आंबोलीचा वाटाड्या

    दिनांक  07-Nov-2019 11:42:58   
|अद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेल्या आंबोली घाटाच्या जैवविविधतेचे निरीक्षण करून तेथील रानवाटांचा वाटाड्या बनलेल्या हेमंत ओगले यांच्याविषयी...

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - निसर्गमय जीवन जगणाऱ्या माणसांमध्ये सुरुवातीपासूनच निसर्ग विज्ञानाची आवड रुजलेली असतेच असे नाही. स्वयंस्फूर्तीने ती निर्माण करावी लागते. या स्फूर्तीनेच काही ’माणसं’ निसर्गाच्या सहवासात अगदी छंदमय आयुष्य जगतात. या ’माणसा’च्या बाबतीतही तसेच काहीसे झाले. पुण्यातील अभियंत्याच्या स्थिर पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून त्यांनी पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले आंबोली हे आपले मूळ गाव गाठले. पर्यटन व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी निसर्गवाचनाला सुरुवात केली आणि त्यामध्ये ते गुंतून गेले. उभयसृप, फुलपाखरे व चतुरांनी त्यांना आंबोलीच्या रानवाटांचा वेध घेण्यास भाग पाडले. त्यांच्यामुळेच हा माणूस आंबोलीचा वाटाड्या झाला. या माणसाचे नाव हेमंत ओगले...

 

 
 
 

दि. १८ एप्रिल, १९७६ साली हेमंत यांचा आपल्या आजोळी इचलकरंजीत जन्म झाला. त्यानंतर त्यांचे बालपण आपल्या मूळ गावी आंबोलीत गेले. ‘जैवविविधतेची खाण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीत वास्तव्य करूनही त्यांच्यामध्ये निसर्गाची आवड रुजली नाही. त्याकाळी आंबोलीत पर्यटक आणि वन्यजीव निरीक्षक-संशोधकांचा राबता नव्हता. शिवाय निसर्गासंबंधी मार्गदर्शन करणारे कोणीच नसल्याने वन्यजीवांच्या निरीक्षणाची किंवा त्यावर अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली नाही, असे ओगले सांगतात. शालेय जीवनात त्यांना विज्ञान विषयाची गोडी लावण्यास शिक्षक कारणीभूत ठरले. परंतु, या गोडीची भुरळ पाडण्यास कोणीच मार्गदर्शक नसल्याने ती व्यर्थ गेली. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर ओगले अभियांत्रिकी शिक्षणाकरिता रत्नागिरीला गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९६ साली ते पुण्यात नोकरीनिमित्ताने स्थायिक झाले. २००२ पर्यंत नोकरी केली. सरतेशेवटी कॉर्पोरेट नोकरीला कंटाळून त्यांनी आपले मूळ गाव आंबोली गाठले.

 
 

 
 

आंबोलीत परतल्यावर पर्यटनाच्या अनुषंगाने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. मालकीच्या जमिनीवर हॉटेल बांधले. त्यादरम्यान पुण्यातून ‘नेचर कॅम्प’ घेऊन येणाऱ्या ग्रुपबरोबर त्यांनी आंबोली भटकण्यास सुरुवात केली. भटकंती करताना त्यांना उभयचर खुणावत होते. परंतु, या जीवांविषयी मनात कुठेतरी भिती होती. अशावेळी 'मलबार नेचर क्लब'चे रोहन कोरगावकर यांनी ओगलेंना साप, बेडूक कसे हाताळावे याचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मनी बसलेली भिती संपवली. त्यानंतर कॅमेरा खरेदी करुन या जीवांच्या छायाचित्रणास सुरुवात केली. गावात संशोधन किंवा निरीक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्या तज्ज्ञांकडून त्यांची ओळख पटवून घेतली.परंतु, आवडीला खतपाणी घालून ती आयुष्यभर जोपासण्याकरिता प्रोत्साहनाची गरज लागते. ओगलेंना हे प्रोत्साहन ज्येष्ठ उभयसृपशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांच्यामुळे मिळाले. ‘नेचर कॅम्प’च्या निमित्ताने त्यांची ओळख गिरींशी झाली. गिरींनी एका पुस्तकासाठी लागणाऱ्या छायाचित्रांसाठी ओगलेंकडे विचारणी केली. छायाचित्रांच्या देवाणघेवाणीतून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. परंतु, निसर्गाची जडलेली ही आवड केवळ छायाचित्रणापुरती मर्यादित होती. तिचा विस्तार निरीक्षण किंवा एखाद्या प्रजातीबाबत केंद्रित नव्हता. गोव्यातील फुलपाखरू बैठकीत ओगलेंची ही आवड एककेंद्रित झाली आणि फुलपाखरांचा शोध सुरू झाला.

 
 

 
 

या बैठकीत त्यांची ओळख फुलपाखरांवर अभ्यास करणाऱ्या डॉ. मिलिंद भाकरे यांच्याशी झाली. बैठकीच्या माध्यमातून फुलपाखरे कशी ओळखावी, त्यांच्या प्रजाती कोणत्या याबाबत सविस्तर माहिती मिळाली. आंबोलीत परतल्यावर ओगलेंनी फुलपाखरांच्या छायाचित्रणाकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या निरीक्षणास सुरुवात केली. यावेळी फुलपाखरु तज्ज्ञ कृष्णमेघ कुंटे यांचे मार्गदर्शन मिळाले. फुलपाखरांच्या विषयात काम करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. महत्त्वाचे म्हणजे, निसर्गमय आयुष्याकडील ही वाटचाल ओगले आपल्या ’व्हिस्टलिंग वुड्स’ हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळत करत होते. बारा वर्ष फुलपाखरांचे निरीक्षण केल्यावर ओगलेंनी डॉ. भाकरेंसोबत पश्चिम घाटातील फुलपाखरांवरती माहितीपूर्ण असे ’बटरफ्लाईज् ऑफ वेस्टर्न घाट’ हे पुस्तक लिहिले. यासाठी चार वर्ष खर्ची घातली. पश्चिम घाटातील फुलपाखरांवरती अभ्यास करणारे विद्यार्थी आणि निरीक्षकांना हे पुस्तक उपयुक्त ठरत आहे.

 

 
 
 
 
ओगलेंच्या मते, आंबोली हे पश्चिम घाटाच्या मध्यभागी असल्यामुळे हे ठिकाण दक्षिण आणि उत्तर पश्चिम घाटात आढळणाऱ्या जैवविविधतेचा संगम आहे. त्यामुळेच या भागातून अजूनही उभयसृपांच्या नव्या प्रजातींचा शोध लागत असल्याचे ते सांगतात. त्यांनी आजवर आंबोलीतून सरीसृपांच्या ५५ आणि फुलपाखरांच्या २०९ प्रजातींची नोंद केली आहे. शिवाय २०१२ साली गिरींबरोबर काम करून सापाची 'कास्टोज कोरल स्नेक' ही नवी प्रजात शोधून काढली. शासनाच्या जैवविविधता मंडळातर्फे फुलपाखरांना देण्यात येणाऱ्या मराठी नामकरणामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. फुलपाखरांची मराठी नावे ठेवण्यासाठी त्यांची शरीरचना, आकार आणि वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने कोणते मुद्दे लक्षात घेणे अपेक्षित आहेत, याविषयी त्यांनी काम केले. ओगले सध्या आंबोलीच्या जैवविविधतेची अधिकृत नोंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या भूभागात आढळणाऱ्या जैवविविधतेची ते प्रजातीनुसार विभागणी करून त्याची यादी तयार करत आहेत. या यादीची शोधपत्रिकांमध्ये नोंद करून ती अधिकृत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, जेणेकरून भविष्यात या भागामध्ये एखादा विनाशिकारी प्रकल्प प्रस्तावित झाल्यास, येथील जैवविविधता अधोरेखित करता येईल. तसेच आंबोलीत आढळणाऱ्या ‘चतुर’ आणि ‘टाचणी’च्या जैवविविधतेचेही ते निरीक्षण करत आहेत. यामाध्यमातून त्यांचीही यादी तयार करत आहेत. अशा या वाटाड्याला पुढील वाटचालीस दै. ’मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा!