नोएल सालाझार आणि उडणार्‍या मुली

    दिनांक  08-Nov-2019 20:49:54   
|नोएल सालाझारमधली कथालेखिका थरारून उठली. तिने भरपूर अभ्यास करून त्यांच्यावर पुस्तकच लिहून टाकलं. त्याचं नाव आहे ‘द फ्लाईट गर्लस्.’ पण आपल्या लेखिका अशा विषयांकडे कधी वळणार?नोएल सालाझार ही एक अमेरिकन महिला आहे
. अमेरिकन नौदलात ती वैद्यकीय साहाय्यक किंवा परिचारिका आहे. ती उत्कृष्ट कथालेखन आणि कथाकथन करते. नवनवीन कथाबीजं मिळवण्यासाठी ती सतत उत्सुक असते. कान आणि डोळे उघडे ठेवून वावरणार्‍या व्यक्तीला कथाबीजांची वाण पडत नाही. अलीकडेच तिला बातमी लागली की, टेक्सास प्रांतात ‘वॅको’ शहरातल्या ‘टेक्सास स्टेट टेक्निकल कॉलेज’मध्ये एक विशेष कार्यक्रम होणार आहे. आज जिथे हे कॉलेज आहे तिथे पूर्वी अमेरिकन विमानदलाचा ‘कॉनली’ नावाचा हवाईअड्डा होता. दुसर्‍या महायुद्ध काळात म्हणजे, १९४२ ते १९४४ अशा तीन वर्षांमध्ये या ठिकाणी विमानदलाने एकंदर १ हजार ७४ महिला वैमानिकांना सैनिकी विमान चालवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. आता त्या १ हजार ७४ महिलांपैकी फक्त पाच महिला जीवंत आहेत आणि त्यांचा या विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. नोएल वॉशिंग्टन प्रांतात बॉदेल शहरात राहते. वॉशिंग्टन प्रांत म्हणजे अमेरिकेचा वायव्य कोपरा आणि टेक्सास प्रांत म्हणजे दक्षिण सरहद्द. पण नोएल आवर्जून त्या कार्यक्रमाला हजर राहिली. प्रत्यक्षात पाचपैकी के. हिल्डेब्रॅण्ड आणि डोरोथी ल्युकास या दोनच महिला येऊ शकल्या. सगळ्याच वयाची नव्वदी पार केलेल्या. या दोघींना येणं जमलं. बाकी तिघींना शारीरिक दुर्बलतेमुळे शक्य झालं नाही.कार्यक्रमाच्या ठिकाणी अमेरिकन वायुदलातल्या आजच्या महिला अधिकारी
, वैमानिक, कर्मचारी आणि पुरुष सदस्यसुद्धा पूर्ण गणवेषात उपस्थित होते. या दोन महिलांच्या गाड्या आल्या. त्या गाड्यांमधून उतरल्या. सर्वांनी त्यांना एक कडक सॅल्यूट ठोकला. मग त्यांच्यासाठी खास राखलेल्या व्हीलचेअर्समध्ये त्यांना बसवून, टाळ्यांच्या गजरात कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, मुलं, नातवंडं उपस्थित होती. अनेक छोट्या मुला-मुलींना त्यांच्या पालकांनी मुद्दाम वैमानिकांचे गणवेष घातले होते. वैमानिकांचे भलेमोठे गॉगल्स कधी डोळ्यांवर तर कधी डोक्यावर चढवून ही मुलं ऐटीत इकडे-तिकडे वावरत होती. नव्वदी पार केलेल्या त्या दोघी वैमानिक आल्या. हसर्‍या चेहर्‍याने या सगळ्या सोहळ्याचा आनंद घेत होत्या. मग काही वक्त्यांनी या महिला वैमानिकांनी नेमकं काय काम केलं, याची माहिती दिली. श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून, त्यांनी किमान ७०-७५ वर्षांपूर्वी बजावल्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नोएल सालाझारमधली कथालेखिका थरारून उठली. तिने भरपूर अभ्यास करून त्यांच्यावर पुस्तकच लिहून टाकलं. त्याचं नाव आहे ‘द फ्लाईट गर्लस्.’ १९३९ साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. १९४१ पर्यंत अमेरिका प्रत्यक्ष युद्धात उतरली नव्हती. पण १९४१ च्या ७ डिसेंबरला जपानने अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’ या नाविक तळावर आकस्मिक हल्ला चढवला. त्यामुळे अमेरिका लगेचच अधिकृतपणे युद्धात आली. या वेळेपर्यंत अमेरिकेत अनेक महिलांनी नागरी विमान उड्डाणाचा परवाना मिळवलेला होता. सैन्यात मात्र महिलांना प्रवेश नव्हता.अमेरिकन वायुदलाचा कमांडिंग ऑफिसर होता जनरल हेन्री हॅप आर्नोल्ड
. जॅकेलिन कोचरन आणि नॅन्सी हार्कनेस लव्ह या दोन वैमानिक बायका मोठ्या धाडसी होत्या. त्या थेट जनरल आर्नोल्डला जाऊन भेटल्या आणि म्हणाल्या, ‘आम्हाला वायुदलात घ्या.’ जनरल आर्नोल्ड विचारात पडला. महायुद्धाचं विशाल स्वरूप लक्षात घेता, तरबेज वैमानिकांची गरज लागणारच होती. पण म्हणून या पोरींना एकदम फायटर किंवा बॉम्बर विमानातून जर्मन वायुदलाशी झुंज घ्यायला पाठवणं शक्य नव्हतं. अमेरिकन जनतेने आर्नोल्डसकट अख्ख्या वायुदलाला धारेवर धरून विचारलं असतं, “ददद नो, शत्रूशी लढायला पोरींना पाठवता? मग तुम्ही काय बांगड्या भरल्यात?” आता अमेरिकेत पुरुष किंवा बायका कुणीच बांगड्या घालत नाहीत, ते सोडा. पण हा प्रश्न त्यातला आशय अमेरिकन जनतेने कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त केला असता, त्यात किती शब्दांना फुल्या-फुल्या टाकाव्या लागल्या असतील याची आपण कल्पना करू शकतो.मग जनरल आर्नोल्डने
‘विमेन एअरफोर्स सर्व्हिस पायलट्स’ उर्फ ‘वॅस्प’ या नावाचा एक नवा विभागच सुरू केला. नागरी विमान उड्डाणाचा परवाना जिच्याकडे आहे, अशी कुणीही महिला या विभागात भरती होऊ शकत होती. १९४२ साली आर्नोल्डने हा विभाग सुरू केला. जॅकेलिन कोचरन आणि नॅन्सी हार्कनेस या अर्थातच त्याच्या पहिल्या रिक्रूट होत्या. पाहता पाहता देशभरातून एक हजारांवर महिला वैमानिकांनी या विभागात नाव नोंदवलं. नागरी विमान चालवणं आणि सैनिकी विमान चालवणं यात फरक असतो. त्यामुळे या महिलांना प्रशिक्षणाची गरज होतीच. मग त्यासाठी टेक्सास प्रांतातल्या ‘वॅको’ शहराजवळच्या ‘कॉनली’ हवाईतळाची निवड करण्यात आली. ‘वॅस्प’ विभागात भरती होणार्‍या महिला वैमानिकांना, वायुदलातल्या सर्वसामान्य पुरुष रिक्रूटांप्रमाणेच सक्त प्रशिक्षण देण्यातं आलं. प्रशिक्षणासाठी नेहमीच जुनी, सेवेतूनच बाद झालेली विमानं वापरली जातात. माणूस नागरी पेशाचा असो वा सैनिकी पेशाचा असो, आपल्याला जी काही साधनं उपलब्ध आहेत, त्यांचा कुशलतेने, कमाल क्षमतेने उपयोग करून घेत जो ठरलेलं ध्येय गाठतो म्हणजे ‘टार्गेट अचिव्ह’ करतो तो माणूस यशस्वी होतो. दैनंदिन सांसारिक बाबतीत या विषयात स्त्रिया आघाडीवर असतात. असंख्य प्रतिकूल घटकांना तोंड देत त्या यश मिळवत असतात. या महिला वैमानिकांना प्रशिक्षण देणार्‍या ज्येष्ठ प्रशिक्षकांना तोच अनुभव आला. मोडकी, बाद झालेली खटारा विमानं या महिलांनी सहज सफाईने हाताळली आणि उडवलीसुद्धा! त्यांच्या पुरुष सहकार्‍यांपेक्षा जास्त सफाईने!साहजिकच
‘वॅस्प’मधल्या पोरींबद्दल वायुदलातल्या लोकांना कौतुकही वाटू लागलं आणि अभिमानही वाटू लागला. आणि होय... काळजी वाटू लागली. त्यांना झुंजी किंवा बॉम्बफेकी विमानांवर पाठवायला कुणी तयार होईना. स्त्री आणि पुरुष या दोघांचे मनुष्यस्वभाव कसे परस्परविरुद्ध होते पाहा. आपल्या पुरुष सहकार्‍यांप्रमाणेच शत्रूच्या विमानांशी समोरासमोर झुंजायला किंवा शत्रूच्या प्रदेशावर बॉम्बफेक करायला या महिलांची मनगटं नुसती शिवशिवत होती. पण अशा कामगिरीत स्वतः ठार होण्याचा किंवा विमान पडून युद्धकैदी होण्याचा धोका असतोच. या महिला त्यालाही तयार होत्या. पण त्यांचे पुरुष सहकारी तयार नव्हते. आपण जीवंत असताना आपली सहकारी महिला शत्रूकडून ठार केली जाते किंवा युद्धकैदी बनवली जाते, हे कोणता लढवय्या पुरूष सहन करेल? मग वरिष्ठ अधिकार्‍यांनी यावर तोड काढली. महिला वैमानिकांना सर्व प्रकारच्या पुरवठा व्यवस्थेवर नेमण्यात आलं. देशांतर्गत किंवा देशाबाहेर कुठेही म्हणजे अगदी युद्ध आघाडीवरसुद्धा शस्त्रास्त्रं, माणसं, औषधं, अन्नधान्य अशा सर्व आवश्यक गोष्टींचा सतत पुरवठा करत राहायचं. यात कदाचित प्रत्यक्ष युद्धाचा धोका होताच. कारण, अमेरिकन सैन्याचा पुरवठा कापणं, ही जर्मनीची एक चाल होतीच. युद्धात प्रतिस्पर्धी पक्ष हे मार्ग अवलंबतातच.१९४२ ते १९४४ अशी तीन पूर्ण वर्षं एकूण १ हजार ७४ महिला वैमानिकांनी ही सेवा उत्तम प्रकारे बजावली
. काही महिला जर्मन प्रतिहल्ल्यात ठार झाल्या. काही महिला विमानासकट बेपत्ता झाल्या. आजतागायत त्यांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. एकंदरीत आपल्या पुरुष सहकार्‍यांइतक्याच निष्ठेने त्यांनी देशसेवा केली. किंबहुना पुरुषांनी लढावं म्हणून त्या अथकपणे राबल्या. आणि तसंच झालं. १९४४ साली विपुल संख्येने पुरुष वैमानिक प्रशिक्षित होऊन उपलब्ध झाले. आता महिलांची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे ‘वॅस्प’ विभाग बंद करण्यात आला. पुढे १९७७ साली अमेरिकन संरक्षण खात्याने ‘वॅस्प’मधल्या महिलांना ‘वरिष्ठ सेवानिवृत्त वायुसैनिक’ हा मानाचा दर्जा दिला. २०१० साली राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तर ‘वॅस्प’ला अमेरिकन संसदेचं खास सुवर्णपदक दिलं. ‘काँग्रेशनल गोल्डमेडल’ या नावाने ओळखलाजाणारा हा सन्मान फारच उच्चदर्जाच्या कामगिरीसाठी व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येतो. नोएल सालाझारने युद्धात सहभागी झालेल्या तिच्या देशभगिनींची वीरगाथा लिहिलेय. आपल्या लेखिका अशा विषयांकडे कधी वळणार? पंजाब, काश्मीर आणि बंगालमधल्या रणभूमी संशोधक, संशोधिकांची वाट पाहतायत...