पोलिसांच्या कारवाईत दोन नक्षलवादी ठार

    दिनांक  30-Nov-2019 21:30:20
|गडचिरोली : गडचिरोली पोलीस कमांडोंनी अबुझमाड येथील नक्षली कॅम्प उद्ध्वस्त केला. यात दोन नक्षलवादी ठार झाले असून चार नक्षली जखमी झाल्याचे समजते. नक्षल सप्ताहाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानास हे मोठे यश मिळाले आहे. अबुझमाड जंगल परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा गडचिरोली पोलिस दलातील 'सी-६०'चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. या जंगलात प्रशिक्षण घेत असलेले ७० ते ८० नक्षलवादी व पोलीस यांच्यात चकमक उडाली. सुमारे एक तास ही चकमक चालली. रात्रभर कडक नाकेबंदी केल्यानंतर आज शनिवारी सकाळी नक्षल्यांनी आयईडी स्फोट घडवून गोळीबार सुरू केला. या हल्ल्याला जवानांनीही प्रत्युत्तर दिले. आपला टिकाव लागणार नाही, हे ओळखून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला.

 

चकमकीनंतर जवानांनी शोध अभियान राबविले असता. दोन नक्षलवादी मृतावस्थेत आढळले. मृतक नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी चार हत्यारे, एक प्रेशर कूकर बॉम्ब, वायर बंडल व मोठ्या प्रमाणावर भूसुरुंग स्फोटाचे साहित्य, प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य, तसेच तीन क्विंटल तांदूळ, एक क्विंटल गहू असे दैनंदिन साहित्य हस्तगत केले. आगामी नक्षल सप्ताहाच्या पृष्ठभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानास मिळालेले हे सर्वांत मोठे यश मानले जात आहे. जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.