एकात्मता आणि बंधुत्वाचा परिपोष निर्णय म्हणून पहावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2019
Total Views |





नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत स्वागत केले. राजधानी दिल्लीतील केशव कुंज येथे पत्रकारांना संबोधित करताना डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, ”देशाची जनभावना, आस्था आणि श्रद्धा यांना न्याय देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या निर्णयाचे स्वागत करत आहे. अनेक दशके सुरू असणार्‍या न्यायप्रक्रियेनंतर अंतिम निर्णय न्यायपूर्वक रीतीने झाला आहे. या दीर्घकालीन प्रक्रियेत श्रीरामजन्मभूमीशी संबंधित सर्व पैलूंचा बारकाईने विचार झाला आहे. सर्व पक्षांनी आपापल्या दृष्टीकोनातून मांडलेल्या तर्काचे मूल्यांकन झाले आहे. धीरोदात्तपणे प्रदीर्घ विचारमंथन करून सत्य आणि न्याय यावर मोहर उठविणार्‍या सर्व न्यायमूर्ती आणि संबंधित सर्व पक्षकारांचे आम्ही अभिनंदन करतो, तसेच त्यांना शतशः धन्यवाद देतो. या दीर्घ प्रयत्नांत योगदान देणारे सर्व सहकारी आणि बलिदानी व्यक्तींचे आम्ही कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो, ” असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.



पुढे ते म्हणाले की
, “निर्णय स्वीकार करण्याची मनस्थिती, बंधुभाव जपताना पूर्ण सुव्यवस्था राखणार्‍या सरकारी व सामाजिक स्तरावरील सर्व लोकांच्या प्रयत्नांचे स्वागत आणि अभिनंदन. अत्यंत संयमाने न्यायाची प्रतीक्षा करणारी भारतीय जनताही अभिनंदनास पात्र आहे. या निर्णयाकडे जयपराजयाच्या दृष्टीने पाहता कामा नये. सत्य आणि न्यायाच्या मंथनातून झालेल्या या निष्कर्षाकडे भारतीय समाजाने एकात्मता आणि बंधुत्वाचा परिपोष करणारा निर्णय म्हणून पाहावे. कायदा आणि घटनेच्या मर्यादेत संयमाने आणि सात्विकपणे आपला आनंद व्यक्त करावा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुरूप परस्परांतील वाद संपवण्यासाठी शासनाच्या वतीने शीघ्र कारवाई होईल यावर आमचा विश्वास आहे. भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून आपण सर्व श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिराची निर्मिती करण्याच्या दिशेने एकत्र येऊन आपल्या कर्तव्याचे पालन करावे, ” असेही ते यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@