नवे सरकार स्थापन झाल्याच्या 'चौदा' दिवसात भ्रष्टाचाराच्या 'तेरा' घटना

11 Dec 2019 18:20:16



corruption_1  H


भ्रष्टाचाऱ्यांना फुटले पेव
 राज्य सरकारचे अधिकारी-कर्मचारी अटकेत


विशेष वृत्त (सोमेश कोलगे) :  निवडणुकीनंतर राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने शपथ घेऊन चौदा दिवस उलटलेत; मात्र खातेवाटप झालेले नाही. दरम्यानच्या काळात राज्याच्या प्रशासनात भ्रष्टाचाराला चांगलाच चेव आला असून ठिकठिकाणी करण्यात आलेल्या तक्रारींवरून तेरा गुन्हे दाखल झाले आहेत. काही ठिकाणी राज्य सरकारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले . त्यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. सर्व गुन्हे लाचखोरी व भ्रष्टाचार प्रकारचे आहेत.


दाखल झालेले गुन्हे व करण्यात आलेल्या कारवाया खालीलप्रमाणे:

नागपूरमधील उमरेड येथे दि. ७ डिसेंबर रोजी खासगी दलालाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. महादेव गिल्लुरकर असे या इसमाचे नाव असून , नवीन मीटर जोडणीसाठी त्यांनी लाच मागितली होती.
  
दि. ७ डिसेंबर रोजी दिवशी गोंदिया येथील 'विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था' अध्यक्ष नरेश तिवारी व कर्मचारी सुशील कटरे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

५ डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील कोरोडी येथे दौलत चव्हाण या ग्रामपंचायत सदस्याला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. मालमत्ता कर कमी करून देण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योती हेमराज निखाडे व हेमराज निखाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. ५ डिसेंबर रोजी सापळा रचून गुन्हा नोंद झाला आहे.

आरमोरी , गडचिरोली येथे पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम विकास मेश्राम नावाच्या वन विभागातील वनपालाने मागितली होती. दि. ४ डिसेंबर रोजी लाच स्वीकारताना अटक झाली आहे.

अमरप्रेम जुमडे या जिल्हा परिषदेतील वर्ग तीन अधिकाऱ्याने तीन हजारांची लाच मागितली होती. त्याविषयीचा गुन्हा दि. ४ डिसेंबर रोजी दाखल झाला आहे. हि घटना चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे समजते.

  
विजय घुगरे या पोलीस कॉन्स्टेबलला ४,५०० रुपयांची लाच घेताना सांगली जिल्ह्यात रंगेहात अटक करण्यात आली. याविषयीचा गुन्हा ८ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाने १३०० रुपयांची लाच मागितली होती. राजेंद्र नेहूलकर असे त्यांचे नाव असून दि. ९ डिसेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक विलास शिवाजी जाधव यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक झाली. नाशिक जिल्ह्यात हा प्रकार घडला. दि. ६ डिसेंबर रोजी याविषयीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका कार्यक्रमासाठी ध्वनिक्षेपकाची परवनागी देण्याकरिता लाच मागण्यात आली होती. त्याविषयीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे व साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. कार्यालयात लाच स्वीकारत असताना त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई नाशिक येथे ५ डिसेंबर रोजी झाली आहे.

सिंधुदुर्ग येथील विद्याधर राजाराम पवार समाजकल्याण विभागातील वरिष्ठ साहाय्यकाने दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता लाच मागितली होती. ३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खांदेश्वर पोलीस स्थानकात सिडकोतील सहा. वसाहत अधिकारी व एका खासगी दलालाविरोधात २ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सागर तापडिया या वर्ग-१ अधिकाऱ्याच्यावतीने संबंधित इसमास लाच घेताना अटक करण्यात आली.

 
सुनील गायकवाड या वर्ग -२ अभियंत्याविरोधात ३० नोव्हेंबर रोजी वर्धा येथे गुन्हा दाखल झाला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासमोरील खातेवाटपाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत राज्यातील प्रशासनाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आगामी अधिवेशनात वाढलेला भ्रष्टाचार हा मुद्दा होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त राज्य ठरल्याचा अहवाल एका खासगी संस्थेने केलेल्या परीक्षणातून दिला होता. त्यामुळे नव्या सरकारसमोर या गुन्हेगारीच्या घटनांनी आव्हान उभे केले आहे. 
 
Powered By Sangraha 9.0