
मुंबई : चित्रपट व रंगभूमीवरील चतुरस्र अभिनेते शरद पोंक्षे यांना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार जाहीर झाला. रोख, सन्मानचिन्ह, शाल, मानपत्र असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे यंदा १८ वे वर्ष आहे.
स्वातंत्रवीर सावरकरांच्या ज्वलंत विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या महान व्यक्तीस सावरकर पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार अभिनेते शरद पोंक्षे यांना जाहीर झाला आहे. त्यांनी २५ हून अधिक व्यावसायिक नाटके, ७० हून अधिक दर्जेदार मालिकांमधून अभिनय केला आहे. तसेच राष्ट्रगीत, नथुराम ते देवराम, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा विषयांद्वारे ५००हून अधिक व्याख्यानातून समाजप्रबोधन केले आहे. रविवार १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या पटांगणावर होणाऱ्या या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शुभदा जोशी यांच्या हस्ते पोंक्षे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयाकर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे.