'आरे कारशेड' प्रकरणी शिवसेना नरमली

    दिनांक  28-Nov-2019 16:59:16
|कारशेड हलवणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण


मुंबई : महाविकासआघाडीच्या पत्रकार परिषदेत किमान समान कार्यक्रम शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आला. त्यावेळी आरे प्रश्नावर शिवसेना आणि इतर पक्षांची भूमिका विचारण्यात आली. यावेळी शिवसेनेने मवाळ भूमीका घेत, पर्याय शोधू मात्र, आरे कारशेड हलवणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, याबद्दल शिवसेनेने अधिकृत अशी ठोस भूमीका घेतली नसल्याचे दिसत आहे. 

आरे कारशेड प्रकरणाला विरोध करत आरे हे जंगल घोषित करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी परवानगी दिली कशी असा सवाल शिवसेना सत्तेत असलेल्या तत्कालीन राज्य सरकार व महापालिका यांना केला होता. आदित्य ठाकरे यांनी रात्री झाडांची कत्तल झाल्यानंतर टोकाची भूमीका घेत आम्ही आरे जंगल घोषित करू, असे म्हटले होते. मात्र, आता या भूमीकेपासून फारकत घेत मुंबईकरांना त्रास होईल, असे कुठलेही काम करणार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिले आहे.

 

"झाडे तोडून झाली आहेत. मात्र, आम्ही त्या ठिकाणी अन्य पर्याय शोधू," असे मोघम उत्तर त्यांनी दिले. यावर आरे कारशेड इतरत्र हलवणार का?, दुसऱ्या जागेचा विचार केला आहे का तिथल्या बांधकामाबद्दल नवे राज्य सरकार काय भूमीका घेणार याची उत्तरे मात्र नेत्यांना देता आली नाहीत. प्रकल्प कुठेही हलवणार नाही, मात्र पर्यायी व्यवस्था करू, असे उत्तर नेत्यांनी यावेळी दिल.