
भारत सरकारच्या विज्ञान प्रसार उपक्रमा अंर्तगत घेतल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल सायन्स फिल्म ऑफ इंडिया या प्रतिष्ठीत स्पर्धेत मराठमोळ्या कस्तुरी कुलकर्णीने बाजी मारत तृतीय पुरस्कार मिळवला आहे. सध्या इयत्ता दहावीत शिकत असलेली कस्तुरी आगामी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शक सुद्धा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेत शिकत असलेल्या कस्तुरीला लहानपणापासून अभिनयाचे वेड आहे. निर्माते, दिग्दर्शक राजू भोसले यांच्या अनेक सायन्स विषयक शिबिरात सहभागी होणाऱ्या कस्तुरीला सायन्स फिल्म फेस्टिव्हलबद्दल समजले आणि आपण काहीतरी करु असा निश्चय तिने केला.
पहिल्यांदा तिने ‘आजीबाईचा बटवा’ ही औषधांची माहिती देणारा लघुपट तयार केला, यामध्ये सीमा चांदेकर यांनी काम केले आहे. यंदा तिने ‘सिंबायोसिस’ ही सायन्स फिल्म बनवली यामध्ये तिने झाडांभोवती निर्माण होणाऱ्या बुरशीचे महत्व, त्याचे पर्यावरणातील स्थान हा विषय मांडला आहे. कोलकाता येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल सायन्स फिल्म ऑफ इंडिया २०१९ मध्ये ‘सिंबायोसिस’ची निवड झाली, या फेस्टीव्हल मध्ये ६० हून अधिक देशातील सायन्स फिल्म आल्या होत्या. यातील शाळा – महाविद्यालय विद्यार्थी गटात कस्तुरी कुलकर्णीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. इयत्ता ९ वी मध्ये असताना कस्तुरीने ‘बेरीज वजाबाकी’ साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले तसेच त्यात अभिनय देखील केला आहे. ‘बेरीज वजाबाकी’ हा चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.