समर्थांचे ‘सुंदरकांड’

    दिनांक  06-Nov-2019 21:30:02
|

सुंदरकांडात मारुतीने केलेल्या लंकाप्रवेशाचे व लंकादहनाचे वर्णन समर्थांनी अतिशय वीरश्रीयुक्त व परिणामकारकरित्या केले आहे. या कांडात मारुतीने सीतेचा शोध लावला आणि रावणाची लंका जाळली, याचे वर्णन आहे. ती एकप्रकारे हनुमानाची विजयी मोहीम ठरली. म्हणून त्या कांडालासुंदरकांडअसे नाव दिले आहे. संपूर्णसुंदरकांडमारुतीच्या पराक्रमाला वाहिलेले आहे.


समर्थांनी रामायणातील ‘सुंदरकांड’ व ‘युद्धकांड’ ही दोन कांडे लिहिली. ‘सुंदरकांडा’त मारुतीने केलेल्या लंकाप्रवेशाचे व लंकादहनाचे वर्णन समर्थांनी अतिशय वीरश्रीयुक्त व परिणामकारकरित्या केले आहे. या कांडात मारुतीने सीतेचा शोध लावला आणि रावणाची लंका जाळली, याचे वर्णन आहे. ती एकप्रकारे हनुमानाची विजयी मोहीम ठरली. म्हणून त्या कांडाला ‘सुंदरकांड’ असे नाव दिले आहे. संपूर्ण ‘सुंदरकांड’ मारुतीच्या पराक्रमाला वाहिलेले आहे. त्यात हनुमानाच्या शेपटाने कसा कहर केला, हे विस्तारपूर्वक सांगितले आहे. लंकानगरीत प्रवेश केल्यावर हनुमानाने प्रथम तेथील सैन्यदल पाहिले. जे सैन्यदल पाहून देवांचाही थरकाप होईल, अशी त्या बलाढ्य सैन्याची ख्याती होती. मारुती बुद्धिमान! त्यामुळे अशावेळी गुप्त राहणे मारुतीने पसंत केले. गुप्तपणेच त्याने तेथील गोपुरे, धर्मशाळा तसेच तेथील तुरुंगही न्याहाळले. तुरुंगात त्याला वेगळेच दृश्य दिसले व त्याचे त्याला वाईट वाटले.हिणासारखे देव ते दीन जाले ।

नसे शक्ती ना युक्ती पोटी गळाले ॥

भयभीत ते कांपती दैन्यवाणे ।

बहू गांजिले दुःख ते कोण जाणे ॥या ओवीतील ‘देव’ म्हणजे स्थानिक सज्जन सात्त्विक लोक असे समजल्यास ते रावणाच्या स्वभावाला अनुसरून होते. हे लोक ‘हीनदीन’ होऊन गेले होते. येथे समर्थांनी एक महत्त्वपूर्ण सिद्धांत सांगितला आहे. दुष्टांचा प्रतिकार करायचा तर युक्ती पाहिजे. पण, नुसती युक्ती अथवा मुत्सद्देगिरी असून भागत नाही. त्या युक्तीच्या मागे शक्ती पाहिजे, तरच युक्ती यशस्वी होते. समर्थ म्हणतात, ‘शक्ती युक्ती जये ठायी । तेथे श्रीमंत धावती॥’ ते सर्व पाहून मारुतीला ‘कोप आला मनामाजी । आवेशे तो थरथरीला ॥’ मारुती एकटा होता. त्यामुळे ‘प्रसंगी तेथे मारुती गुप्त जाला।’ अशावेळी गुप्तपणे काम केले पाहिजे, असे ठरवून रावणाचा प्रतिकार करण्याचा व लंका उद्ध्वस्त करण्याचा बेत त्याने मनोमन केला. मारुतीजवळ शक्ती, युक्ती, बुद्धी, धैर्य, निर्भयता हे सारे दुर्मीळ गुण एकत्र होते. म्हणून तो समर्थांना अतिशय प्रिय होता. आपण गुप्त राहून आपल्या शेपटीच्या साहाय्याने कार्य करायचे असे मनाशी ठरवूनबहू मानिले गर्व मोठ्या बळाचा । तया झोडितो दास मी राघवाचा॥’ असे म्हणून तो गुप्तपणे निघाला. ‘देहे आपुले सर्वही गुप्त केले। प्रसंगी तये पुच्छ ते वाढविले॥’ या पुच्छाने पुढे जो पराक्रम केला, त्याचे वर्णन समर्थांनी समरसतेने व वीरश्रीयुक्त केले आहे.बळे लांगुले रोधिल्या सर्व वाटा ।

बहू तुंबला लोक तो दाट खेटा ॥

तयाभोवतें पुच्छ बांधोनि भारे ।

नभी पोकळीमाजि नेटे उभारे ॥

बहुभार ते स्वार मध्येच खंडी । महामस्त ते हस्ति नेटे उलंडी ॥

गुरे शाकटे राक्षसालागी पाडी ।

पद्री पुच्छ बांधोनि पाडी पछाडी ॥

पडो लागले दैत्य नेटे बदादा । कितीयेक ते दीर्घदेही भदादा ॥

हे सर्व सांगून स्वामी म्हणतात, ‘दिसेना परी तो गर्जतो भुभूःकारे ॥’ या काव्यातील स्वामींची रचना वस्तुनिष्ठ, ध्येयनिष्ठ व प्रत्ययकारी आहे. मारुतीच्या या पुच्छाने लंकेला वेढा घातला. घराघरातून फिरून ते सामान व भांडीकुंडी पाडत होते, फोडून टाकीत होते. लोक घाबरून रस्त्यावर सैरावैरा पळू लागले. पुच्छाने त्यांच्या वाटा अडवल्या, त्यांना उचलून ते आकाशात फेकू लागले. त्याने घोडे, हत्ती, रथ उलथून पाडले. ते पुच्छ कोणाला आवरेना.कितीयेक राक्षेस ते हाकलिती । कितीयेक ते राक्षेस बोंबलिती ॥

कितीयेक ते थोर जाली रुदैती । कितीयेक राक्षेस चर्फडिती ॥

अशा गोंधळात दिवस संपला. अंधार पडू लागला तरी ते पुच्छ फिरतच राहिले. ही बातमी रावणापर्यंत पोहोचण्याअगोदर ते पुच्छच राजसभेत पोहोचले. त्याने सर्व दिवे विझवून टाकले. राजसभेतील राक्षसवीरांचे त्याने हाल केले. त्यांची वस्त्रे फाडली. मग तो रावणाकडे वळला. रावणाला थापड मारून त्याचा मुकुट खाली पाडला. त्याची वस्त्रे फाडली. सर्वांची अशी फजिती करून मारुती पुन्हा गुप्त झाला. रावणाने ब्रह्मदेवाला पाचारण करून या वादळाला शांत करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाच्या विनंतीला मान देऊन मारुती शांत झाला. हैदोस घातलेल्या त्या शेपटीला आग लावण्याची आज्ञा रावणाने केली. त्या शेपटीला वस्त्रे बांधून त्यावर तेलतूप टाकून ते पेटवले. पण, ते काही पेटेना. तेव्हा रावणाने स्वतःच त्यावर जोराने फुंकर मारली, तेव्हा भडका उडाला आणि-

जळाली मुखे भस्मल्या खांडमिशा ।

बहुसाल लंबित होत्या विशेषा ॥

‘भावार्थ रामायणात’ही एकनाथांनी या प्रकाराचे असेच वर्णन केले आहे.

रावणे फुंकित हुताशन ।

भडका एकसे उठोन ।

जाहले दहन दाढीमिशी ॥

तुकोबांनीही या संदर्भात म्हटले आहे की

हनुमंत महाबळी ।

रावणाची दाढीजाळी ।

तया माझा नमस्कार ।

वारंवार निरंतर ॥

एकंदरीत हे ‘दाढी-मिशा दहन’ प्रकरण तिघांनाही भावले होते! हे वर्णन सांगोपांग करण्यामागे काहीतरी सांकेतिकता आहे आणि ती त्याकाळातील लोकांना माहीत होती. म्हणून रामदासांनी ती जास्त उलगडून दाखवली नसावी. या कथानकातील गुप्तरुपे मांडलेली रुपके तारतम्याने शोधत येतात. त्या काळचा ‘दाढीवाला रावण’ म्हणजे ‘औरंगजेब.’ क्षत्रियात श्रेष्ठ असा ‘कोदंडधारी राम’ म्हणजे ‘तत्कालीन शिवराय.’ पराक्रमी, स्वामिनिष्ठ ‘हनुमान’ म्हणजे ‘मराठा सैन्याचा सेनापती’ आणि शत्रूंचा उच्छाद करणारे ‘मारुतीचे पुच्छ’ म्हणजे ‘मराठा सैन्य.’ वानरांचे सामर्थ्य शेपटीत असते. तसे सेनापतीचे सामर्थ्य त्याच्या सैन्यात असते. ही सांकेतिकता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न स्वामींनी केला आहे. एका काव्यात ते म्हणतात, ‘पूर्वी रामाने जे दैत्य मारले होते, तेच दैत्य आता पुन्हा बलवान झाले आहेत.’ या रुपकातील रोख औरंगजेब व त्याच्या अत्याचारी सैन्याकडे आहे, हे न सांगताही कळते. अशा रीतीने या रुपकांद्वारा लोकात जागृती घडवून आणावी, हे स्वामींना योग्य वाटले होते. शिवरायाच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने औरंगजेबाचा नायनाट करावा, ही समर्थांनी तळमळ होती. त्या उद्देशानेच शिवरायांनी आग्र्याला जाण्याचे ठरवले. रामदासांचे रामायण त्यांच्या डोळ्यांसमोर असावे. औरंगजेबाने दहाहजारी ऐवजी पाच हजारीत उभे करून जाणूनबुजून महाराजांचा अपमान केला होता. त्यावेळेस योग्य संधी मिळती असती तर रामावतारी शिवराय, त्यांचे लढवय्ये सेनापती आणि मारुतीच्या शेपटाप्रमाणे बलवान सैन्य यांनी आग्र्यात रामाच्या लंकेवरील स्वारीची पुनरावृत्ती केली असती आणि समर्थांनी ‘आनंदवनभुवनी’ काव्यात जे पाहिले होते-

बुडाला औरंग्या पापी ।

म्लेंछसंहार जाहला ॥

त्या स्वप्नाची पूर्तता झाली असती.-सुरेश जाखडी