देण्याची ती पहिली संस्कृती...!

    दिनांक  11-Dec-2019 22:16:47
|

veda_1  H x W:


अच्छिन्नस्य ते देव सोम सुवीर्यस्य, रायस्पोषाय ददितारः स्याम्।

सा प्रथमा संस्कृतिर्विश्ववारा, स प्रथमो वरुणो मित्रो अग्निः॥

(यजुर्वेद - ७.१४)

अन्वयार्थ

(देव सोम) हे आनंददायी, प्रेरक व ऐश्वर्यसंपन्न देवा! (आम्ही सर्वजण) (ते) तुझ्याद्वारे (अच्छिन्नस्य) अखंडितपणे प्रवाहित होणार्‍या (सुवीर्यस्य) उत्कृष्ट बळाचे आणि (राय: पोषस्य) ऐश्वर्याच्या समृद्धीचे (ददिदारः) दान करणारे (स्याम) होवोत. (सा) तीच तर खरी (विश्ववारा) जगाकडून वरणीय (प्रथमा) श्रेष्ठ व पहिली (संस्कृतिः) संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचे (वरूण:) वरुण, (मित्रः) मित्र आणि (अग्नि:) अग्नी हे (प्रथमः) पहिले व श्रेष्ठ आदर्श आहेत.

विवेचन

कुटुंब, गाव, समाज किंवा देश यापैकी काहीही असो! त्याची ओळख ठरते ती तिथे राहणार्‍या प्रजेच्या व्यवहारावरून. व्यवहार, मग तो चांगला असो की वाईट. तीच त्यांची ओळख बनते, संस्कार ठरतो आणि त्याचे रूपांतर संस्कृतीत होते. वेदांची संस्कृती एक फार प्राचीन आहे. जेव्हा वेद हेच विश्वाचे आद्यग्रंथ आहेत, मग त्यांचे मूल्यसंस्कार व संस्कृती फार प्राचीन का असणार नाहीत? म्हणूनच या मंत्रात ‘सा प्रथमा संस्कृति विश्ववारा’ असे म्हटले आहे. अर्थात, ती जगाकडून स्वीकारण्यायोग्य किंवा ग्रहण करण्यायोग्य व्यवहारपद्धती (संस्कृती) विश्वात पहिली आहे. म्हणजेच त्यापूर्वी कोणतीच संस्कृती नव्हती. इतर विदेशी संस्कृती यानंतर उदयास आल्या. कालौघात काही नाहीशादेखील झाल्या. यातील काही विद्यमान तर आहेत, पण वैदिक म्हणजेच भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांच्यात उदात्त गुण दिसत नाहीत. जर का एखाद्यामध्ये चांगले गुण, विचार तत्त्वे किंवा सद्व्यवहार असतील, तर ते आपोआपच स्वीकरणीय ठरतात व त्यामुळे ते टिकूनही राहतात. जी मूल्ये वैदिक संस्कृतीमध्ये आढळतात, ती इतर संस्कृतीमध्ये दिसत नाहीत. म्हणूनच सार्‍या जगाने तिचा स्वीकार केला. यामुळेच भारत देश हा समग्र जगाचा गुरू राहिला व आजही या देशाची महिमा सार्‍या विश्वात गायिला जातो.

समग्र मानवमात्राचेच नव्हे, प्राणिसमूहाचे ज्या संस्कृतीत दडले आहे, ती जगात सर्वप्रथम असण्याचे कारण म्हणजे तिच्याकडून मिळालेली ‘विश्वकल्याणाची भावना’, वैदिक संस्कृतीने केवळ देशो देशीच्या, सीमारेषा आखून ठेवल्या नाहीत. नीतिशास्त्रात हाच उदार भाव झळकतो-

अयं निजःपरो वेति,

गणना लघुचेतसाम् ।

उदारचरित्रानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥

हे विश्वचि माझे घरम्हणत उदार चारित्र्याने सर्वांशी बंधुत्वाचे नाते जोडण्याचे महत्कार्य ही संस्कृती करते. या संस्कृतीचे अध्यात्ममाहात्म्य वाढते, ते मानवीय मूल्यांमुळे, जे की इतरत्र क्वचितच आढळतात. वेद, उपनिषद, दर्शन, गीता, रामायण, महाभारत आदी शास्त्रांचा उद्गम याच संस्कृतीत झाला. वर्णव्यवस्था, आश्रमव्यवस्था, आध्यात्मिक व भौतिक विज्ञान, पंचमहायज्ञे, सोळा संस्कार, पुरुषार्ध चतुष्ठ्य राष्ट्रभक्ती तसेच नृत्य, गायन, वादन, शिल्प, नाट्य आदी कला या सर्व बाबी याच संस्कृतीने जगाला प्रदान केल्या.

ही महान असलेली संस्कृती सार्‍या जगात प्रथम क्रमांकावर का आहे आणि ती सार्‍या जगाकडून का म्हणून वरणीय आहे? हे समजणे महत्त्वाचे! कारण, उगीच कुणी सर्वश्रेष्ठ ठरत नसतो. त्यामागे फार मोठा त्याग, तप, उदारभाव, परोपकार आणि सहनशीलता या गोष्टी असतात. अन्यथा आग्रहाने किंवा जबदरस्तीने लादून एखादी संस्कृती अग्रणी ठरत नाही.

या मंत्रातील पहिले चरण हे याकरिता फारच उद्बोधक आहे. कारण, यात दान या विशेष गुणांचे वर्णन केले आहे. त्यात म्हटले आहे. ’हे सोम देवा... तुझ्या सर्व प्रकारच्या शक्ती व बळाचा आणि सुख-ऐश्वर्याचा, ज्ञानवैभवाचा प्रवाह अखंडितपणे गतिमान आहे. याला आम्ही आमच्यापर्यंत ठेवणार नाहीत. तो इतरांना देत राहणार. ते सर्व काही इतरांना वितरीत करीत राहणार. म्हणजेच दातृभावनेचा विस्तार.’

वेदांची अमृतवाणी आम्हाला दान देण्याचा संदेश देते. जे काही आपल्याजवळ आहे, ते इतरांना द्या. त्यास आपल्या जवळ ठेवू नका. भगवंत ‘सोम’ आहे. म्हणजेच तो ऐश्वर्याचा स्वामी आहे. त्याने आपले सारे वैभव, आध्यात्मिक व भौतिक ज्ञान सार्‍या विश्वास दिले आहे. आजही देतो आहे व भविष्यातही देत राहणार! दातृत्वाचा हा प्रवाह अखंडितपणे निरंतर वाहत राहणारा आहे. सृष्टीतील माती, पाणी, हवा, अग्नी, समुद्र, सूर्य, चंद्र, वनस्पती, प्राणी इत्यादींनी त्याचे अनुकरण केले आहे. ही सारी सृष्टी उदारतेने सर्व काही प्रदान करणारी आहे. हे कोणासाठी? तर मानवासाठीच! पशूसाठी नव्हे. उपभोगण्याचा अधिकारी फक्त मानवच आहे.

धन
-दौलत, सोने-चांदी, हीरे-मोती, दागदागिने, कपडे, घर-वाहने त्याच बरोबरच धान्य, फळे, पंचपक्वान्नादी पदार्थ सर्व काही त्या सोमप्रभूने दिले आहे. त्याद्वारे आम्ही शारीरिक बळाने व ऐश्वर्यबळाने संपन्न होत आहोत. तसेच सर्व प्रकारचे वेदादी ज्ञान-विज्ञान, विद्या, कला-कौशल्य इत्यादींनी परिपूर्ण होत आहोत, पण हे सर्व आमच्यापर्यंतच सीमित ठेवणे काय योग्य आहे? ते तर आपण इतरांना दिलेच पाहिजे. याकरिता मंत्रात ’ददिदार: स्याम्।’ म्हणजेच आम्ही देणारे होवो, असे म्हटले आहे. कारण ’केवलाघो भवति केवलादीअर्थात एकटा खाणारा स्वार्थी मानव हा पापाचा भागी बनतो, असे वेद सांगतो. म्हणूनच दानाची परंपरा टिकवून ठेवली, तर संस्कृती टिकून राहते.

आपल्या थोर ऋषी
-मुनी व महापुरुषांनी या परंपरेला अखंडितपणे सुरू ठेवले. मर्यादापुरुषोत्तम राम, योगेश्वर, कृष्ण याबरोबरच अनेक राजे, अनेक विद्वान, ज्ञानी मंडळी सर्वांनी आपल्या समग्र जीवनाचे उदात्तीकरण केले. महर्षी दयानंदांनी वेदज्ञानाच्या प्रसाराकरिता समग्र जीवनदान दिले. म्हणूनच ती एक महान संस्कृती बनली. आजही सारे जग भारताकडे आकृष्ट होण्याचे कार काय असेल, तर इथला सर्वांप्रति असलेला सहिष्णु सद्भाव! बाहेरून येणार्‍यांना ही आम्ही आपले समजलो. त्यांना सर्व काही देते राहिलो. म्हणूनच ही संस्कृती विश्ववंद्य आहे. इथे राहणार्‍यांनी वरूण, मित्र आणि अग्नीप्रमाणे इतरांशी सद्व्यवहार केला. यामुळे आजही ही संस्कृती आदर्श आहे. ही परंपरा आपण चिरकाळापर्यंत पुढे नेऊ या!

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य