डोनाल्ड ट्रम्प यांचे अनोखे 'थँक्सगिविंग सेलिब्रेशन'

    दिनांक  29-Nov-2019 13:35:03
|अफगाणिस्तानचा दौरा करत घेतली अमेरिकन सैन्याची भेट

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुरुवारी अचानक अफगाणिस्तानात पोहचले. थँक्सगिविंग डेच्या निमित्ताने ट्रम्प अफगाणिस्तानात तालिबानशी सामना करत असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांना भेटण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी तिथे पोहचले. ट्रम्प प्रशासनाकडून या दौऱ्याची कोणतीच औपचारिक घोषणा करण्यात आली नव्हती. हा त्यांचा पहिलाच अफगाणिस्तान दौरा होता. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी, यांनाही ट्रम्प यांच्या येण्याची माहिती त्यांच्या लँडिंगपूर्वी देण्यात आली होती.

अमेरिकेत नोव्हेंबरच्या चौथ्या गुरुवारी थँक्सगिविंग डे साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशात सुट्टी असते. या दिवशी सर्वजण आपले मित्र, नातेवाईक, आणि इतरांचे आभार मानतात. १७८९ मध्ये अमेरिकेतील संसदेच्या आग्रहानंतर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी थँक्सगिविंग डेची सुरुवात केली होती.


'नंतर बोलू, आधी आपण सगळे मिळून काहीतरी खाऊ', असे म्हणत ट्रम्प यांनी सैनिकांसोबत जेवण केले. ट्रम्प यांनी काबुलमधील बगराम एयरफील्डवर असलेल्या सैनिकांची भेट घेतली. त्यानंतर ट्रम्प यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांची भेट घेतली. या कार्यक्रमासाठी ट्रम्प यांच्यासोबत काही निवडक पत्रकारही होते.