलेली सामाजिक संस्था असून या संस्थेचा पसाराही खूप वाढला आहे. गणेशने या संस्थेचा विस्तार करण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. गणेशने आपल्या संस्थेला आपल्या कष्टाच्या पैशांतून मोठे केले आहे. आज संस्थेच्या माध्यमातून २०० पेक्षा जास्त मुले शिक्षण घेत आहेत. या संस्थेकडून अनेक वृद्धाश्रमांनाही दत्तक घेण्यात आले असून वृद्धांसाठी ही संस्था कार्यरत आहे.


गणेशला संस्थेच्या सामाजिक कार्यांत त्याच्या भावाची
, मंगेशचीही साथ लाभल्याने संस्थेचा आवाका वाढला आहे. आज एका गरीब घरातल्या मुलाने शेकडो मुलांना, मातांना, वृद्धांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवन सुखकर केले आहे. या सर्व कर्तृत्वाचा गणेशला कोणताही गर्व नाही. “उलट माझ्यासारखे कठीण जीवन कुणाच्याही वाट्याला येऊ नये, म्हणून मी हे काम करतोय,” असे गणेश अभिमानाने सांगतो.

आज गणेशच्या आईवडिलांना त्याचा खूप अभिमान आहे. कारण, त्याने स्वत:सोबतच त्याच्या कुटुंबीयांचे नाव संपूर्ण भांडुपमध्ये मोठे केले आहे. गणेशकडून प्रत्येक वर्षी गुणीजनांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यास आजपर्यंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सकपाळ यांच्यापासून अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली आहे. ‘सावली फाऊंडेशन’चे काम संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याचा गणेशचा मानस आहे. यासाठी गणेशला अनेक शुभेच्छा...!

- कविता भोसले

 

@@AUTHORINFO_V1@@