सदोष यंत्रणेमुळेच अपुरा पाणीपुरवठा

    दिनांक  07-Nov-2019 19:18:59
|

मुंबई
: पावसाळ्यानंतर देखभाल दुरुस्तीची कामे आणि वेरावली जलाशयात निर्माण झालेला तांत्रिक दोष यामुळे मुंबईला अपुर्‍या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याचे उघड झाले. मागील वर्षी (२०१८) मध्ये पावसाने दगा दिल्याने जलाशये कमी भरली. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ पासून पाणीकपात करावी लागली होती. मात्र २०१९ मध्ये जुलैमध्येच विक्रमी पाऊस झाल्याने सर्व धरणे भरून वाहू लागली आणि पाणीकपात मागे घेण्यात आली. हा पाऊस सप्टेंबरपर्यंत कायम होता. त्यामुळे व्यवस्थित पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना गणेशोत्सव, दिवाळी या दरम्यान काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवत होती. स्थायी समितीत याचे पडसाद उमटताच प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले.


सप्टेंबर
-ऑक्टोबर २०१९ मध्ये पिसे उदंचन केंद्र व पांजरापूर संकुल येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित झाला होता. तसेच पिसे बंधार्‍यावरील इंफ्लेटेड गेटची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याने बंधार्‍यातून उचलण्यात येणार्‍या पाण्यावर मर्यादा आल्या आणि त्याच्या परिणामी पाणीपुरवठ्यात थोडी अनियमितता आली. वारंवार खंडित होणारा विद्युतपुरवठा आणि देखभाल दुरुस्तीची कामे यामुळे पाणीपुरवठ्यात येणारी तूट भरून काढण्यात तीन-चार दिवसाचा अवधी जात होता. त्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईभर कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वेरावली जलाशयात तांत्रिक दोष निर्माण झाल्यानेही मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. तो दोष दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.