रात्रीचे कृष्णकृत्य

    दिनांक  11-Dec-2019 19:37:47
|


mahabharat_1  Hसूडाच्या आनंदात हे तिघेजण बेभान झाले. सर्वांची कत्तल करून ते रणांगणामध्ये जिथे दुर्योधन कण्हत पडला होता तिथे आले. दुर्योधन जखमांनी विव्हळत होता. त्याच्या बाजूलाच त्याची गदापण पडली होती. प्राण कंठाशी येऊन तो अंगावर येणार्‍या श्वापदांना रात्रीच्या अंधारात हाकलत होता. हे तिथे मित्र त्याच्या जवळ पोहोचले. त्यांनी आपला पराक्रम दुर्योधनाला सांगितला.


अश्वत्थामा सूड भावनेने पेटून उठला
. कृपाचार्य आणि कृतवर्मा यांनी सांगितलेल्या नीतिनियमांना झुगारुन तो आपला रथ घेऊन त्या भयाण रात्रीच एकटा निघाला. त्याच्याकडे भगवान शंकराने दिलेलीतलवार होती. कृतवर्मा व कृपाचार्य त्याला ओरडून सांगत होते. “एकटा जाऊ नकोस. आम्ही तुझ्याबरोबर येतो.” पण, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला राजा दुर्योधनाच्यावधाचा सूड घ्यायचा होता. तो वेगाने पांडवांच्या शिबिराकडे निघाला. कृतवर्मा आणि कृप त्याच्या सोबत होते.
जेव्हा अश्वत्थाम्याने पांडवांच्या तंबूत प्रवेश केला, तेव्हा ते बाहेरच थांबले. प्रवेशद्वारापाशी उभे राहून आम्ही कुणालाही बाहेर पडू देणार नाही,’असे आश्वासन मात्र त्यांनी अश्वत्थामाला दिले. मिट्ट अंधारात अश्वत्थामा धृष्टद्युम्नाच्या तंबूत गेला. पांढर्‍या शुभ्र मंचकावर धृष्टद्युम्न गाढ झोपला होता. आपल्या पावलांचा आवाज न करता अश्वत्थामा त्याच्या जवळ गेला आणि त्याने धृष्टद्युम्नाला जोरात लाथ मारली. तो खडबडून उठला. परंतु, काही करायच्या आतच अश्वत्थाम्याने त्याचे केस हातात धरून त्याच्या गळ्याभोवती आपल्या धनुष्याच्या दोरीचा फास आवळला. धृष्टद्युम्न म्हणाला, “तू बाण सोडून मला मार. माझ्याशी युद्ध कर व मला स्वर्गात धाड. परंतु, तू मला जे मरण देतो आहेस ते क्षात्रधर्माला सोडून अत्याचार आहे!” अश्वत्थामा एखाद्या वेड्यासारखा हसला व म्हणाला, “अरे तू तर आपल्या गुरूंचा वध केलास. तुला मी स्वर्गात कसे पाठवू? तुझी जागा नरकात आहे. तुझी तीच लायकी आहे. तू चिरंतन नरकयातना भोगशील.” एवढे म्हणून त्याने धनुष्याची दोरी आवळून धृष्टद्युम्नाचा जीव घेतला. त्याचा जीव जाईस्तोवर तो त्यांना लाथा मारतच राहील!
ते आवाज ऐकून जवळचे लोक झोपेतूनउठले. त्यांना वाटले की, एखादा राक्षसच शिबिरात घुसला आहे. पांचाळांनी लढाई सुरू केली. पण, अश्वत्थाम्याने एक एक करून त्या सर्वांना यमसदनी पाठवले. त्याला रोखण्याचा द्रौपदीच्या पुत्रांनी आटोकाट प्रयत्न केला. पण, अगदी क्रूरपणे अश्वत्थाम्याने त्या सर्वांना ठार केले. उतमौज व युद्धमन्यू या वीरांना झोपेतच मरण आले. शिखंडीलाही ठार मारले. काहीजण पळू पाहत होते. परंतु, तंबूच्या दरवाज्यातच कृप आणि कृतवर्मा उभे होते. त्यामुळे त्यांना मागे परतावे लागले. कृपाचार्यांनी शिबिराला आग लावली. त्या उजेडात अश्वत्थाम्याला सर्वांना ठार करणे अजून सोपेच झाले! कृपाचार्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी शिबीर पेटवून दिले, ज्यामुळे सगळीकडे हाहाकार माजला. सगळी माणसं सैरावैरा धावत होती. सारे पशुवत वागत होते! पशू तरी भूक लागल्याशिवाय कोणाचा जीव घेत नाहीत, पण इथे पशूहून हीन वागणूक चालू होती. सक्तीची अमानुष हत्या केली जात होती.
सूडाच्या आनंदात हे तिघेजण बेभान झाले. सर्वांची कत्तल करून ते रणांगणामध्ये जिथे दुर्योधन कण्हत पडला होता तिथे आले. दुर्योधन जखमांनी विव्हळत होता. त्याच्या बाजूलाच त्याची गदापण पडली होती. प्राण कंठाशी येऊन तो अंगावर येणार्‍या श्वापदांना रात्रीच्या अंधारात हाकलत होता. हे तिथे मित्र त्याच्या जवळ पोहोचले. त्यांनी आपला पराक्रम दुर्योधनाला सांगितला. कृपाचार्य म्हणाले, “दुर्योधना, तुझी गदा पण तुझ्यासोबत स्वर्गात प्रवेश करणार आहे असे दिसते.” अश्वत्थामा म्हणाला, “मित्रा, तुला ऐकून आनंद होईल, मी पांडवांच्या सैन्याचा संहार केला आहे. आता फक्त पाच पांडव, कृष्ण आणि सात्यकी व आम्ही तिघे एवढे जण जीवंत राहिलो आहोत.” हे ऐकून दुर्योधन सुखावला. तो म्हणाला, “अश्वत्थामा, जे भीष्म, द्रोण व राधेय यांना साधले नाही, ते तू साध्य केलेस. मला तुझे कौतुक वाटते. अभिमान वाटतो मी आता आनंदाने या धरेचा आणि तुमचा निरोप घेतो.” इतके बोलून दुर्योधनाने प्राण सोडले. इकडे दुर्योधनाने प्राण सोडले आणि तत्क्षणीच संजयाला जी दिव्यदृष्टी होती, ती त्याच्याकडे राहिली नाही, संजयाकडून ती काढून घेतली गेली.
अश्वत्थाम्याने केलेल्या संहारातून धृष्टद्युम्नाचा एक सारथी तेवढा वाचला होता. अतिशय भयंकर असा तो दिवस उजाडला. तो सारधी युधिष्ठिराकडे त्वरेने गेला व त्याने सर्व हकिकत युधिष्ठिराला कथन केली. ते ऐकून युधिष्ठिराला काही काळ मूर्च्छाच आली. त्याला सात्यकीने सावरले. सगळेच पांडव हतबद्ध झाले होते. हळूहळूसगळे शुद्धीवर आले. युधिष्ठिराने ‘द्रौपदीला घेऊन ये’ एवढे नकुलास सांगितले. लगबगीने नकुल द्रौपदीकडे गेला. इकडे युधिष्ठिर त्या शिबिरात गेला, जिथे ती भयानक कत्तल झाली होती. त्याला ते दृश्य पाहवेना. जिकडे तिकडे मृतदेह विखुरले होते. धृष्टद्युम्न मरून पडला होता. द्रौपदीच्या पाचही पुत्रांचे मृतदेह पडले होते. युद्धमन्यू आणि उतमौज यांचे मृतदेह पाहून अर्जुनाचे काळीज फाटले. कोणीच कोणाचे सांत्वन करण्याच्या मनस्थितीत नव्हते.
नकुल द्रौपदीला घेऊन तिथे पोहोचला. आपल्या पुत्रांचे मृतदेह पाहून द्रौपदी कोसळून पडली. तिने एक रात्रीमध्ये आपले सर्वस्व गमावले होते. अचानक ती पेटून उठली. तिचे डोळे आग ओकू लागले. ती म्हणाली, “जोवर अश्वत्थामा मारला जात नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाही. या ठिकाणी मी प्राणत्याग करीन,“ तिला सांगितले गेले की, अश्वत्थाम्याला चिरंजीव म्हणून वरदान आहे. तेव्हा ती म्हणाली, “माझे पुत्र व माझे भाऊ यांच्या मरणाचा सूड हा घेतला गेलाच पाहिजे. जा त्याच्या मस्तकावरती जे रत्न आहे, ते रत्न काढून आणा. ते रत्न त्याच्याजवळ नसणं ही मृत्यूपेक्षाही भयंकर अशी गोष्ट आहे. भीमा, तूच हे करू शकतोस. तू माझी इच्छा पूर्ण कर.”
भीमाने द्रौपदीला आश्वस्त केले आणि अश्वत्थाम्याला शोधू लागला. कृष्णाला भीमाची खूप काळजी वाटू लागली. तो युधिष्ठिराला म्हणाला, “अश्वत्थामा, अतिशय क्रूर व निर्दयी आहे. तो भीमाचा जीव घेईल, शिवाय त्याच्याकडे सर्वशक्तीमान असे ‘ब्रह्मशीर्ष’ नावाचे अस्त्र आहे. ते जर अश्वत्थाम्याने भीमावर फेकले, तर त्याचा मृत्यू अटळ आहे. मी अर्जुनाला घेऊन भीमाच्या पाठोपाठ जातो.” कुरूक्षेत्रापासून खूप दूर गंगातीरी अखेर अश्वात्माथा व्यासांच्या पाठीमागे लपलेला त्यांना दिसला. भीमाने आपले धनुष्य त्याच्यावर रोखून अश्वत्थाम्याला युद्धाचे आव्हान दिले. तितक्यात श्रीकृष्ण आणि अर्जुन पण तिथे पोहोचले.

(क्रमशः)

- सुरेश कुळकर्णी