सत्तेचा पेच लवकरच सुटेल!

    दिनांक  03-Nov-2019 22:01:25
|

अकोला : राज्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या संघर्षावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हा पेच लवकरच सुटेल, असे सुतोवाच केले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारस्थापनेचा पेच लवकरच सुटणार असल्याचे संकेत दिल्याने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले
, “सरकारस्थापनेचा पेच लवकरच सुटेल असे मला वाटते, शेवटी सर्वांना महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे आहे. महाराष्ट्रात सध्या शेतकर्‍यांवर मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झाले पाहिजे. कारण, काळजीवाहू सरकारला निर्णय घेण्यासाठी काही बंधने असतात, सध्या जे निर्णय घेता येतील ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल, अशी मला अपेक्षा आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील लाखनवाडा, चिखलगाव आणि म्हैसपूर या गावांमधील शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये जाऊन पावसाने झालेल्या नुकसानीची रविवारी स्वतः पाहणी केली. फडणवीस यांनी यावेळी बांधावर जाऊन शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी नुकसानावरील उपापययोजनांसाठी अधिकार्‍यांसोबत तातडीने बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, “परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. फोटो असेल तरी पंचनामे समजून मदत दिली जाईल. सरकारी यंत्रणा पोहोचू शकत नसेल तरी शेतकर्‍यांना यामुळे मदत मिळेल. तसेच 6 नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुष्काळात मिळणार्‍या सर्व योजनांद्वारे शेतकर्‍यांना मदत केली जाईल. विमा नसलेल्या शेतकर्‍यांनाही मदत देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी सरकारची चर्चा सुरू आहे. अवकाळी पावसाने सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग अशा सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत बोलताना ते म्हणाले
, “परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने राज्यावर मोठे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांना सर्व मदत करण्यात येत आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. पण शेतकर्‍यांनी चिंता करू नये. त्यांना सर्व मदत केली जाईल,” अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.