सुरुवात तर चांगली...

    दिनांक  08-Nov-2019 20:32:06
|
तृतीयपंथीयांना सन्मानाचे जीणे मिळावे म्हणून एसएनडीटी विद्यापीठ पुढाकार घेत आहेच, पण समाजानेही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजातील उपेक्षित वर्गासाठी काम करणारी ‘अनाम प्रेम परिवार’ ही एक वैचारिक चळवळ आहे. त्यांनी सुमारे बावीस वर्षे पूर्वीपासून तृतीयपंथीयांना आपलेसे करायला, त्यांना समाजमान्यता मिळवून द्यायला सुरुवात केली आहे.समाजात स्त्री आणि पुरुष असे दोन वर्ग आहेत
. मात्र, त्याच्याही पलीकडे एक वर्ग आहे, हे मानण्यास आपण तयार नव्हतो आणि आजही नाही. तो वर्ग आहे तृतीयपंथीयांचा. मानवरूपात आहे, पण ना धड स्त्री आणि ना पुरुष, असा हा वर्ग असल्याकारणाने समाजापासून फार दूर राहिला आहे. बुद्धीचे वरदान लाभलेल्या मानवाकडून त्यांची हेळसांड होत आहे. त्यांना अपमानित करण्यात येत आहे. अशा या वर्गाला समाजात आणण्यासाठी, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला. म्हणून काही प्रमाणात का होईना; समाज त्यांना स्वीकारू लागला. हा प्रवाह असाच चालू राहावा, म्हणून महिलांच्या उत्कर्षासाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम राबवून त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार्‍या एसएनडीटी महिला विद्यापीठाने ६ नोव्हेंबर रोजी मुंबईत एक राष्ट्रव्यापी चर्चासत्र घेतले. अर्थात त्याला राज्य महिला आयोगाचे पाठबळ होते. राज्य महिला आयोगाने यापूर्वीही तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक मिळावी, या समाजात निदान त्यांचे अस्तित्व असावे, यासाठी प्रयत्न केले आणि त्याचे फळ म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची गणना करण्याचे आदेश दिले. २०११ च्या जनगणनेत पुरुष आणि महिला याव्यतिरिक्त तिसरा वर्ग असलेल्या तृतीयपंथीयांची गणना करण्यात आली. म्हणजे शासनाने त्यांचे अस्तित्व मान्य करायला सुरुवात केली. आता समाजानेही त्यांचे अस्तित्व मान्य करायला सुरुवात करायला हवी.एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ
. शशिकला वंजारी आणि आजीवन अध्ययन, विस्तार आणि समाजकार्य विभागाच्या संचालिका डॉ. आशा पाटील या तृतीयपंथीयांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी फारच आशावादी आहेत. कोणत्याही कार्याची सुरुवात चांगली झाली की शेवट चांगला होतो, या उक्तीनुसार त्यांच्या प्रयत्नांना राज्य महिला आयोगाचे पाठबळ ही चांगली सुरुवात आहे. यापूर्वी तृतीयपंथीयांसाठी विद्यापीठातर्फे अभ्यासक्रम तयार करण्यात आले. मात्र, अ‍ॅडमिशन आणि शिष्यवृत्तीपासून त्यांच्यासमोर अनेक अडचणी आल्याने प्रवेशाला चांगला प्रतिसाद देऊनही त्या नंतर सातत्य राखू शकल्या नाहीत. मात्र, आता एसएनडीटीने तृतीयपंथीयांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा विडाच उचलला आहे.तो दिवसही लांब नसेल
!


तृतीयपंथीयांचा पुराणात किन्नर म्हणून उल्लेख आहे आणि समाजात त्यांना षंढ म्हणून संबोधण्यात येते
. मात्र, यांचा जन्म वेगळा नसतो. मातेच्या उदरीच त्या मुलगा अथवा मुलगी म्हणून जन्म घेतात. मात्र, त्यांची ओळख फार उशिरा होते. किन्नर प्रिया पाटील हिच्या मते तिला स्वतःलाच तिची वेगळी ओळख २१-२२व्या वर्षी झाली. मुलगा असलेला तृतीयपंथीय मुलीसारखे वर्तन करू लागतो आणि मुलगी असलेल्या तृतीयपंथीयात मुलाचे गुण दिसून येतात. त्यावेळी समाज त्यांची चेष्टा करू लागतो. त्यांच्या जन्मदात्यांना हे सहन होत नाही. कुटुंबापासूनच त्यांची अवहेलना सुरू होते. जेव्हा त्यांना कुटुंबात राहणे असह्य होते, तेव्हा ते आपला मार्ग चोखाळतात. सर्वासाधारण माणसाप्रमाणेच त्यांच्यातही स्तर असतात. रस्त्यात सिग्नलला उभे राहून भीक मागणार्‍यापासून उच्चशिक्षित तृतीयपंथीयापर्यंत त्यांचे स्तर असतात. मात्र, सिग्नलला उभा राहून भीक मागणारा तृतीयपंथीयच समाजाच्या लक्षात राहतो आणि त्यांच्या पदरी अवहेलना येते.प्रिया पाटील हिच्या मते पुराणकाळात यक्ष
-किन्नरांचे गान-नर्तन होत असे. त्याकाळी त्यांना सन्मानाची वागणूक मिळत होती. मात्र, इंग्रज राजवटीपासून त्यांच्या वाट्याला अवहेलनेचे जिणे आले आणि तेच पुढे चालत राहिले. तृतीयपंथीयांना सन्मानाचे जीणे मिळावे म्हणून एसएनडीटी विद्यापीठ पुढाकार घेत आहेच, पण समाजानेही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. समाजातील उपेक्षित वर्गासाठी काम करणारी ‘अनाम प्रेम परिवार’ ही एक वैचारिक चळवळ आहे. त्यांनी सुमारे बावीस वर्षे पूर्वीपासून तृतीयपंथीयांना आपलेसे करायला, त्यांना समाजमान्यता मिळवून द्यायला सुरुवात केली आहे. महावीर जयंतीदिनी त्यांच्यासाठी खास एक दिवसाचा महोत्सव आयोजित केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रमापासून सामाजिक आणि शैक्षणिक दिशा देणारे कार्यक्रम यावेळी आयोजित केले जातात. त्यापूर्वी एक दिवस अनामप्रेमी सदस्य या तृतीयपंथीयांना माहेरवाशीण म्हणून पाहुणचाराला बोलावतात. त्यावेळी त्यांचे शेजारीही या सोहळ्यात सहभागी होतात. भेदाभेद मिटण्यासाठी असे कार्यक्रम उपयोगी पडतात. अशा प्रकारचे काम करणार्‍या संस्थांनी एसएनडीटीशी संपर्क साधला तर तृतीयपंथीयांचे सन्मानाचे जिणे दूर नसेल.-अरविंद सुर्वे