वाणीत वसते सुखसंपदा!

    दिनांक  27-Nov-2019 20:41:24
|कठोर वचने, असत्य बोलणे, लावालावी करणे आणि नको ते व्यर्थ बडबडणे हे वाणीसंबंधीचे चार दोष आहेत. हे टाळावयाचे असल्यास माणसाने बुद्धीरूपी चाळणीचा उपयोग करावयास हवा. आचार्य भर्तृहरींनी सर्व प्रकारच्या भौतिक दागिन्यांना निरर्थक व क्षणभंगूर मानले आहे. त्यांच्या दृष्टीने सुसंस्कारयुक्त वाणी हेच खरे भूषण होय. 'क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्।'


सक्तुमिव तितउना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमक्रत ।

अत्रा सखाय: सख्यानि जानते भद्रैषां लक्ष्मीर्निहिताधि वाचि॥

(ऋग्वेद १०.७१.२)

 

अन्वयार्थ

 

(तितउना) चाळणीने चाळून (सक्तुम् इव) ज्याप्रमाणे सातूंना स्वच्छ केले जाते, त्याप्रमाणे (यत्र) ज्या विषयांबाबत (धीरा:) बुद्धिमान व ज्ञानी लोक (मनसा) बुद्धी व ज्ञानयुक्त मनाने (वाचम्) वाणीला (पुनन्त:) शुद्ध करीत, पवित्र करत (अक्रत) उपयोगात आणतात, (अत्र) यासंदर्भात इथे (सखाय:) हितकारी विद्वान लोक, मित्रगण (सख्यानि) हितकारक व कल्याणाच्या गोष्टींना (जानते) समजतात, मग काय? (एषाम् वाचि) त्यांच्या मुखात, वाणींमध्ये (भद्रा लक्ष्मी:) सर्वकल्याणकारी लक्ष्मी (अधिनिहिता) राहते.

 

विवेचन

 

वाणी हे माणसाच्या अभिव्यक्तीचे महत्त्वपूर्ण साधन! भगवंताने मानवाला ही अमूल्य देणगी प्रदान केली आहे, जिच्या साहाय्याने मानव आपली व्यक्तिगत, सामाजिक व राष्ट्रीय उन्नती साधू शकतो. या वाणीचा सदुपयोग केला, तर सर्वत्र सुख व आनंदाचे वातावरण पसरते आणि जर काय हिचा दुरुपयोग केला तर चहुकडे दु:ख व अशांतता पसरू शकते. 'तोंड गोड, तर सर्व काही गोड!' अशी लोकोक्ती सर्वांना परिचितच आहे. सामान्य माणसांपासूनच ते विद्वान, राजे-महाराजे आणि सर्व प्रतिष्ठित लोकांचे बोलणे कसे असावे? आणि सुमधुर वाणीचे कोण-कोणते गुण दिसून येतात? या संदर्भात सदरील मंत्रात अतिशय समर्पक शब्दांमध्ये उपदेश केला आहे.

 

वैदिक ऋषींनी उपमा अलंकाराने वाणीचा महिमा वर्णिला आहे. रोजच्या व्यवहारातील 'सातू' या धान्याचे उदाहरण देऊन आपले बोलणे कसे असावे? या विषयी सोप्या पद्धतीने वाग्व्यवहाराचा वस्तुपाठ मांडला आहे. प्राचीन काळी सातूचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाई. कष्टकरी शेतकरी किंवा त्याची पत्नी सातूला चाळण्याकरिता चाळणीचा वापर करीत असे. जेव्हा शेतातून धान्य निघाले, तेव्हा शेतकऱ्याला मोठ्या चाळणीने तर घरी आणल्यानंतर दळण्याअगोदर व दळून पीठ बनल्यानंतरदेखील असे दोन-तीन वेळा चाळले की, त्यांची उत्कृष्ट भाकरी बनते व ती आपण खाऊ शकतो. ऋषींची दिव्य दृष्टी किती सूक्ष्म आहे पाहा! सातू हे धान्य खूपच मऊ असते. इतर धान्यातून केर-कचरा लवकर काढता येतो. उदा. गहू, ज्वारी, बाजरी, साळी (तांदूळ), हरभरा किंवा तूर वगैरे... या धान्यातून खडे किंवा कचरा लवकर बाजूला काढला जाऊ शकतो, पण सातू हे गुळगुळीत मऊ असल्याने त्यातील भुसा व कचरा काढणे मात्र अवघड जाते. एखादवेळी इतर धान्यांना निवडण्याकरिता चाळणीची आवश्यकता भासणार ही नाही, पण सातूला मात्र चाळणीची गरज असणारच! या मंत्रात वाणीला सातूची, तर बुद्धी(मना)ला चाळणीची उपमा दिली आहे. म्हणजेच वाणीरूपी सातूला बुद्धीरूपी चाळणीने चाळले पाहिजे. तर त्याचे काय काय लाभ होतात, या संदर्भात इथे वर्णन आले आहे. आपले बोलणे बुद्धी व ज्ञानपूर्वक असावे, अन्यथा 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे योग्य नव्हे. प्रत्येक वाक्य व शब्द हा बुद्धीच्या चाळणीने पवित्र व शुद्ध करावयास हवा. आपल्या बोलण्याला बुद्धी व ज्ञानाची जोड असेल, तर ते सार्थक ठरते. जेव्हा वाणीची पवित्रता, सत्यता, मधुरता, स्नेहशीलता सोबत असेलच त्याला इतर विद्वान व ज्ञानी लोक समजू शकतील व अशाच सुसंस्कारित वाणीमध्ये साक्षात लक्ष्मी नांदू शकेल. म्हणजेच लक्ष्मी अर्थात ऐश्वर्याची प्राप्ती ही उत्तम वाणीमुळेच होते. लक्ष्मी ही केवळ साधीसुधी नव्हे, तर ती 'भद्रा' म्हणजे सर्वांचे कल्याण करणारी. आपल्या बोलण्याने सर्वांचे हित साधले पाहिजे.

 

देवाने आम्हाला वाणीरूपी सातू तर दिलेच आहेत, पण ते बुद्धीच्या चाळणीने चाळावयाचे की नाही, हे मानवाच्या हाती आहे. आज अनेक लोक 'खूपच' बोलतात. त्यातून काय तर फक्त व्यवहार व स्वार्थ साधला जातो. आपले भले होते, पण इतरांचे काय? काहीजण तर नको ते बोलतात. त्यामुळेच घर, परिवार, गाव, समाज व एकूणच संपूर्ण देशात भांडणे लागतात. माणूस हा माणसाचा वैरी बनला आहे, तो वाणीमुळे. बुद्धीच्या चाळणीने विचारपूर्वक बोलावयास कोणीही तयार नाही. या वाणीत असत्य, कठोरपणा, शिव्या-शाप, द्वेष-मत्सर, शत्रुभाव दडला आहे. या दुर्गुणरूपी खड्यांना व कचऱ्यांना दूर करावयास कोणीच तयार नाही. वाईट, लबाड व कडवट बोलण्याचे दुष्परिणाम आज आपल्यासमोर आहेत. आपापसांतील फूट, दुरावा, शत्रुता आणि शेवटी पराधीनता! महाभारतात द्रौपदीने दुर्योधनास 'आंधळ्याचा मुलगा-आंधळाच!' असे बोलले नसते... तर कदाचित तो स्त्री-अपमानाचा बदला घेण्याच्या अग्नीपासून दूर राहिला असता आणि महाभारत घडले नसते. त्याच्या भयंकर परिणामाची फळे आजही सारे जग भोगत आहे...! आज आपण पाहतो. सामान्य अशिक्षित लोकांपासून ते सुशिक्षित लोकांपर्यंत सर्वजण वाटेल ते बोलतात. आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील, याचा विचार न करता नको तसे बोलून जातात व नंतर पश्चाताप करतात. मनुस्मृतीत(१२.६) वाणीचे चार दोष वर्णिले आहेत-

 

पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वश:

असम्बद्धप्रलापश्च वाङ्मयं स्याच्चतुर्विधम्॥
 
 

कठोर वचने, असत्य बोलणे, लावालावी करणे आणि नको ते व्यर्थ बडबडणे हे वाणीसंबंधीचे चार दोष आहेत. हे टाळावयाचे असल्यास माणसाने बुद्धीरूपी चाळणीचा उपयोग करावयास हवा. आचार्य भर्तृहरींनी सर्व प्रकारच्या भौतिक दागिन्यांना निरर्थक व क्षणभंगूर मानले आहे. त्यांच्या दृष्टीने सुसंस्कारयुक्त वाणी हेच खरे भूषण होय. 'क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्।'

 

त्याचबरोबर एका सुभाषितकारानेदेखील सत्य व प्रिय बोलण्यालाच सनातन धर्म मानले आहे-

 

सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यम् अप्रियम्।

प्रियं च न अनृतं ब्रूयात् एष: धर्म: सनातन:॥

 

सत्य (खरे) बोलावे, पण ते गोड असावे. ते कडवट (अप्रिय) सत्य (खरे) नसावे आणि गोड ही पण ते लबाड (असत्य) कदापि असता कामा नये! संत ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे-

 

साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ अमृतांचे ॥

 

संत कबीरांचे वचन ही मोलाचे आहे -

 

ऐसी बानी बोलिये, मन का आपा खोय।

औरन को शीतल करे, आपहु शीतल होय॥

 

वाणीचा हा वेदोक्त संस्कार जर काय प्रत्येकाने अंगीकारला तर निश्चितच या पृथ्वीवर कोणीही कुणाचा शत्रू राहणार नाही. सर्वजण एक दुसऱ्यांचे मित्र बनतील. बंधुत्वाच्या नात्यांची गुंफण होईल. चला, तर मग आपण आपले शब्द जपून वापरूया! बुद्धी व ज्ञानपूर्वक बोलण्यानेच लक्ष्मीचे म्हणजेच सुख-ऐश्वर्याचे उद्दिष्ट साध्य होईल.

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य