रिक्षाचालकाची पोर ते यशस्वी उद्योजिका

    दिनांक  12-Dec-2019 23:11:04   
|

pramod_1  H x W
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्ससाठी उज्ज्वला गायकवाड यांनी सेवा दिलेल्या आहेत. ५०० हून अधिक जाहिराती मोहिमा त्यांनी राबविलेल्या असून हजारहून अधिक ग्राहकांना त्यांनी सेवा दिलेल्या आहेत. येत्या काही वर्षांत मुद्रणक्षेत्रात स्वत:चं वलय निर्माण करण्याचं उज्ज्वला गायकवाड यांचं स्वप्न आहे.


ब्रा-फोर्ट-कांदिवली... मुंबई लोकलच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही तिन्ही वेगवेगळी टोकं. ही टोकं मात्र तिच्यासाठी आयुष्याची टोकं होती. त्यातलं एक टोक घराचं, दुसरं टोक शिक्षणाचं तर तिसरं टोकं रोजीरोटीचं होतं. अवघा ८०० रुपये पगार तिला मिळायचा. त्यातून तिने शिक्षण पूर्ण करत स्वत:चा व्यवसाय उभारला. रस्त्यांवर दिसणारे नामांकित ब्रॅण्डचे बॅनर्स संपूर्ण देशांत लावण्याचे काम तिची कंपनी करते. संघर्ष काळ पण होता. आज पण आहे. शून्यातून स्वत:चं उद्योगसाम्राज्य उभारू पाहणारी ही तरुण उद्योजिका आहे ‘डिजिटल प्रिंट हाऊस’ची उज्ज्वला गायकवाड.

ठाण्याच्या रस्त्यांवरून रमेश गायकवाड दिवसभर तहानभूक विसरून ऑटोरिक्षा चालवायचे. लांबचं भाडं असो की जवळचं, रमेश गायकवाड कधीच ते नाकारत नसत. ऑटोरिक्षा हे त्यांच्या परिवाराचं उदरनिर्वाहाचं एकमेव साधन होतं. पत्नी शकुंतला आणि उज्ज्वला व मेघा या दोन मुली हे त्यांचं कुटुंब. दोन्ही मुलींना त्यांनी मुलांप्रमाणेच वाढवलं. मोठी मुलगी उज्ज्वला हिचं संपूर्ण शालेय शिक्षण ठाण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत झालं. दहावी झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार म्हणून उज्जवलाने एका प्लास्टिक कारखान्यात नोकरी केली. त्यासाठी एक वर्ष तिने शिक्षण थांबवलं. त्यानंतर कळवा येथील न्यू कळवा कॉलेजमधून अकरावी आणि बारावीचं शिक्षण घेतलं. यानंतर उज्ज्वलाने उच्च शिक्षणासाठी फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी.ए.च्या पहिल्या वर्षांत ती शिकत होती. सकाळी पावणेसातचं पहिलं लेक्चर असायचं तर शेवटचं लेक्चर पावणेएकला संपायचं. आपण घरासाठी हातभार लावला पाहिजे, या हेतूने नोकरी करायचं उज्ज्वलाने ठरवलं. त्याप्रमाणे तिला कांदिवलीच्या एका जाहिरात कंपनीत नोकरी मिळाली.

एकच्या सुमारास फोर्टवरून ती निघायची. कांदिवली स्टेशनला उतरून पुढे वीस मिनिटाचं अंतर चालत जायची. ३ ते ७ पर्यंत नोकरीची वेळ होती. त्यानंतर ती पुन्हा दादरला येऊन मुंब्य्राला जायची. जणू काही आयुष्याचीच तीन टोकं झाली होती. असं तिने तीन वर्षे काम केलं. कंपनीच्या मालकाचा तिच्यावर पूर्ण विश्वास बसला. त्यांनी कंपनीची सर्व जबाबदारी तिच्यावर सोपवली. कंपनी कशी चालवायची, हे ती त्या कॉलेजच्या दिवसांतच शिकली. इतिहास विषयातून तिने बीएची पदवी मिळवली. कांदिवली-मुंब्रा हे अंतर खूपच लांब असल्याने ठाण्यापासून जवळच्याच परिसरात तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नोकरी मिळणं तितकंसं सोपं काम नव्हतं. कॉलेजमध्ये असताना उज्ज्वलाने काही नाटकांत कामंसुद्धा केली होती. त्यामुळे ती परत नाटकाकडे वळली. काही मराठी चित्रपटांसाठी तिने सहायक दिग्दर्शिका म्हणून काम पाहिलं. काही चित्रपटांत तिने अभिनयसुद्धा केला. उपेंद्र लिमये, मिलिंद गुणाजी यांचा प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेला रे’ या चित्रपटात तिने अभिनय केला होता. या क्षेत्रात काहीशी स्थिरावत असतानाच नियतीने एक घाव घातला.

मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव ती माथेरानला सहलीसाठी गेली होती. एका उंचवट्यावरून तिचा पाय घसरला आणि तिच्या उजव्या पायाला दुखापत झाली. काही दिवस तिला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. आता आपण कॅमेरासमोर येण्याच्या योग्यतेचे नाही, हे तिला कळून चुकले. या प्रसंगानंतर तिने चित्रपटसृष्टीला रामराम केला. याच दरम्यान तिला रेल्वे खात्यात तिकीट तपासनीसाची नोकरीसुद्धा मिळत होती. मात्र, आता स्वत:चं वेगळं काहीतरी सुरू करायचं, असं तिने निश्चित केलं होतं. तिने सरकारी नोकरी नाकारली. प्रिंटिंगचं ज्ञान असल्याने प्रिंटिंगचा व्यवसाय करायचं तिने ठरवलं.

२७ सप्टेंबर, २०१३ रोजी तिने ‘डिजिटल प्रिंट हाऊस’ सुरू केलं. स्वत:चे दागिने विकून तिने भांडवल उभारलं. काही जुन्या मशीन्स विकत घेतल्या. एक डिझायनर, मशीन ऑपरेटर आणि डिलिव्हरी बॉय अशा तीन कर्मचार्‍यांनिशी कंपनी सुरू झाली. आज ही कंपनी २० हून अधिक जणांना रोजगार देते. फ्लेक्स प्रिंटिंग, काच, अ‍ॅक्रेलिक, व्हिनायल, सनबोर्ड सारख्या वस्तूंवर प्रिंटसुद्धा त्या करतात. मुद्रण, उत्पादन आणि होर्डिंग्ज लावणे त्याचप्रमाणे व्हिजिटिंग कार्ड तयार करणे, लग्नपत्रिका बनविणे इ. सेवा डिजिटल प्रिंट हाऊस ग्राहकांना पुरविते. अमृतांजन, कॅनन, सोनी, पॅरीवेअर, हिंडवेअर, फिलिप्स अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्ससाठी उज्ज्वला गायकवाड यांनी सेवा दिलेल्या आहेत. ५०० हून अधिक जाहिराती मोहिमा त्यांनी राबविलेल्या असून हजारहून अधिक ग्राहकांना त्यांनी सेवा दिलेल्या आहेत. येत्या काही वर्षांत मुद्रणक्षेत्रात स्वत:चं वलय निर्माण करण्याचं उज्ज्वला गायकवाड यांचं स्वप्न आहे.

कोणतंही यश मिळवण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नसतो, हे उज्ज्वला गायकवाड यांनी स्वत:च्या उद्योजकीय प्रवासातून दाखवून दिलं आहे. उज्ज्वला गायकवाड यांचं आयुष्य निश्चितच नावाप्रमाणे उज्ज्वल आहे.