अयोध्या निकालानंतरही सामाजिक सौहार्द कायम राखण्याचा निर्धार

    दिनांक  05-Nov-2019 22:04:26
|

नवी दिल्ली
: रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर देशात सामाजिक सलोखा तसेच सौहार्द कायम राहावे, म्हणून आज राजधानी दिल्लीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संघपरिवाराच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह कृष्णगोपाल, सह संपर्कप्रमुख रामलाल, माजी केंद्रीय मंत्री सय्यद शहनवाज हुसेन यांच्यासह मुस्लीम समाजातील अनेक धर्मगुरू तसेच मान्यवर उपस्थित होते. रामजन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कसाही आला तरी सामाजिक आणि धार्मिक सौहार्द, देशाची एकता आणि अखंडता तसेच समाजातील बंधुभाव कायम राखण्याचा निर्धार बैठकीला उपस्थित मान्यवरांनी एकमुखाने व्यक्त केला.


आपल्या फायद्यासाठी काही असामाजिक तत्त्वे लोकांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करतील
, पण त्याला कोणत्याही परिस्थितीत बळी न पडण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. विविधतेत एकता हेच आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी कायम राखले पाहिजे, असे आवाहन बैठकीत मान्यवरांनी केले. देशाची एकता आणि अखंडता तसेच सामाजिक सौहार्द कायम राखणे, ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदरी आहे, याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. बैठकीला जमियत-उलेमा-ई-हिंदचे महासचिव महमूद मदानी, चित्रपट निर्माते मुझफ्फर अली, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे कमल फारुकी, माजी खासदार शाहीद सिद्दिकी आणि शिया धर्मगुरू काल्बे जावेद यांच्यासह मुस्लीम समाजातील अनेक धर्मगुरू, समाजसुधारक आणि विचारवंत उपस्थित होते.