ही जोडी पुन्हा प्रेक्षकांना 'गोलमाल' करण्यास सज्ज !

30 Nov 2019 13:15:11



रोहित शेट्टी आणि अजय देवगणही जोडी प्रेक्षकांना पुन्हा गोलमाल करण्यास सज्ज झाली आहे. प्रेक्षकांना आपल्या धमाल अंदाजांने खळखळून हसवणाऱ्या गोलमालसिरीजच्या पाचव्या भागाला लवकरच सुरुवात होणार आहे. रोहित शेट्टीच्या सिंबाचित्रपटातील एका गाण्यातून गोलमाल ५ चे संकेत दिले होते. तेव्हाच गोलमाल ५तयार होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे ही बातमी कधी येते याकडे प्रेक्षकांचे लक्ष होतेच. चित्रपट समीक्षक तरान आदर्श यांनी ट्विटरवरून या चित्रपटाची माहिती दिली.


या चित्रपटाची कथा नविन आणि उत्कंठा वाढवणारी असेल. चित्रपटाच्या शूटिंगला पुढच्या वर्षी सुरुवात होणार आहे. अजय देवगणसोबत गोलमालच्या इतर कलाकारांची धमाल पुन्हा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अरशद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तळपदे यांच्यासोबत यावेळी काही नविन कलाकारांचाही समावेश होणार आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री कोण असणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अभिनेत्री सारा अली खानने रोहित शेट्टीला गोलमालच्या पुढच्या भागात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे या चित्रपटात साराची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

सध्या रोहित शेट्टी आपल्या आगामी सुर्यवंशीचित्रपटावर काम करत आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. तर, अजय देवगणही आपल्या आगामी तानाजी द अनसंग वॉरिअरया चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज होणार आहे.

Powered By Sangraha 9.0