‘कलात्मक प्रवास’

    दिनांक  07-Nov-2019 19:58:54
|
आपली कलेची आवड मेहनतीने आणि कष्टाने पूर्ण करणार्‍या प्रसिद्ध कलाकार श्याम आडकर यांच्या संघर्षाची कहाणी...प्रत्येक माणसात एखादी कला नक्कीच असते
. काही आपल्या कलेसाठी मेहनतीने आपले भविष्य बनवितात. रांगोळीसारख्या कलेत आपले नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन यश संपादन करणार्‍या श्याम आडकर यांचा कलात्मक प्रवास खूपच रोचक आहे. भांडुपमध्ये राहणारे श्याम आडकर नावाजलेले रांगोळी व चित्रकलेचे कलाकार आहेत. श्यामच्या घरात कलेचा वारसा नसल्याने फक्त आपल्या हौसेतून ते ही कला शिकले. वडिलांची नोकरी सुटल्याने एक वेळच्या जेवणाची भ्रांत असताना त्यांच्या आईने शिवणकाम करून आपल्या घरचा गाडा चालवला. श्यामला याची जाणीव असल्याने आईला मदत करण्यासाठी त्याला काहीतरी करायचे होते. वयाच्या ६ व्या वर्षापासूनच श्यामने शेजारी राहणार्‍या एका काकांची सुंदर रांगोळी बघून आपणही अशी सुंदर रांगोळी काढायचे ठरविले, मात्र मुळात चित्रकला चांगली नसल्याने त्याला खूप मेहनत करावी लागली. सतत ४ ते ५ वर्ष सराव केल्यानंतर श्यामचा चित्रकलेत जम बसू लागला. खरं म्हणजे श्यामला जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कलेचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे त्याला आपले हे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्याने आपली मेहनत आणि शिकण्याची जिद्द कायम ठेवत स्वत:ला पारंगत केले. याच चित्रकलेच्या माध्यमातून रांगोळी काढण्यास सुरुवात केली. श्यामच्या रांगोळीला सगळ्यांचीच पसंती मिळत असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला. श्यामने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आणि चित्रकलेचे प्रयोग आत्मसात केले.याच काही वर्षांमध्ये श्यामला सारस्वत बँकेत नोकरी लागल्याने त्याने घरात मदत करण्यास सुरुवात केली
. नोकरी आणि आपली कला याचा ताळमेळ बसवत आपल्यासारख्या मध्यमवर्गीय मुलांना कलेची आवड जपताना रोजगार कसा मिळू शकतो, असा विचार श्यामच्या मनात आला. यामुळे भांडुपमधील कलाकारांसाठी त्याने कलाविश्व आर्ट्स अकॅडमी सुरू केली. यात हौशी आणि मेहनती कलाकारांना रांगोळी आणि चित्रकला शिकविण्यास श्यामने सुरुवात केली. आपली कला सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्यामने हे पाऊल उचलले. हे शिक्षण देताना श्यामने रांगोळी आणि चित्रकलेसाठी लागणारे पैसे आपल्या कामातूनच खर्च केले. यात अनेकवेळा आर्थिक अडचणी आल्या. मात्र, त्याच्या कलाकारांनी त्याला साथ दिली. या अकॅडमीमध्ये अगदी ७ वर्षांच्या लहान मुल-मुलींपासून अनेक वयोगटातील कलाकार सामील आहेत. नुकतीच या अकॅडमीला आठ वर्ष पूर्ण झाली असून यात १५० कलाकार आहेत. या कलाकारांनी अनेक नामांकीत राजकीय नेते आणि सिनेकलाकार, खेळाडू यांची रेखाचित्रे काढून त्यांना भेट दिली आहेत. या कलाकारांच्या टीमबरोबर श्यामने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नामांकित कंपन्यामध्ये, राजकीय कार्यक्रमात काम केले. यात मिळणार्‍या कामाचे पैसे श्याम आपल्या कलाकारांना देतो. त्यामुळे कलाकारांना आपली कला जोपासताना रोजगारही मिळतो. होतकरू कलाकारांना या अकॅडमीत अनेक गोष्टी शिकावयास मिळत आहेत. या कलाकारांना उत्कृष्ट रांगोळी आणि रेखाचित्रांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गेल्यावर्षी भांडुपमध्ये कलाविश्व आर्ट्स अकॅडमीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची रांगोळी रेखाटली होती.
या रांगोळीसाठी सलग दोन दिवस ४० पेक्षा जास्त कलाकार मेहनत घेत होते
. ही रांगोळी बघण्यासाठी अनेक राजकीय नेते आणि नागरिकांनी हजेरी लावली होती. रतन टाटा यांच्या जन्मदिवसानिमित्त हॉटेल ताजमहाल येथे रतन टाटा यांच्या आयुष्यावर रांगोळी काढण्यात येणार आहे. श्यामचा हा कलात्मक प्रवास सोपा नव्हता. अनेक जबाबदार्‍या पार पाडत श्यामने आपल्या कलेतून अनेक कलाकार घडविले. आपल्या घरची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारली. कलेतून आपले स्वप्न श्यामने पूर्ण केले आहे. त्यामुळे तो अनेक कलाकारांचा रोल मॉडेल आहे. नुकतीच श्यामने लहान मुलांसाठी सामाजिक संस्था सुरू केली आहे. यात श्यामने कलाविश्व आर्ट्स अकॅडमीला मिळणार्‍या कमाईतील काही वाटा गरीब मुलांसाठी खर्च करता येणार आहे. जेणेकरून जी मुले शिक्षणावाचून उपेक्षित आहेत, त्यांना शिक्षण घेता येणार आहे. यामुळेे सर्वच स्तरातून श्याम आणि त्याच्या टीमचे कौतुक होत आहे. ज्यांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आहे, ते कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय पूर्ण करतात, हे श्यामने आपल्या मेहनतीने दाखवून दिले आहे. असे असतानाही सामाजिक कामातून आपले समाजासाठी असणारे कर्तव्य बजावणे श्याम विसरला नाही, ही नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. श्यामच्या या कलात्मक प्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’ च्या अनेक शुभेच्छा!
-कविता भोसले