मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

29 Nov 2019 18:42:53

आरे कारशेड स्थगितीच्या निर्णयावर सडकून टिका


मुंबई (प्रतिनिधी) - आरेमधील मेट्रो-३ च्या कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर भाजपकडून यावर जोरदार टिका करण्यात आली आहे. मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्टि्ट केले आहे. तसेच "धनुष्यबाणा"च्या "हातात" "घड्याळ" बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरते, अशा आशयाचे व्टि्ट भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केले आहे.

आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आरेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली असून त्यासंदर्भात पुर्नसर्वेक्षण करुनच निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला भाजपने जोरदार विरोध केला आहे. जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर ७० % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद.. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे नव्हे, असे आशिष शेलार यांंनी म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0