फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होणार : नितीन गडकरी

    दिनांक  07-Nov-2019 18:51:05
|
नागपूर : राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचाबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी महत्त्वपूर्ण विधान केले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, " राज्यात सुरू झालेला राजकीय पेच लवकरच सुटणार असून, तशी चर्चा शिवसेनेशी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्याने, देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार बनेल. महायुतीला जनादेश मिळाल्यामुळे भाजप-शिवसेना लवकरच सरकार स्थापन करतील," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार ही अफवा असल्याचेही स्पष्ट केले. सध्या आपण दिल्लीत असून राज्यात येण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "राज्यात भाजप-शिवसेनेला बहुमताचा कौल मिळालेला असून सत्तास्थापनेचा निर्णय लवकरच होईल. भारतीय जनता पक्षाचे म्हणाल तर, देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार स्थापन होईल. भारतीय जनता पक्षाने १०५ जागा जिंकल्या असून हे पाहता ज्याने जास्त जागा जिंकल्या आहेत, त्याच पक्षाचा मु्ख्यमंत्री होतो," असेही गडकरी यांनी अधोरेखित केले.

 

राजकारणाशी संबंध जोडणे अयोग्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या भेटीबाबत गडकरी यांना प्रश्न विचारला असता गडकरी म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचा संबंध राजकारणाशी जोडणे योग्यही नाही. हे अयोग्य आहे, " असे ते म्हणाले.