नगरची 'कोयना' न्यूयॉर्क महोत्सवात

    दिनांक  28-Nov-2019 13:23:48
|

अहमदनगर
: अहमदनगर येथील दहिवाळ प्रॉडक्शन निर्मित 'कोयना' या लघु चित्रपटाची निवड 'लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क,न्यूयॉर्क' येथे आयोजीत आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये करण्यात आली आहे.या लघुचित्रपटाची निर्मिती सचिन दहिवाळ यांनी केली असून, दिग्दर्शक संजोग धोत्रे यांनी केले आहे. चित्रपटाचे संवाद प्रशांत जठार यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात 'फॅन्ड्री' या चित्रपटातून अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री साक्षी व्यवहारे व गौरी कुलकर्णी हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. सोबतच अनुष्का शिरसागर, अनिल उदावंत( खरवंडीकर), रवि व्यवहारे, अनिल फुंदे यांच्या अभिनयाने 'कोयने'त रंग भरले.


या चित्रपटाची कथा कलाकेंद्रात नाचगाणी करणारी महिला स्वतःच्या मुलीसाठी बंड करुन पळुन जाते. मुलीला शिकवते. तीच मुलगी मोठी होवुन पीएचडीसाठी
'कला केंद्रा'शी निगडीत विषय निवडते. त्याठिकाणी आल्यानंतर तीला तीचे बालपण कला केंद्रातील एका मुलीत दिसते. त्या मुलीला दत्तक घेण्यासाठी केलेला संघर्ष आणि आपल्या भविष्याची त्या कलाकेंद्र प्रमुख आसलेल्या 'आऊ' ला करुन दिलेली जाणीव याबाबत भाष्य करणारी हि कथा प्रेक्षकांचे मन जिंकते. या कथेत आपणास दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'उन्हाच्या कटाविरुध्द' या कवितेची झलक पाहावयास मिळते. कथेतील विषय पाहता नागराज मंजुळे यांनी आपली कविता या लघुपटामधे वापरण्याची परवानगी दिली आहे.


आत्तापर्यंत या लघुचित्रपटाला अनेक विशेष राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे
'लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क, इंग्लंड' आयोजीत 'फर्स्ट टाईम फिल्ममेकर' विभागात तब्बल १५०००पेक्षा ज्यास्त लघुपटांमधुन उत्कृष्ट लघुपट नामांकन होण्याचा मान 'कोयना' या लघुचित्रपटाला मिळाला आहे. 'महाराष्ट्र महिला आयोगा'च्या वतीने सन्मानित केला गेलेला व 'स्त्री-सक्षमीकरण' या विषयाच्या प्रसारणासाठी कोयनेची निवड करण्यात आली होती.