मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांचे एकत्रित येणे अनेक कट्टर शिवसैनिकांना रुचलेले नाही. मुंबईतील रमेश सोलंकी या शिवसेना नेत्याने पक्षाचा राजीनामा देऊन आपला निषेध व्यक्त केला आहे. दैनिक मुंबई तरुण भारत व महाMTB च्या प्रतिनिधींशी बोलताना रमेश सोलंकी म्हणाले की, "राम अस्तित्वात नाही, असे ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिले, त्यांच्यासोबत शिवसेनेने हातमिळवणी करणे मला पटत नाही." 'आजवर आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधात भांडलो, भूमिका घेतली, त्याच कॉंग्रेस राष्ट्रवादीचे समर्थन मी आता करू शकत नाही', असेही रमेश सोलंकी म्हणाले आहेत.
रमेश सोलंकी शिवसेनेचे आक्रमक कार्यकर्ते असून त्यांनी आजवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोठा संघर्ष केला आहे. हिंदुत्वविरोधी वेबसिरीज विरोधात तक्रार दिल्यामुळे ते चर्चेत आले होते. महाविकासआघाडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील असंतोषामुळे देण्यात आलेला, हा राजीनामा ठरला आहे.