महाराष्ट्रात प्रथमच आढळला 'लेगेस हाॅक' शिकारी गरुड

    दिनांक  29-Nov-2019 13:18:27   
|माथेरानच्या जंगलामधून दुर्मीळ शिकारी गरुडाची नोंद


मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रातून प्रथमच 'लेगेस हाॅक इगल' या गरुडाचा छायाचित्रित पुरावा पक्षीनिरीक्षकांच्या हाती लागला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानच्या जंगलामधून या शिकारी गरुडाची नोंद करण्यात पक्षीनिरीक्षकांना यश मिळाले आहे. प्रामुख्याने दक्षिण भारत आणि श्रीलंकेत अधिवास असलेल्या या गरुडाचे महाराष्ट्रात प्रथमच दर्शन झाल्याने पक्षीनिरीक्षणाच्या चळवळीला यश मिळाले असून पक्षीनिरीक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

 
 

 
 
 

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील पक्षीनिरीक्षणाच्या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हौशी पक्षीनिरीक्षक व पक्षीअभ्यासक यांच्यामध्ये समन्वय वाढला आहे. त्यामुळे राज्यात अनेक दुर्मीळ पक्ष्यांचा वावर असल्याच्या नोंदी समोर आल्या आहेत. या नोंदी समोर येण्यास समाजमाध्यमे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशाच प्रकारची एक दुर्मीळ नोंद डोंबिवलीचे पक्षीनिरीक्षक मनीष केरकर यांनी केली आहे. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माथेरानच्या जंगलात दुपारी पक्षीनिरीक्षण करताना त्यांना एक शिकारी पक्षी आकाशात घिरट्या घालताना आढळला. कॅमेऱ्याने त्याचे छायाचित्र टिपल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, हा पक्षी शिकारी गरुडांच्या 'हाॅक' प्रजातीमधील अत्यंत दुर्मीळ 'लेगेस हाॅक इगल' असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 
 

 
 

मनीष केरकर यांनी 'लेगेस हाॅक' गरुडाची केलेली नोंद या पक्ष्याची महाराष्ट्रातील पहिलीच नोंद असल्याची माहिती प्रसिद्ध पक्षीअभ्यासक आदेश शिवकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. 'आययूसीएन'च्या संकटग्रस्त प्रजातींच्या यादीत या पक्ष्याचा समावेश होतो. म्हणूनच तो दुर्मीळ पक्षी असल्याचे त्यांनी सांगितले. या पक्ष्याचा अधिवास प्रामुख्याने दक्षिण भारतातील पश्चिम घाट आणि श्रीलंकेमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हा पक्षी आढळून येणे ही दुर्मीळ घटना आणि नोंद असल्याचे, शिवकर म्हणाले. पक्षीनिरीक्षणाप्रती वाढत्या प्रबोधनामुळे अशा महत्त्वाच्या नोंदी समोर येत असल्याचे शिवकर यांनी नमूद केले. माथेरानमध्ये आढळलेल्या 'लेगेस हाॅक इगल'ची ओळख पटवण्यासाठी पक्षीनिरीक्षक राजेश पुजारी आणि अविनाश शर्मा यांनी मदत केल्याचे मनीष केरकर यांनी सांगितले.

 
 

'लेगेस हाॅक इगल' विषयी........

'लेगेस हाॅक इगल' हा गरुडांच्या 'हाॅक' या प्रजातीमधील असून तो शिकारी पक्षी आहे. त्यामधील नर हा २८ इंच आणि मादी ३० इंच लांब असते. डोंगररागांमधील कपारीतील झाडांवर हा पक्षी घरटे बांधतो. त्याच्या खाद्यामध्ये शेकरु, मोर अशा सस्तन प्राण्याचा समावेश आहे. आपल्या तीक्ष्ण नख्यांनी हा पक्षी या प्राण्यांची शिकार करतो.