कालव्याची दीडशेवी जयंती, भिंतीची तिसावी मयंती

29 Nov 2019 21:38:19



दि. १७ नोव्हेंबर, १८६९ या दिवशी सुवेझ कालव्याचं उद्घाटन झालं. नोव्हेंबर २०१९ मध्ये या 'थारेपालटी घटने'ला दीडशे वर्षं पूर्ण झाली, तर ९ नोव्हेंबर, १९८९ या दिवशी लाक्षणिक अर्थाने जर्मनीची भिंत कोसळली आणि नोव्हेंबर २०१९ मध्ये या महत्त्वपूर्ण घटनेला ३० वर्षे पूर्ण झाली.


आधुनिक जगाच्या इतिहासात 'सुवेझ कालवा निर्माण होणं' या घटनेला अतिशय महत्त्व आहे. १७ नोव्हेंबर, १८६९ या दिवशी सुवेझ कालव्याचं उद्घाटन झालं. नोव्हेंबर २०१९ मध्ये या 'थारेपालटी घटने'ला दीडशे वर्षं पूर्ण झाली. अटिला, चंगेजखान, तैमूरलंग, नादीरशहा या लोकांनी प्रचंड नरसंहार केला. शत्रूंच्या मुंडक्यांचे मनोरे रचणं, हा त्यांचा छंद होता. तो छंद त्यांनी मनसोक्त केला. लोक आपल्याला 'क्रूर' म्हणतात की 'शूर' म्हणतात, याची त्यांना पर्वा नव्हती. आधुनिक काळाच्या विसाव्या शतकाने जगासमोर कू्ररपणाचा एक वेगळाच नमुना ठेवला. मुळात अत्यंत खुनशी, क्रूर, कत्तलबाज, असहिष्णु, पण दिखावा अत्यंत मोहक, भुरळ घालणारा! काय तर म्हणे आम्ही शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांचे राज्य आणणारे 'डिक्टेटरशिप ऑफ प्रोलटरिएट' आणणारे श्रमिकांचे कैवारी! या श्रमिकांच्या कैवाऱ्यांनी संपूर्ण पूर्व युरोप आपल्या टाचेखाली दाबून ठेवला. म्हणजे पोलंडपासून बल्गेरियापर्यंतच्या पूर्व युरोपीय देशांमध्ये आपली बाहुली सरकारं सत्तेवर बसवली. जर्मनीत तर त्यांनी एक भिंतच उभी केली. जर्मन राजधानी बर्लिन शहराला पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांमध्ये विभाजित करणारी तब्बल १५५ किमी लांबीची भिंत त्यांनी उभारली. ९ नोव्हेंबर, १९८९ या दिवशी लाक्षणिक अर्थाने ही भिंत कोसळली. नोव्हेंबर २०१९ मध्ये या महत्त्वपूर्ण घटनेला ३० वर्षे पूर्ण झाली.

 

जगाचा नकाशा पाहिलात तर असं लक्षात येईल की, आपल्या भारत देशाच्या पश्चिमेला जो सिंधुसागर किंवा अरबी समुद्र आहे, तो विशाल अशा हिंदी महासागराचाच एक भाग आहे. अरबी समुद्राचा एक फाटा आशिया आणि आफ्रिका या दोन खंडांच्या मधून बराच आतापर्यंत घुसलेला आहे. या फाट्यालाच म्हणतात 'तांबडा समुद्र!' या तांबड्या समुद्राच्या उत्तर काठावर जेमतेम दोन-एकशे किमी एवढी जमीन ओलांडली की, लागतो भूमध्य समुद्र. भूमध्य समुद्राच्या तीन बाजूंना आशिया, आफ्रिका आणि युरोप असे तीन खंड उभे आहेत आणि भूमध्य समुद्राच्या अगदी पश्चिमेकडच्या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडलं की एकदम अटलांटिक महासागरच. म्हणजे पाहा! अटलांटिक महासागरातून, भूमध्य समुद्रातून येणाऱ्या व्यापरी गलबतांना इजिप्तच्या अलेक्झांड्रिया बंदरात माल उतरावा लागायचा. मग खुष्कीच्या म्हणजे जमिनीवरील मार्गाने तो कहिरा किंवा कैरोहून पुढे अल् सुवेझकडे जाणार. मग तिथे परत गलबतात भरून तांबडा समुद्र, अरबी समुद्र असा भारत किंवा पूर्वेकडील देशांमध्ये जाणार. हाच मार्ग पूर्वेकडून मसाल्याचे पदार्थ आणताना घ्यावा लागायचा. नाहीतर मग वास्को-द-गामाने शोधलेला लांबचा मार्ग होताच. आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला 'केप ऑफ गुड होप'ला पूर्ण वळसा मारून हिंदी महासागरात यायचं. पण, यात फार वेळ खर्च व्हायचा.

 

म्हणून अनेकांच्या डोक्यात असं होतं की, तांबडा समुद्र ते भूमध्य समुद्र यातील ही दोनएकशे किमीची पट्टी खणून एक कालवा काढून दोन्ही समुद्र जोडले तर? आधुनिक काळात नेपोलियन बोनापार्टने हा प्रयत्न करून पाहिला. १७९९ साली नेपोलियनने इजिप्त जिंकला. मुसलमान विजेते आणि ख्रिश्चन विजेते यांच्या मनोवृत्तीत लक्षणीय फरक आहे. इ. स. १६८९ साली औरंगजेबाचा सेनानी जुल्फिकार खान याने हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड जिंकला. बाकी लुटालूट आणि जाळपोळ सोडा, पण संपूर्ण दफ्तरखाना त्याने बाहेर काढला आणि जाळून टाकला. शिवछत्रपती आणि शंभू छत्रपती यांच्या कारकिर्दीची सर्व अस्सल कागदपत्रं जळून खाक झाली. 'माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन'ने दुसऱ्या बाजीरावाला उत्तरेत 'ब्रह्मावर्त' किंवा 'विठूर' येथे स्थानबद्ध करून मराठी राज्य संपवलं. पण शनिवारवाड्यातले पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्यापासूनचे 'पेशवे दफ्तर' त्याने जाळून न टाकता, उलट मोठ्या बंदोबस्ताने तिथून हलवले. आजही 'पेशवा दफ्तर' याच नावाने ओळखली जाणारी त्या कागदपत्रांची इमारत पुण्यात आहे. तसाच अरब मुसलमान आक्रमकांनी जेव्हा इसवी सनाच्या आठव्या शतकात इजिप्त जिंकला, तेव्हा तेथील मूळ रहिवाशांच्या संपूर्ण वांशिक कत्तलीसोबतच त्यांनी एक मोठंच पुण्यकृत्य केलं. कोणतं? तर अलेक्झांड्रिया शहरातलं प्रख्यात ग्रंथालय त्यांनी जाळून टाकलं.

 

नेपोलियनने असं केलं नाही. म्हणजे ख्रिश्चन विजेते हे मोठे न्यायी, उदार, सोवळे होते, असं समजण्याचं कारण नाही. पण, तात्पुरती लुटालूट आणि विद्ध्वंस करण्यापेक्षा त्यांना एखादा देश कायमचा ताब्यात ठेवून त्याचं दीर्घकाळ आर्थिक शोषण करण्यात जास्त रस होता. आता आर्थिक शोषण करायला त्या देशात मुळात संपत्ती निर्माण तर व्हायला हवी! मग इजिप्तमध्ये आणखी संपत्ती निर्माण व्हायला हवी, तर तेथील व्यापार आणखी भरभराटायला हवा. त्यासाठी भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र जोडले तर... या कल्पनेनुसार नेपोलियनच्या आज्ञेने फे्ंरच वैज्ञानिकांनी इजिप्तचं विस्तृत सर्वेक्षण केलं. पण, त्यांना असं आढळलं की, भूमध्य समुद्रापेक्षा तांबडा समुद्र उंचीवर असल्यामुळे कालव्याला कप्पे पाडावे लागतील (लॉकिंग) आणि हे काम खर्चिक होईल. त्यामुळे नेपोलियनने ही कल्पना सोडून दिली. ही गोष्ट १७९९-१८०० या सुमारची. पुढच्या काळात वैज्ञानिक उपकरणेही झपाट्याने सुधारत गेली. १८३० झाली असं दिसून आलं की, नेपोलियनच्या वैज्ञानिकांचं सर्वेक्षणअपुऱ्या उपकरणांनी केल्यामुळे चुकीचं होतं. कालव्याला कप्पेबंदीची गरज नाही. भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र एकाच पातळीवर आहेत. मग अनेक खटपटी होत होत 'सुवेझ कॅनॉल कंपनी' स्थापना झाली आणि प्रख्यात फे्ंरच स्थापत्त्यतज्ज्ञ फर्डिनांड दि लेसेप्स याच्या अधिपत्याखाली १८५९ सुरू झाली. ते दहा वर्षांनी पूर्ण झालं आणि १७ नोव्हेंबर, १८६९ या दिवशी मोठ्या समारंभपूर्वक कालव्याचं उद्घाटन झालं. या नव्या मार्गामुळे युरोप आणि भारत यांच्यातलं अंतर पाच हजार सागरी मैलांनी घटलं. दिवसांच्या हिशेबात बोलायचं तर लंडनहून निघालेलं जहाज मुंबई बंदरात पोहोचायला पूर्वी तीन महिने लागत. आता तोच प्रवास तीन आठवड्यांवर आला. सुवेझमुळे पूर्व आणि पश्चिम यांच्यातलं दळणवळण आणखी वाढलं, आणखी सोपं झालं. म्हणून आधुनिक जगाच्या इतिहासातील ती एक थारेपालटी घटना ठरली.

 

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटन-फ्रान्स-अमेरिका यांनी जर्मनीचा पश्चिम भाग व्यापला, तर सोव्हिएत रशियाने पूर्व भाग व्यापला. पुढे दोस्त राष्ट्रांनी पश्चिम जर्मनी स्थानिक लोकांच्या ताब्यात देऊन तिथे लोकशाही शासन आणलं. त्याला सर्व प्रकारे मदत दिली. उलट सोव्हिएत राजवटीने पूर्व जर्मनी हा स्वतंत्र देश घोषित करून जर्मनीची फाळणी केली. पूर्व जर्मनीतलं साम्यवादी सरकार हे सोव्हिएत सत्ताधाऱ्यांचं बाहुलं सरकार होतं. त्यामुळे अनेक पूर्व जर्मन नागरिक पश्चिम जर्मनीत स्थलांतर करू लागले. तेव्हा पूर्व जर्मन सरकारने त्यांना रोखण्यासाठी चक्क एक प्रचंड भिंत उभी केली. तब्बल १५५ किमी लांब आणि १२ फूट उंच अशी ही सिमेंट काँक्रीटची भक्कम म्हणजेच कुप्रसिद्ध 'बर्लिन वॉल.' ही भिंत ओलांडू पाहणाऱ्याला सरळ गोळी घातली जात असे. १९८५ साली सोव्हिएत रशियात मिखाईल गोर्बाचेव्ह सत्तेवर आले आणि त्यांनी डबघाईला आलेल्या सोव्हिएत साम्राज्याचे विसर्जन करायला सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणजे ९ नोव्हेंबर, १९८९ या दिवशी सकाळी हजारो पूर्व जर्मन नागरिकांनी भिंत ओलांडून पश्चिम जर्मनीत प्रवेश केला. लाक्षणिक अर्थाने 'भिंत कोसळली.' पुढे १३ जून, १९९० या दिवशी अधिकृतपणे भिंत पाडायला सुरुवात झाली आणि नोव्हेंबर १९९१ मध्ये ते काम पूर्ण झालं. त्यापूर्वीच म्हणजे ३ ऑक्टोबर १९९० या दिवशी पूर्व जर्मनी हा सोव्हिएत रशियाने निर्माण केलेला कृत्रिम देश संपुष्टात आला. पूर्व आणि पश्चिम ही फाळणी संपून जर्मनी हा एकसंध देश अस्तित्त्वात आला. त्यापाठोपाठ म्हणजे जुलै १९९१ मध्ये बोरिस येत्तीसिन यांनी सोव्हिएत रशियाचा बोऱ्या वाजवून ही त्या पाशवी राजवटीच्या कोसळण्याची सुरुवात होती. म्हणूनच तिलाही 'थारेपालटी घटना' म्हणतात.

Powered By Sangraha 9.0