राहुल देशमुख यांना 'केशवसृष्टी' पुरस्कार

    दिनांक  06-Nov-2019 11:27:49
| 

मुंबई : दिव्यांगांच्या विकासासाठी उल्लेखनीय काम करणार्या 'नॅशनल असोसिएशन फॉर वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड' या संस्थेचे संस्थापक राहुल देशमुख यांना दहावा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर करण्यात आला. येत्या सोमवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी रा.स्व. संघाचे सर कार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते शिवाजी पार्कच्या सावरकर सभागृहात या पुरस्काराने राहुल देशमुख यांना गौरविण्यात येणार आहे.

 

४२ वर्षीय राहुल देशमुख हे तरुण 'नॅशनल असोसिएशन फॉर वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड' या दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी वाहून घेतलेल्या संस्थेचे संस्थापक आहेत. दिव्यांगांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षी दृष्टी गमावूनदेखील हताश न होता राहुल यांनी शिक्षणाचा ध्यास धरला.

 

उच्चशिक्षित राहुल यांनी समाजातील समदु:खी बंधु-भगिनींच्या भवितव्याचा विचार करून वयाच्या १७ व्या वर्षीच आपल्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला. आधी 'स्नेहांकित' आणि नंतर नॅशनल असोसिएशन फॉर वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (एनएडब्ल्यूपीसी) या नावाने अंध, मूकबधिर, अपंग, गतिमंद अशा पीडितांसाठी संगणक प्रशिक्षण, करियर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास ही दालने उघडली.

 

अशा गरीब मुलामुलींच्या राहण्याची, जेवणाची, आरोग्याची जबाबदारी घेत देशमुख यांनी समाजापुढे अनोखा आदर्श ठेवला. त्यांच्या याच कार्याची दखल घेत अशा कार्यक्षम संस्थेला दहावा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या ११ नोव्हेंबर रोजी रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते शिवाजी पार्कच्या सावरकर सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.