ओवेसींनी शिवसेनेची उडवली खिल्ली

    दिनांक  03-Nov-2019 16:28:27
|
मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेना समसमान वाटपावर ठाम असून मुख्यमंत्री पदाचीही समसमान वाटणी व्हावी यासाठी अडून आहे. याच ५०-५० फ़ॉर्म्युल्याची एमआयएमचे असदुद्दिन ओवेसी यांनी खिल्ली उडवली आहे. एका सभेत बोलताना त्यांनी प्रश्न केला . "हे ५० -५० काय आहे ? कोणते नवीन बिस्कीट आहे का ?" असा प्रश्न करत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. 'इश्क करना है तो आग मे कुद जाओ' जर शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाहिजे आहे तर कशाला घाबरता थेट निर्णय घ्या," असा खोचक सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.


सत्तावाटपावरून शिवसेना भाजपमधील वाद शिगेला पोहोचला आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडून २४ ऑक्टोबरला निकालही जाहीर झाला. एकाही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र महायुतीला एकत्रितपणे बहुमत आहे. भाजप १०५ जागा मिळवून सर्वाधिक जागांवर विजयी झालेला पक्ष ठरला आहे. शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. येत्या काळात मुख्यमंत्री पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.