ऐतिहासिक लंडनब्रिजवर दहशतवादी हल्ला

    दिनांक  30-Nov-2019 10:32:45
|लंडन : ऐतिहासिक लंडन ब्रिजवर पादचाऱ्यांवर झालेला चाकूहल्ला व गोळीबार हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत हल्लेखोर ठार झाला असून, या दहशतवादी हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसर रिकामा केला. चाकूहल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल असल तरी पाठोपाठ गोळीबाराचे वृत्त आल्याने भीतीचे वातावरण पसरले.

लंडन शहरात झालेल्या या घटनेमुळे खळबळ माजली असून पोलिसांनी या परिसराला वेढा घातला आहे. या ब्रिजवरील वाहतूक थांबविण्यात आली असून या परिसरातील कार्यालये आणि इमारतींना टाळे ठोकण्यात आले आहे. या घटनेनंतर तेथे मोठा पोलीस बंदोबस्त आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली आहे.

या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. हा प्रकार नक्की कोणत्या कारणास्तव घडला हे सुस्पष्ट झाले नसले तरी आम्ही याकडे दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टिकोनातून पाहात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने सक्रिय झाल्याबद्दलही त्यांनी कौतुक केलं आहे. याबाबत ट्विटरच्या माध्यमातून जॉन्सन यांनी माहिती दिली.

याआधी लंडन ब्रिजवर जून २०१७ मध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ११ जणांचा बळी गेला होता.