पाक सीमेवर रणगाडाविरोधी 'स्पाइक' क्षेपणास्त्रे तैनात

    दिनांक  28-Nov-2019 10:57:22
|नवी दिल्ली : भारतीय लष्कराने इस्रायली बनावटीची रणगाडाविरोधी 'स्पाइक' क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. जम्मू-काश्मीरच्या उत्तरेतील युद्ध क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ ही क्षेपणास्त्रे तैनात केली असून पाकिस्तानलगतच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्थेला यामुळे बळकटी येईल. 'स्पाइक एटीजीएमएस' क्षेपणास्त्रांना 'डागा आणि विसरा' या नावाने ओळखले जाते. 'स्पाइक' क्षेपणास्त्रे संपूर्णपणे पोर्टेबल म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणावर नेण्यासारखी असून थेट रणगाडा नष्ट करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. इतकेच नव्हे, तर चार किलोमीटरच्या परिघातील बंकरदेखील त्यांच्याद्वारे उद्ध्वस्त करता येईल.

 

दरम्यान, इस्रायलने आपत्कालीन खरेदी तत्त्वावर २८० कोटींच्या करारांतर्गत एकूण २१० 'स्पाइक' क्षेपणास्त्रे आणि १२ लॉन्चर भारताला दिले होते. भारतीय वायुदलाने बालाकोट येथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला होता व त्यानंतर पाकिस्तानने सीमेवर सैनिकांची जमवाजमव केली होती. पाकिस्तानच्या या हालचालीनंतरच भारताने 'स्पाइक' क्षेपणास्त्र खरेदीचा बहुप्रतीक्षित सौदा पूर्णत्वास नेला होता.